खालील लेख पूर्ण आणि बारकाईने वाचल्याशिवाय आपल्या कमेंट अथवा लाईक्स देऊ नये ही नम्र विनंती.
आपल्या सर्वच देशात सध्या हिन्दुत्वाची चर्चा सुरु आहे. मी ही हिन्दुत्वाचा पुरस्कर्ता आहे. म्हणजे अगदी आता आतापर्यंत आहे. मात्र आज मी गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि आज गोॅधळलेल्या मनस्थितीत असल्याने, उद्याचे हिन्दूत्वाबद्दलचे माझे विचार नेमके कसे असतील, हे आजच सांगणं अवघड आहे. मला कल्पना आहे, की माझा हा लेख वाचून माझे अनेक मित्र, परिचितांचं माझ्याबद्दल वेगळं मत होण्याची किंवा माझ्याकडे पाहाण्याची त्यांची दृष्टी बदलण्याची शक्यता आहे. याची खरी-खोटी कल्पना असुनही माझ्या अल्पशा अभ्यासातून निर्माण झालेल्या विचारांशी मी प्रामाणिक राहाणाचं ठरवून हा लेख लिहित आहे. कृपया आपण माझं म्हणणं तटस्थ बुद्धीने समजून घ्यावं अशी विनंती मी सुरुवातीलाच करतो.
मला स्वत:ला हिन्दूत्व हे धर्मापेक्षा एका प्राचीन समृद्ध संस्कृतीशी संबंधीत विषय आहे असं वाटतं. हिन्दूत्व हे धर्मापेक्षा अधिक विशाल, व्यापक आणि सर्वसमावेशक आहे असं मला वाटतं. हिन्दू ही संस्कृती आहे, जीवनशेली आहे. संस्कृती म्हटली, की तिचं बदलतं राहाणं आणि म्हणूनच जिवंत राहाणं मान्य करावं लागतं. जगातील इतर प्राचीन संस्कृती परचक्राच्या वादळात पार नाहीश्या झाल्या, मात्र सर्वात जुनी असणारी त्हिन्दू संस्कृती ही अनेक परकीय/परधर्मिय आक्रमणं पचवून आजंही जिवंत आहे, ती केवळ कालानुरुप बदलल्यामुळेच. परधर्मियांची शेकडो वर्षांची आक्रमणं झेलत, पचवत, वर त्याला आपलंच नांव देत अद्यापही जिवंत असलेली ही जगातील एकमेंव संस्कृती. उदाहरणच द्यायचं झालं, तर मुसलमानी आक्रमकांकडून तिने बुरखा घेतला आणि त्याला ‘डोक्यावरील पदराचं’ आपलं असं खानदानी रुप दिलं, तर ख्रिस्त्यांच्या ‘माऊंट मेरी’ला ‘मोत माऊली’ बनवून आपल्या देवता मंडळात बसवलं. स्वतंत्र धर्म स्थापन करणाऱ्या गौतम बुद्धाला तिने चक्क विष्णूचा नववा अवतार मानलं. आज आण सरसकट सर्व देवांना लावत असलेली ‘भगवान’ ही उपाधी सर्वप्रथम गौतम बुद्धांसाठी जन्माला घातली गेली होती. ही लवचिकता, सहिषणूता आणि स्विकारर्हता संस्कृतीचा अंगभूत गुण असतो.
अशा आपल्या या महान हिन्दू ‘संस्कृती’ला ‘धर्मा’चा वेष हा नंतर कधीचरी, राजकीय गरज म्हणून चढवला गेला. ‘संस्कृती’चा ‘धर्म’ झाला आणि संस्कृतीचा प्रवाह हळू हळू सुरु संकोचू लागला. आता तर ‘हिन्दू धर्म’ अशी ओळख सर्वच स्तरावर दृढ होऊ लागली आहे. आणि एकदा का संस्कृतीचा धर्म झाला, की मग तिच्यातली लवचिकता संपून ती कठोर, हार्ड होते. तिच्यातली आदानप्रदानाची क्षमता संपून तिचं जीतेपण नाहीसं होतं. ती नियमांच्या कडक बंधनात आणि काटेकोर कृत्रीम आचरणात आवळली जाते. तिचं वाहत्या नदीचं स्वरूप लोप पावून, ती एक डबकं बनून राहाते. तिचा क्षय होणं हे क्रमप्राप्त होतं. हिन्दू संस्कृतीचा धर्म बनण्याच्या या टप्प्यावर मला हिच भिती वाटतेय.
एकदा का धर्म म्हणून एखादी संस्कृती मान्य पावू लागली, की धर्माचे म्हणून जे काही नियम असतात, ते तिला लागू होऊ लागतात. हिन्दूना धर्माची व्याख्या लावून, तो हिन्दू हा धर्म आहे का, हे तपासणं मग आवश्यक होऊ लागतं. मी तोच एक प्रयत्न या लेखात करणार आहे.
कोणत्याही धर्माचे ‘आचार’ आणि ‘विचार’ हे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. या दोन स्तंभांना ‘आचारधर्म’ आणि ‘विचारधर्म’ असं म्हटलं जातं. कोणत्याही धर्माची व्याख्या या दोन मुद्दयांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. आचारधर्मात मुख्यत्वेकरून नजरेस दिसणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. यात केशभुषा-वेषभुषा, लग्न-जन्म-मृत्यू समयीचे संस्कार आणि पद्धती, संपत्तीचे वाटप, वारस, प्रार्थनेच्या पद्धती व वेळा, उपासाच्या पद्धती आणि ते किती व कोणते करावेत याचे नियम वैगेरे वैगेरे आणि अशा अनेक गोष्टींचं नियमीकरण केलेलं असतं. थोडक्यात एखाद्या विवक्षित धर्माच्या लोकांनी समाजात कसं वागायला हवं, याची एक चौकट आखली गेलेली असते. या चौकटीला फारशी लवचिकता नसते.
धर्माच्या विचारधर्म या दुसऱ्या व नजरेस न पडणाऱ्या भागात ईश्वर, त्याचं स्वरुप, स्वर्ग-नरक, मृत्यूनंतरचं जीवन, पुनर्जन्म, आत्मा आहे किंवा नाही, सृष्टीचं निर्माण व अंत इत्यादी पारलौकीक बाबींचा विचार केलेला असतो. कुठल्याही धर्माचा डोलारा उभा असतो, तो या विचारांवर. आचार हे त्याचे दृष्य स्वरुप मात्र असतं.
हिन्दु संस्कृतीचा धर्म होण्याच्या टप्प्यावर, मी या संस्कृतीचा पुरस्कर्ता असूनही, मला ती ‘धर्मा’च्या व्याख्येत बसते का, हे तपासावंसं वाटू लागलं. तशी सुरुवात केली आणि सुरुवातीस लिहिल्याप्रमाणे मी आज गोंधळलेल्या अवस्थेत आहे. उद्या माझे या संदर्भातले विचार नक्की कसे राहातील, हे आत्ताच सांगणं मला अवघड आहे.
उभ्या आडव्या पसरलेल्या आपल्या या देशात बहुसंख्य हिन्दू असुनही धर्म म्हणून ‘आचारा’त इतर प्रमुख धर्मांप्रमाणे कुठेही युनिफाॅर्मिटी दिसत नाही. हिन्दूंमधील अनेक जाती-पंथानुसार लग्न-जन्म-मृत्यू यांच्या प्रथा व पद्धती यांत भेद आहे. सण कोणते साजरे करावेत याविषयी साधारण समानता असली, करी ते कसे साजरे करावेत याविषयी वेगवेगळेपण आहे. देशातील विविध प्रांतांनुसार/जातींनुसार वेषभुषेत आणि केशभुषेतही तर आश्चर्य वाटावं इतकं वैविध्य आहे. जगभरातले मुसलमान स्त्री-पुरुष जसे सारख्याच वेषात आणि केशरचनेत, सणांत आणि त्यांच्या साजरीकरणात व इतर धार्मीक प्रथांत सारखेच असतात, तसं काही हिन्दूंमधे आढळत नाही. उलट विविधता ही हिन्दूसंस्कतीची ओळख आहे व इतकी विविधता असूनही ती एकच म्हणून हजारो वर्ष ओळखली जाते. ‘आचारधर्म’ या कसोटीवर हिन्दूत्व हे धर्म म्हणून टिकत नाही असं मला वाटतं. मग हिन्दूत्वाला धर्म म्हणण्याच्या नादात, आचाराची बंधनं येणार का आणि आपण ती मानणार का, हा पुढचा प्रश्न मला पडतो आणि माझं गोंधळलेपण वाढतं.
धर्माचा दुसरा आधारस्तंभ म्हणजे ‘विचार’. हा तर धर्माचा गाभा. जगातील इतर प्रमुख धर्मांमधे ‘ईश्वर’ किंवा ‘प्रेषित’ ही कल्पना सुस्पष्ट आहे, त्यात फारसे मतभेद नाहीत. धर्मग्रंथाबातही मतभेद नाहीत. ईश्वराला आणि धर्मग्रंथाला मानणं अनिवार्य असतं आणि कोणत्याही परिस्थितीत देवाची वा धर्मग्रंथाची अवहेलना वा समिक्षा खपवून घेतली जात नाही. हिन्दूंसंस्कृतीतली देवाची संकल्पना मात्र निराकार ते साकार आहे, आहे आणि मुळीच नाही, असल्यास कोणता देव, आस्तिक की नास्तिक, मृत्यूनंतरच जीवन या विषयांवर एकमत नाहीच. ईश्वर आहे असं मानण्याचं स्वातंत्र्य आपल्याला हिन्दू संस्कृती देते तसंच तो न मानण्याचंही स्वातंत्र्य हिच संस्कृती देते. देवाला मानणाराही हिन्दू म्हणून ओळखला जातो तसंच देवाला शिव्या देणाराही, तो नाहीच असं मानणाराही हिन्दूच असतो. मात्र हिन्दू हा एक धर्म आहे असं मान्य केलं, की मग एकच एक असा देव मानणं बंधनकारक होणार आणि मग नक्की कोणता देव मानावा, त्याची पुजा पद्धती कशी असावी याचे नियम अटी होणार का आणि ते आपल्याला मान्य होणार का असे अनेक प्रश्न, उपप्रश्न निर्माण होतात आणि माझा गोंधळ आणखा वाढतो. पारलौकिक बाबींच्या विचारावरही हिन्दूत्व ‘धर्म’ म्हणून टिकत नाही असं मला वाटतं.
थोडक्यात आचार आणि विचार या धर्माच्या मुख्य कसोंट्यांवर, इतर रुढं धर्मांप्रमाणे हिन्दुत्व ‘धर्म’ म्हणून टिकत नाही असं मला वाटतं.
‘आॅनर किलींग’च्या देशभरात घडणाऱ्या घटना असोत की नुकतंच घडलेलं पुण्यातलं खोलेबाई-यादव प्रकरण असो, या घटनांना व्यथित होऊन मला हिन्दूत्वाचा पुनर्विचार करावासा वाटला. हिन्दूंव्यतिरीक्त इतरांच्या दृष्टीने खोलेबाई आणि निर्मला यादव, या दोघीही हिन्दूच. मलाही कसंच वाटत होतं. हे सर्व हिन्दूच मात्र ते त्यांनाच मान्य नसावं, असं त्यांनी उचललेल्या पावलांवरून दिसतं. त्या दोघी स्वत:ला हिन्दू समजतात की नाही हे कळायला काही मार्ग नाही, परंतू त्यांच्या त्यांच्या जातीच्या आहेत हे मात्र मान्य करतात. दोघी हिन्दू असूनही त्यांची झालेला जातीची ही विभागणी आणि उच्च-निचतेची भावना इतकी तीव्र आहे, की एकमेकांचा नाईलाजाने झालेला वावरही त्या खपवून घ्यायला तयार नाहीत. त्यांनी एकमेकांच्या उपास्य दैवतांतही उच्च-निचतेची समिक्षा केली असं पेपरमधे वाचनात आलं. मग धर्माचा गाभा असलेला ‘देव’ नक्की कोणता, याचंही सर्वांना मान्य होईल असं समाधानकारक उत्तर हिन्दू संस्कृतीला धर्म म्हनणारांनी दिलं पाहिजे.
हिन्दूत्वाला धर्म मानलं, की मग माझ्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहातो तो म्हणजे, परधर्मातील काही लोकांना हिन्दू धर्म स्विकारावासा वाटला, तर ते हा धर्म कसा स्विकारणार, हा..! जेंव्हा असा एखादा हिन्दू धर्मात यायचं म्हणतो, तेंव्हा याला नेमक्या हिन्दूंच्या कोणत्या जातीत स्थानापन्न केलं जावं हे कसं ठरवणार, हा प्रश्न माझ्या मनात लगेच उभा राहातो. अशा एखाद्याला ज्या जातीत स्थानापन्न केलं जाईल, त्या जातीतले लोक त्याला स्विकारतील का, त्यांनी स्विकारलं तरी त्या जातीतलं त्याचं आणि त्याच्या मुलाबाळांचं नेमकं स्थान काय राहील, इतर जातीतले हिन्दू त्याला कसं वागवतील आणि त्याच्याशी कसं वागतील, हे व असे असंख्य प्रश्न मनाला छळू लागतात. लांछनास्पद असला तरी नंतरच्या काळात कधीतरी उदयाला आलेली जातीसंस्था एखाद्या संस्कृतीचा भाग झाली, मात्र धर्माला जाती मंजूर नसाव्यात हे इतर धर्माचं निरिक्षण केलं तर समजतं. जातीविरहीत हिन्दू धर्म हिन्दूंना मान्य आहे का, मग हिन्दूत्वाला धर्म म्हणनारे जातीसंस्थेचं उच्चाटन, प्रत्यक्षातलं आणि मनातलंही, कसं करणार, असे पुढचे प्रश्नही लगेच समोर उभे ठाकतात.
हिन्दू संस्कृती ‘धर्म’ म्हणून ओळखली जाण्याच्या टप्प्यावर, स्वत:ला हिन्दू म्हणवणाऱ्या प्रत्येकाने वर उपस्थित केलेल्या मुद्दयांचा गांभिर्याने विचार करायला हवा असं मला वाटतं. या लेखाचं प्रयोजन केवळ यासाठीच आहे. मला याबातीत आपण विचारपूर्वक दिलेली उत्तरं जाणून घेण्यात मला रुची आहे, नव्हे आपण हिन्दूंच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी तसं होणं आवश्यक आहे, असंही मला वाटतं.
— नितीन साळुंखे
9321811091
संदर्भ :
1. ‘ऐसपैस गप्पा दुर्गाबाईंशी’ या पुस्तकातील संस्कृतीच्या पाऊलखुणा हा लेख- लेखिका श्रीमती प्रतिभा रानडे, सन १९९८
2. ‘युगानुयुगे चाललेला ईश्वराचा शोध’- लेखक शंकरराव सावंत, सन १९९६
Leave a Reply