पेशवाईतील नाना फडणीस यांच्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी भल्याभल्यांना नमविले. पेशवाईत त्यांच्या नावाचा वेगळाच दबदबा होता.
एकदा एका सरदाराने नाना फडणिसांना भोजनाचे निमंत्रण दिले. नानांना खूप करण्यासाठी त्या सरदारने भोजनाचा खास राजेशाही थाट ठेवला. आपण सरदार असल्यामुळे त्या कार्यक्रमात कसलीही कसर ठेवायची नाही हे त्यांनी आधीच ठरविले होते.
त्याप्रमाणे त्याने सर्व व्यवस्था केलेली होती. काय हवे काय नको, हे विचारायला जागोजागी माणसे होती. भोजनाचा बेत तर एकदमच मस्त होता.
वेगवेगळ्या पदार्थांचा अक्षरशः घमघमाट पसरला होता. पंक्तीत बसल्यापासून ते भोजन संपवून उठेपर्यंत कसल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. भोजनास सुरुवात झाली. नानांनी नेहमीप्रमाणे आजूबाजूला पाहून निरीक्षण करायला सुरुवात केली. सरदार त्यांना आग्रहाने एकेक पदार्थ वाढत होते. भोजन होत आलेले असतानाच सरदारांनी नानांना सगळे काही व्यवस्थित मनाप्रमाणे आहे ना, असे विचारले.
त्यावर नाना त्यांना म्हणाले, हो, सगळे काही व्यवस्थित आहे मात्र मला एकाच गोष्टीची उणीव जाणवली. त्याबरोबर त्या सरदाराचा चेहरा थोडा उतरला. नाना म्हणाले, सर्व व्यवस्था उत्तम आहेच समोरच्या समईकडे बोट दाखवून म्हणाले, फक्त त्या समईची वात पुढे सरकविण्यासाठी तेथे काडी ठेवलेली नाही. ते ऐकून त्या सरदारासह आजूबाजूचे सर्व लोक थक्क झाले.
असे म्हणतात की, तेव्हापासून ‘काडीइतकीही चूक नाही’ असे म्हणण्याचा प्रघात पडला.
Leave a Reply