जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी कसं वागायचं हे सांगितले. व्यवहारात देखील आपले आईवडील आपल्याला काही उपदेशपर गोष्टी सांगत असतात. ते हितोपदेश म्हणजे आरोग्याचा बटवा असतो.
मुलीला आई चार गोष्टी दररोज सुनावत असते.
“अस्सं वाग, अस्स कर. अस्स करू नकोस, तू ना, आमची अगदी इज्जतच काढणार आहेस.” वगैरे वगैरे.
आणि मुलींनाच जास्त ओरडा खावा लागतो. तेव्हा आई हा प्राणी तिचा जगातला एक नंबरचा शत्रू असतो.
” तू सारखं सारखं तेच तेच तेच तेच सांगत राहू नकोस, झाली कटकट सुरू, तू मला सांगतेस, त्या दाद्याला का सांगत नाहीस, सगळ्या चुका काय माझ्याच असतात काय,”
आणि हे भांडण शेवटी…
” मी मुलगी आहे, म्हणून काहीही ऐकून घ्यायचं काय ? ”
या वाक्यावर येऊन थांबत असतं.
प्रत्येक घरात अगदी हे असंच चाललेलं असतं.
हे खरं पण आहे. “मुलीवर लग्नानंतर लक्ष ठेवण्यासाठी तिथे मी नसणार, मुलाचं काही चुकलं, तर जे काही होईल, ते माझ्या डोळ्यासमोर होईल. मुलगी म्हणजे परक्याचं धन वगैरे, मी माझ्या मुलाला कधीही बदलवू शकते” अशा सरासर खोट्या आणि भ्रामक विश्वातून आई कधीच बाहेर येत नाही.
आणि नंतर जे व्हायचं तेच होतं. जी आई कधीकाळी शत्रू नंबर वन होती, मुलीला ती लग्नानंतर मात्र सद्गुणांचा पुतळा वगैरे भासू लागते. ( मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण जे अवतीभवती दिसतं ते सांगतोय, एवढंच. )
सांगायचंय काय तर,
लग्नानंतर मुलीला, आईनं केलेले हितोपदेश आठवू लागतात.
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईची सुरू असलेली बडबड आठवून डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागतात.
मनात म्हटलं जातं,
“तू त्यावेळी सांगितले होतेस,
तेव्हा मला तुझा राग येत होता,
जीवाचा अगदी त्रागा होत होता.
तू सांगायचीस,
उतू नये मातू नये,
घेतला वसा कधी टाकू नये.
एकमेकांचे उष्टे खाऊ नये.
घटाघट पाणी पिऊ नये.
उगाच आरश्यात पाहू नये.
केसांना हात लावू नये.
पदार्थ उघडा ठेऊ नये.
दुधावर फुंकर घालू नये.
पिंपात तांब्या बुडवू नये.
पातेलं खरडून वाढू नये.
ताटाच्या बाहेर सांडू नये.
पंगतीत ढेकर देऊ नये.
मधेच पंगतीतून उठू नये.
शिरा ताणून बोलू नये.
उगाच वाद ओढवू नये.
शब्दाने शब्द वाढवू नये.
उंबऱ्याच्या मर्यादा विसरू नये.
माहेरचे कौतुक सांगू नये.
कुणाचे वर्म काढू नये.
वर्मावर बोट ठेऊ नये.
मोठ्यांचा मान मोडू नये
लहानाशी खेळणं सोडू नये
दुसऱ्याचे दोष पाहू नये
दिलेले दान कळू नये.
धर्मशाळेत जेवू नये.
अंथरूणातून सूर्य पाहू नये.
गादीवर जास्त लोळू नये.
आळस मोठ्ठा देऊ नये.
तोंडाचा आऽ करू नये.
पाय पसरून बसू नये.
पाचकळ बाचकळ बोलू नये.
फिदीफिदी उगा हसू नये
भोकाड मोठे पसरू नये.
हट्टीपणा बरा नव्हे.
फुकाचे बोल बोलू नये.
कर्मकांड टाकू नये.
प्रयत्न कधी सोडू नये.
मनात विकल्प आणू नये.
भूतकाळा आठवू नये.
भविष्याचा विचार करू नये.
वर्तमानाशिवाय राहू नये.
विसरू नये देवाला
विसरू नये कर्माला
विसरू नये संस्काराला
विसरू नये राष्ट्राला
पण आता हे पटायला लागलंय,
तू सांगत होतीस, ते बरोबर असं आता वाटायला लागलंय.
तू मला तेव्हापासून बडवत होतीस,
ताईला नाही तर एका आईला घडवत होतीस.
तुझा एकेक शब्द आता मला आठवू लागलाय.
माझ्या मुलीच्या कानात तो रोज जाऊ लागलाय.
माझ्या मुलीबरोबर तेच भांडण मी करायला लागलीय.
तुझ्या नातीला आता मी तेच सांगायला लागलीय.
अगदी तुझा ठेका मला जमायला लागलाय.
‘ह्यांना’ सुद्धा तो जाणवायला लागलाय.
तू सांगितलेला प्रत्येक शब्द काळजात रुतून बसलाय.
आता माझ्या जीभेतून बाहेर येऊ लागलाय.
हितोपदेश तुझा आता आठवू लागलाय
मला “आई” बनवू लागलाय.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०८.०८.२०१७
Leave a Reply