कोकणातील अनेक गावांमध्ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘गावपळणा’ची किंवा ‘देवपळणा’ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा. सिंधुदुर्ग जिल्ह्याने पर्यटनात कात टाकली असली तरी येथील लोक श्रद्धेच्या प्रतिक असलेल्या रूढी-परंपरात खंड पडू देत नाही. गावपळण आणि देवपळण ही एक अशीच परंपरा की जी गावाचा सांभाळ करणाऱ्या ग्रामस्थांचा नवचैतन्य देणारी, उत्साह वाढविणारी असते. मालवण तालुक्यात प्रामुख्याने आचरा व चिंदर,वायंगणी, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्ये शिराळे या गावांची गावपळण होते.
‘गावपळण’ म्हणजे गावातून वेशीबाहेर पळून जाणे..! अर्थात, नेहमीच्या गावातील घर सोडून गावकुसाबाहेर वस्तीला जाणे. तो कालावधी साधारणत: तीन दिवस व तीन रात्रींचा असतो. ‘गावपळण’ साधारणत: देवदिवाळीनंतर किंवा महाशिवरात्र व शिमगोत्सवा दरम्यान होते. गावकरी त्यांच्या ग्रामदैवताचा कौल घेऊन गावपळणीचा दिवस निश्चित करतात. निर्धारीत कालावधीनंतर पुन्हा देवाचा कौल घेऊन गावात परतात.‘गावपळणा’च्या काळात गावातील सर्व माणसे गुरे-ढोरे, कुत्रे-मांजरी, कोंबड्या व पाळीव पक्षी यांच्यासह तीन दिवस पुरेल इतके धान्य, जीवनावश्यक वस्तू, कपडे व पैसाअडका आदी गोष्टी सोबत घेऊन जातात. ग्रामस्थ कौल मिळाल्यानंतर जागा पक्की करण्यासाठी शेजारच्या गावात, नदीकिनारी अथवा वेशीवरच्या माळरानावर (सड्यावर) जाऊन झोपडी किंवा राहुटी उभारणीच्या कामाला लागतात.
गावपळणाच्या तीन दिवसांच्या काळात संपूर्ण गावात नेहमीच्या वर्दळीऐवजी स्मशानशांतता पसरलेली असते. ग्रामस्थांची त्या काळात ओस पडलेल्या गावातील घरा-दाराची काळजी वा चिंता नसते. प्रत्येकाचे कुटुंब गावाबाहेर स्वतंत्र झापाच्या झोपडीत किंवा कावनात तात्पुरता संसार थाटून दैनंदिन जीवन जगत असतात, तेही भांडणाशिवाय.. वेशीवर संपूर्ण गावानेच ठाण मांडलेला असल्याने जणू काही ‘महावनभोजन’ असल्याप्रमाणे तो महाउत्सव असतो. गावकरी गावाबाहेर राहण्याच्या जमिनी शेणाने सारवतात. त्यांच्या जेवणावळीही लज्जतदार असतात. नदीतील माशांचे कालवण, खेकडा, कोंबडीचे मटण, शिकारीचे मटण असे चमचमीत व खुमासदार भोजन म्हणजे पर्वणीच असते. रात्री एकत्र भजने, गाण्याच्या भेंड्या, अंताक्षरी, बायकांच्या फुगड्या आदी करमणूकीचे कार्यक्रम असतात. बच्चे कंपनीचीही धमाल असते. त्यात ना कुठे खंत, भांडण ना वैर! त्यातून गावपण व सलोखा जपला जातो व सामाजिक संबंध दृढ होण्यास मदत होते.
एरवी चार भिंतींत संसार मांडणारे गावकरी भटक्या जमातीप्रमाणे जीवनाचा आनंद मनसोक्त उपभोगताना दिसतात. गावपळणात काही चाकरमानीही सामील झालेले असतात. पोलीस कर्मचारीही त्यांचा वेगळा संसार थाटून आनंद लुटतात. लोकांना रोजच्या काबाडकष्टांपासून काही दिवस मोकळीक मिळावी हा त्या परंपरेमागचा दृष्टिकोन आहे. ‘गावपळणी’त श्रीमंतांपासून गरिबापर्यंत सर्वांनी एकत्र यावे, त्यांच्यातील एकोप्याची भावना वाढीस लागावी हा त्या कृतीमागचा उद्देश असल्याचे मानले जाते.
अशीच एक आणखीन देवपळण एक प्रथा तालुक्यातील वायंगणी गावात शेकडो वर्षे सुरु आहे. गावात शांतता, एकी नांदावी तसेच गावकरी मंडळी गुण्यागोविंदाने नांदावेत या उद्दात हेतून देवपळण केली जाते. यामागे कोणतीही अंधश्रद्धा नसून प्रत्येक गावकऱ्याला स्फूर्ती देणारा तो क्षण असतो, असे गावकरी सांगतात.
श्री देव रवळनाथाची डाळपस्वारी झाल्यावर देव देवपळणीचा कौल देतो. त्यानुसार देवपळणीचा दिवस निश्चित केला जातो. गावकऱ्यासाठी उत्सवासारखा असणारा सण ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल होतात. तीन दिवसीय देवपळण उत्सवात गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होतात. साधारणपणे १८०० लोकवस्ती असलेले वायंगणी गाव देवपळणीच्या तीन दिवासात वेशी बाहेर अथांग आभाळाच्या छताखाली नांदतात.
वैभववाडीतील साडेचारशे वर्षांपासून शिराळे गावात ‘गावपळण’ पाळली जाते. तिचा कालावधी आठवडाभराचा असतो. ती दरवर्षी साजरी केली जाते. गावपळणाच्या काळात तेथील शाळा उघड्या माळरानावर भरते. शेजारच्या सडुरे गावात माळावर सर्वांचे आठवडाभरासाठी वास्तव्य असते. रात्री मनोरंजनासाठी भजन, तमाशा, पथनाट्य अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. जवळच्या गावातील लोक ते पाहण्यास आवर्जुन उपस्थित असतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणात वायंगणी, आचरा व चिंदर, देवगड येथे मुणगे, वैभववाडीमध्ये शिराळे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील वाघण आदी गावांमध्ये ‘गावपळण’ पाळली जाते. सध्या लांजा येथील वाघण गावची ‘गावपळण’ तिचा कालावधी कमीजास्त करण्याच्या कारणावरून ग्रामस्थांच्या विरोधामुळे बंद करण्यात आली आहे. मुणगे गावात काही समाजाचीच माणसे ‘गावपळणी’ची प्रथा पाळतात.
वायंगणीत श्रीदेव रवळनाथाच्या रात्रीत होणाऱ्या देवपळणीनंतर गावकऱ्यांची ‘गावपळण’ सुरू होते.
आचरे येथे रामेश्वराच्या मंदिरातील तोफांचे आवाज झाल्यावर ‘गावपळणी’ला प्रारंभ होतो. तेथे अन्य धर्मांचेही लोक सामील होतात. शेतकरी शेतीची सर्व कामे आवरून मोकळा झाल्याने ‘गावपळणी’च्या आदेशाकडे सर्वांचे डोळे लागलेले असतात. त्यात चाकरमानी आनंदाने सहभागी होतात. काही काळ निसर्गाच्या कुशीत, आभाळाच्या छायेत, स्वच्छंदी वातावरणात नेहमीच्या जीवनापेक्षा वेगळा अनुभव घेत असतानाच सामाजिक, धार्मिक सलोखा राखण्याचे महत्त्वाचे कार्यही ‘गावपळणी’च्या माध्यमातून होत असते. गावपळणीची परंपरा सुरु होण्यामागे विविध दंतकथाही सांगितल्या जातात. त्यात नैसर्गिक आपत्ती, भूतभुताटकीचा वावर किंवा सतीच्या शापांची पूर्तता असे अनेक संदर्भ येतात.
‘गावपळणी’चा कालावधी संपण्यापूर्वी गावातील बारा-पाचाचे मानकरी त्यांच्या ग्रामदैवताकडे जाऊन पुन्हा परतीचा कौल घेतात. तो मिळाल्यानंतर सर्व ग्रामस्थ त्यांच्या सामानाची बांधाबांध करून मूळ घराकडे परतण्यास उत्सुक असतात. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, समाधान असते. निर्मनुष्य झालेले गाव पुन्हा एकदा गजबजल्याने दैनंदिन जीवनाला प्रारंभ होतो. सर्व कौटुंबिक, व्यावहारिक व शासकीय व्यवहार पुन्हा सुरळीत होतात. त्या अनोख्या प्रथेची दखल घेऊन पूर्वीच्या ‘गावपळणी’चे जर्मनीतील काही हौशी पर्यटकांनी चित्रिकरण केले होते.
देवपळण वा गावपळण ही अशीच एक पिढीजात चालत आलेली प्रथा आहे. काही विशिष्ट वर्षानंतर संपूर्ण गाव काही दिवसांकरीता खाली केला जातो. लोक आवश्यक ते सामानसुमान, गाईगुरे, कोंबडी, कुत्री सोबत घेऊन गावाच्या सीमेबाहेर राहायला जातात. या सर्व कार्यक्रमाची पूर्वसूचना सर्व ग्रामस्थांना अगोदरच दिली जाते. लोक एकमताने व राजीखुशीने त्यात सामील होतात.
एवढे कशाला पुढील देवपळण कधी याची ते आतुरतेने वाट पाहातात. तीन ते पाच वर्षानंतर किंवा त्या त्या गावाने ठरवलेल्या मुदतीनंतर हा कार्यक्रम आयोजिला जातो. त्या विशिष्ट मुदतीत संपूर्ण गाव ओस पडतो. त्या काळात जर आपण गावात राहिलो तर आपल्यावर दैवी कोप होईल ह्या भीतीने सर्वजण घरदार सोडून गावाच्या सीमेबाहेर राहायला जातात. तेथे पर्णकुट्या , झोपड्या वा राहूट्या उभारून त्यात राहातात. अल्पकाळाकरता ही व्यवस्था असल्याने तिच्यात आटोपशिरपणा असतो. बकालपणा नसतो. लोकांना नेहमीपेक्षा थोडा बदलही हवा असतो. तो त्याना येथे उपभोगताही येतो.
या सर्व उपद्व्यापामागे कारणही सयुक्तीक असे. कारण माणसांचा सततचा व अखंड वावर हा अनेक साथींसाठी पोषक व पुरक असतो. पूर्वी प्लेगसारख्या साथीना या विशिष्ट काळानंतर गाव खाली करण्याने आपोआपच आळा बसे व गावाचे आरोग्य आपोआपच निकोप राही. आज काळ खूप बदलला आहे. शास्त्रानेही खूप प्रगती केली आहे. त्यामुळे नवनवे रोगही जे पूर्वीही होते पण त्यावर उपचार नव्हते. अशा पुष्कळशा रोगांवर आता औषधोपचार आहेत. परंतु ते जेव्हा नव्हते, तेव्हा त्याना आळा घालण्यासाठी अशा प्रथा निर्माण करून त्यांचे पालन करणे हे निश्चितच स्पृहणीय आहे. त्यासाठी देवादिकांची भीती दाखवणे हेही क्षम्य ठरते. नाहीतर माणूस कोणाच्या बापाला घाबरतो सांगा !
सध्याच्या Event Management इव्हेंट मॅनेजमेंटच्या काळात अशा प्रथांकडेही त्या दृष्टीकोनातूनही पाहिले जाते. दूरचित्रवाणीवर या संबंधीचे माहितीपट झळकवले जातात. पध्दतशीर व परिणामकारक प्रचार केला जातो. मग तो आपोआपच इव्हेंट बनतो व त्याला चांगला प्रतिसादही लाभतो. त्यामुळे मुंबईकर या अनोख्या इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी मोठ्या संख्येने गावाकडे वळतात. गावकऱ्यासाठी उत्सवासारखा असणारा सण ‘याचि देही… याचि डोळा…’ पाहण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल होतात…!
— गणेश कदम,
कुडाळ सिंधूदुर्ग
Leave a Reply