श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो
ऐका विनवितो
श्री विष्णु अवतार घेतो
ह्या सृष्टीवर ||१||
दुष्टांचा होई अनाचार
पृथ्वीते होई पापभार
त्यांचा करण्या संहार
परमेश्र्वर अवतरती ||२||
कंस राजा दुष्ट
स्वतःस समजे श्रेष्ठ
प्रजेला देई कष्ट
स्वार्थापोटी ||३||
छळ करु लागला जनांचा
लुटमार अत्याचार छंद त्याचा
खूनही करी साधूसंतांचा
दुष्टपणे ||४||
कंसाची देवकी बहीण
चित्त तिचे परमेश्र्वरी विलीन
सात्विक होते तिचे मन
परमेश्र्वराठायीं ||५||
देवकीचे लग्न ठरले
वसुदेवाला तिनें वरले
सर्व कार्य पार पडले
कंस राजा घरी ||६||
देवकी वसुदेवासंगे बैसली
भोयांनी डोली उचलली
वरात घरी जाण्या निघाली
कंस भावा घरुन ||७||
कंस राजा चाले संगे
वरातीच्या मागोमगे
निरोप देण्या तिजलागें
वसुदेव देवकीसी ||८||
वरात येता गांव वेशीला
एक चमत्कार घडला
आकाशवाणी झाली त्या वेळेला
चकीत होती सर्वजण ||९||
कंस राजा तूं मातला
नष्ट कराया तुजला
विष्णू अवतरती पृथ्विला
देवकीचे पोटी ||१०||
देवकी वसुदेवाचे आठवे बाळ
कंसाचा तो कर्दनकाळ
योग्य येता वेळ
ठार करील कंसाला ||११||
देवकी पुत्र शत्रु माझा
दचकून गेला कंस राजा
विस्मयचकीत झाली प्रजा
आकाशवाणी ऐकूनी ||१२||
कंसाने विचार केला
देवकीपुत्र जन्मता मारण्याला
बंदीस्त केले त्याना
ठार करण्या बाळ तयांचे ||१३||
एका मागुनी एक मारीले
सात पुत्राना ठार केले
पापाचे तेंव्हा घडे भरले
कंसाचे ||१४||
आठव्या वेळी देवकीस
गर्भ राहता नऊ मास
आगळाच होत असे भास
चमत्कार घडला ||१५||
पृथ्वी पावली समाधान
सृष्टी गेली बहरुन
प्रफूल्ल झाले वातावरण
स्वागत करण्या प्रभूचे ||१६||
पूर्वीचे सर्व बदलले
दुःखी मन पालटले
रोम रोम ते आनंदले
चिंता न उरली देवकीस ||१७||
प्रभू आगमनाची तयारी
सर्व देव मिळूनी करती
देवकीस सांभाळी
आपली शक्ती देवूनीया ||१८||
सुर्य उधळी प्रकाश
वरुण जल शिंपी सावकाश
वायु लहरी फिरती आकाशी
देवकीसाठी ||१९||
बागेत पसरला सुगंध
वातावरण होई धुंद
देवकीचा आनंद
द्विगुणीत झाला ||२०||
देवकीचे सारे चित्त
प्रभुचरणी जात
झाली ती निश्चिंत
भार ईश्वरी सोडूनी ||२१||
श्रावणमासे कृष्णपक्षे आष्टमीला
मध्यरात्रीचे सुमाराला
देवकीचे बाळ आले जन्माला
ईश्वर अवतार घेई ||२२||
सर्व वातावरण शांत
बाळ करी आकांत
परी सर्व होते निद्रिस्त
कारागृहाचे द्वारपाल ||२३||
थकून देवकी झोपली
बाळ तिचे पदराखालीं
वसुदेवासी चिंता लागली
बाळाची ||२४||
झाला एक चमत्कार
साखळदंड तुटूनी उघडले दार
विजेमुळे मार्ग दिसे सत्वर
वसुदेवाला ||२५||
त्वरीत उठूनी बाळ उचलले
तयासी टोपलीत ठेवले
डोईवर ठेवूनी चालले
वासुदेव ||२६||
वसुदेव चालला
नागराज पाठी आला
फणा काढूनी वाचवी बाळाला
पावसापासून ||२७||
वसुदेव यमुनाकाठी
दुथडी वहात होती
निश्चयी पाण्यांत शिरती
बाळ घेऊन ||२८||
पाण्यांत टाकता पाय
यमुना ही दर्शना धाव
ईश्वरचरणीं स्पर्श होय
पावण होणेसी ||२९||
पाण्याची पातळी वाढली
चरणस्पर्श होता दुभंगली
वाट करुनी दिली
वसुदेवाला ||३०||
पैलतिरी गांव गोकूळ
नंद गवळ्यातील श्रेष्ठ सकळ
पत्नी यशोदे झाले बाळ
त्याच रात्रीं ||३१||
कन्या होती आदिमाया
ईश्वर सुरक्षे जन्म घ्याया
ईच्छित त्याचे कार्य कराया
आली उदरी यशोदेच्या ||३२||
घर नंदाचे उघडे
यशेदा निद्रिस्त पडे
लक्ष्य नव्हते कन्येकडे
घरातील लोकांचे ||३३||
बाळ ठेवले यशोदेपासी
उचलून घेतले कन्येसी
पांघरुन घालूनी बाळासी
वसुदेव परतला ||३४||
मुलीस घेऊन आला
ठेवी देवकीच्या कुशीला
कोण जाणील ह्या लिला
प्रभूविणा ||३५||
बंद झाले द्वार पूर्ववत
मुलीने केला रडूनी आकांत
द्वारपाल जागविले त्वरित
ते खबर देई कंसाला ||३६||
कंस आला धाऊन
सर्व लष्कर घेऊन
बाळ मारावे म्हणून
आपल्या शत्रुते ||३७||
कन्या बघूनी चकीत झाला
कां फसवितोस मजला
शिव्या देत असे प्रभुला
मुलीचे रुप बघूनी ||३८||
मुलीस घेतले बळजवरीं
आपटण्या दगडावरी
हात नेता आपले शिरीं
कन्या हातून निसटली ||३९||
चमत्कार घडला त्या समयीं
कन्या आकाशी जाई
अचानक अकाशवाणी होई
त्यावेळी ||४०||
आठवे बाळ नंदा घरी
ईश्वर रुप अवतारी
येतां वेळ ठार करी
कंसा तुला ||४१||
आकाशवाणी ऐकोनी
घडला चमत्कार बघून
कंसा ते कापरे भरुनी
राजगृही परतला ||४२||
कंस प्रयत्न जाय निष्फळ
विधी लिखीत असे अटळ
कोण रोकती काळ
प्रभूविणा ||४३||
इकडे यशोदे देखिले
बाळ गोजिरे वाटले
आनंदमय गांव झाले
बाळाचे आगमनें ||४४||
नांव श्रीकृष्ण ठेविले
नंदाघरी वाढले
गोपाळांत खेळले
आनंदरुप ||४५||
यशोदाघरी देवकीचे बाळ
ठार केले कंसा येता वेळ
मारले नंतर दुष्ट सकळ
श्रीकृष्णाने ||४६||
श्रीकृष्णाचा अवतार
दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत दुर्बलांना तो आधार
करसी दुःखाचा निवार
प्राणीमात्रासाठी ||४७||
जन्माष्ठमीचा उत्सव
ओतून त्यांत भक्तीभाव
साजरा करिती सर्व
प्रेमभरे ||४८||
श्रीकृष्ण सांगे गीता
युद्धभूमीवर असता
कौरव पांडव युद्धा सज्ज होतां
अर्जूनासी ||४९||
भगवत् गीता महान
ग्रंथ म्हणून मान
जीवनाचे तत्वज्ञान
तयामध्यें ||५०||
श्रीकृष्णभक्तांनी
वाचावी ही कहाणी
भक्तिरुपें होऊनी
रोज एकदां ||५१||
।। शुभं भवतु ।।
डॉ. भगवान नागापूरकर
७- १००८८३
Leave a Reply