हिंदू धर्म संस्कृतीला लाभलेलं देणं म्हणजेच हिंदू धर्मातील सणवार पण हेच सणवार कधी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तर कधी बंधुत्व आणि प्रेमाचं प्रकटीकरण करण्यासाठी साजरे केले जातात. श्रावणातल्या सणासुदीची रीघ आणि गणेशोत्सवाची धामधूम संपली की, आपल्या पूर्वजांची आठवण काढणारा हा पितृ पंधरवडयाचा कालावधी सुरू होतो. हा पितृपक्षाचा काळ, त्यात केलं जाणारं पूर्वजांचं शास्त्रोक्त स्मरण, पितृपक्षाच्या अखेरच्या दिनी येणारी सर्वपित्री अमावस्या आणि तिचं महत्त्व यावर टाकलेला हा प्रकाशझोत. संतांच्या द़ष्टीतून श्राद्ध म्हणजे काय, तसेच या पक्षातील विविध तिथीवर प्रकाशझोत टाकणारा हा लेख आहे.
पितृपक्ष पंधरा दिवसच का असतो?
श्रावण महिन्यातली सणाची लगबग संपली की, पितृपक्षाला सुरुवात होते. गणरायाचं विसर्जन झालं की, भाद्रपद पौर्णिमेला हा पंधरवडा सुरू होतो आणि या पंधरावडयाचा कालावधी भाद्रपद अमावस्येला समाप्त होतो. या पक्षाला म्हाळाचा महिना किंवा तर्पणाचा महिना म्हणूनही ओळखले जाते. हा पक्ष पंधरा दिवस ठेवण्यामागे एक गहन शास्त्र दडलं आहे.
आपण आपल्या लोकांशी प्रेमभावनेनं वागावं म्हणून सणासुदीचा घाट पूर्वजांनी घालून दिला आहे. खरं तर सर्वपित्री हा मृतांसाठी आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता आणि त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी राखून ठेवलेला काळ आहे. प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही शास्त्रीय कारण असतं, त्याचप्रमाणे या पंधरा दिवसांमागे अनेक गूढ कारणं असलेली पाहायला मिळतात.
मनुष्याला मनुष्यदेह मिळवण्यासाठी फार सायास करावे लागतात. पण मनुष्य जन्माला येऊनही काही जणांना मनुष्यदेहाचं सार्थक करता येत नाही. काही जणांच्या भावना, कल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांचं आयुष्य कमी पडतं आणि काही कारणामुळे अशांना जगायला खूपच कमी कालावधी मिळतो.
अशांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छाआकांक्षा पूर्ण व्हाव्यात आणि गत:प्राण झालेल्या आपल्या नातेवाइकांना मोक्ष मिळावा, म्हणून आपल्या कित्येक पिढय़ांपूर्वीपासून हा पितृ पंधरावडा हयात नसलेल्यांसाठी खास राखून ठेवला असल्याचे काही जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे.
सर्वपित्री अमावस्या हा कालावधी पंधरा दिवस का, हा प्रश्न अनेकांना पडलेला असतोच. वर्षभर लोकांची आठवण न काढता याच पंधरा दिवसांत कर्मकांडाचे आणि मृत्यूनंतरचे विधी आणि श्राद्ध का केलं जातं, हा राहून राहून पडणारा प्रश्न सर्वानांच भेडसावत असेल खरं तर या मागे एक दंतकथा ऐकायला मिळते की, एकदा एका वशिष्ठ गोत्र असलेल्या ब्राह्मणांच्या पित्यांचा मृत्यू झाला.
खरं तर श्रावण महिन्यातच या वृद्ध ब्राह्मणाची अवस्था हालाकीची होती, पण देवाच्या भक्तीमुळे त्यांने श्रावणासारख्या पवित्र महिन्यात आपले प्राण सोडले नाहीत. पण श्रावणानंतरच्या पहिल्याच पौर्णिमेला त्याचा देहांत झाला आणि ही गोष्ट तो ब्राह्मणाचा मुलगा पचवू शकला नाही. पित्यावरील अपार प्रेमामुळे तो अगदी खुळसटासारखं वागू लागला आणि देवालाच धारेवर धरू लागला.
त्या वृद्ध ब्राह्मणांच्या मुलांने त्यांच्या पित्याला जिवंत करण्यासाठी याग केला. परंतु देवाने त्याला सांगितले की, ‘‘तुझ्या पित्यांचा काळ इतकाच होता. यापुढे त्याच्या यातना तुला सहन झाल्या नसत्या म्हणूनच त्याने स्वत: देहत्याग केला आहे.
आता तू याग यज्ञ करणं सोडून दे आणि पित्याला मरणोत्तर गती मिळण्यासाठी त्याचं विधिवत श्राद्ध घाल. आणि त्यांच्या आवडीचा पदार्थ करून येणा-या अमावस्येला पशुपक्ष्यांना घाल. हा विधी केल्यामुळे तुझ्या वडिलांबरोबरच त्यांच्या बरोबरील २१ कुळांतील लोकांना मोक्षगती मिळण्यास मदत होईल.
तुझ्या या पंधरा दिवसांच्या यज्ञामुळे येथून पुढे कोणीही या पंधरावडयात यज्ञयाग करणार नाही आणि फक्त श्राद्ध आणि गत:प्राण झालेल्या लोकांसाठीच हा पंधरावडा ओळखला जाईल. या पंधरावडयात कोणतंही शुभ करू नकोस आणि आपल्या केस, दाढीचे मुंडण करू नकोस असं सांगून देवांनी प्रस्थान केलं. खरं तर या दंतकथेमुळेच पंधरा दिवसच श्राद्ध केलं जातं असा समज आहे. ज्या कोणाला आपल्या पूर्वजांची स्वर्गारोहण तिथी माहीत नसेल तर त्यांनी याच महिन्यात सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध घातले तरी चालते.
या पंधरा दिवसाचा शास्त्रशुद्ध संबंध आहे कारण, जे ब्रह्मांडात आहे ते पिंडात आहे असे संतरचनेत जागोजागी पाहायला मिळते.
Leave a Reply