२१ सप्टेंबर ही अनेक चांगल्या कॅरिबिअन खेळाडूंच्या जन्माची तारीख आहे. कर्टली अम्ब्रोज, क्रिस गेल, लिअरी कॉन्सटन्टाईन इ. सन १९०१ मध्ये या तारखेस एका त्रिनिदादी नागरिकाचा, क्रिकेटपटूचा, पत्रकाराचा, प्रशासकाचा, विधिज्ञाचा आणि राजकारण्याचा जन्म झाला. लिअरी निकोलस कॉन्सटन्टाईन नावाच्या बहुमुखी प्रतिभेच्या ‘त्या’ बालकाला अवलिया आणि कलंदर दोन्ही एकाच वेळी म्हटले तरी कमी पडावे अशी गत आहे. ’कॉनी’ हे त्याचे लाडनाव.लिब्रुन कॉन्स्टन्टाईन नावाच्या एका क्रिकेटपटू (आणि मळ्यावर कामगार असलेल्या) व्यक्तीच्या पोटी जन्माला आलेल्या लिअरीने क्रिकेट कारकीर्द सुरू करण्यापूर्वी एका वकिलाच्या कार्यालयात काम केले. १९२३ साली ब्रिटिश गुयानाकडून कॉन्सन्टाईन पितापुत्र प्रथमश्रेणी सामना खेळले. क्रिकेट इतिहासातील अत्यंत दुर्मिळ घटनांपैकी ही एक. आपल्या मुलाच्या क्षेत्ररक्षणावर लिब्रुन यांनी जातीने लक्ष दिले. १९२८ साली इंग्लंड दौर्यात लिअरीने पदार्पण केले. एक भेदक वेगवान गोलंदाज, खमक्या फलंदाज आणि कुठेही चपळतेने क्षेत्र राखू शकणारा रक्षक अशी त्याची क्रिकेटकौशल्ये डोळे दिपवणारी ठरली. पुढच्याच वर्षी तो इंग्लंडमधील लॅंकेशायर क्रिकेट लीगकडून खेळू लागला. त्याने खेळलेल्या दहा हंगामांपैकी आठ हंगामांमध्ये लॅंकेशायरने विजेतेपद मिळवले. तो या लीगमध्ये खेळण्याचे कारणही अद्भुत आहे – वर्णभेदाचा डाग पुसून काढण्यासाठी त्याला कायद्याचा अभ्यास करायचा होता. हा अभ्यास इंग्लंडमध्येच शक्य होता आणि त्या अभ्यासासाठी लागणारा पैसा त्याला इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळून सहज मिळवता येणार होता !पदार्पणानंतर आपल्या एका मित्रासोबत मिळून कॉनीने ‘क्रिकेट अन्ड आय’ नावाचे पुस्तक लिहिले. आणखी २१ वर्षे त्याला पुस्तक लिहिण्यास सवड मिळणार नव्हती. या पुस्तकाचा सह
लेखक असलेल्या जेम्सच्या म्हणण्यानुसार ‘क्रिकेटपटू म्हणून असलेली प्रथमश्रेणी आणि माणूस म्हणून असलेली तृतीय श्रेणी यांच्यामधल्या क्रांतिकारी फरकाविरुद्ध कॉनीने क्रांती उभारली.’ त्याची मैदानावरील एक खास सवय आता कॅरिबिअन लोकसमजुतीचा
भाग बनली आहे. त्याने टाकलेला चेंडू फलंदाजाने मारला की तो गोलंदाजीसाठी जिथून धावे तिकडे चालत
जायला सुरुवात करी. त्याच्या ‘पाठीच्या’ दिशेने आलेली क्षेत्ररक्षकाची फेक तो क्षणार्धात (चेंडू दिसत नसतानाही) पकडत असे. या ‘लीलेत’ तो कधी चुकला किंवा त्याचा अंदाज कधी हुकला असे झाले नाही. एखाद्या तासात तो बॅट हातात घेऊन सामना जिंकवून देऊ शकत असे. एखाद्या स्पेलमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणवू शकत असे आणि त्याच्याकडे आलेला झेल किंवा धावबादचा बकरा कधीही वाचत नसे.आपले निम्मे आयुष्य कॉनीने इंग्लंडमध्ये व्यतीत केले. दुसर्या महायुद्धाच्या काळात तो ब्रिटिश सरकारच्या कामगार खात्यात कामगार कल्याण अधिकारी म्हणून होता. त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पहिल्या लोकनियुक्त संसदेत तो खासदार म्हणून निवडला गेला. तो श्रममंत्री होता. नंतर १९६२ ते १९६४ या काळात तो लंडनमध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगोचा उच्चायुक्त होता. बी. बी. सी. मध्येही काही काळ तो अधिकारपदावर होता. क्रिकेट इन द सन, हाऊ टू प्ले क्रिकेट, क्रिकेटर्स कार्निवल, द चेंजिंग फेस ऑफ क्रिकेट, कलर बार ही त्याची इतर काही पुस्तके.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply