२००५ मध्ये, मी रस्टनबर्ग (इथेच जगप्रसिध्द “सन सिटी” आहे!!) इथे नोकरी करताना, ध्यानीमनी नसताना, Standerton इथे नोकरी करायची संधी मिळाली. त्यातून, भारतातील प्रसिद्ध United Breweries या ग्रुपच्या इथल्या कारखान्यात फायनान्स विभागाचा प्रमुख म्हणून वरिष्ठ अधिकारी अशी म्हणून नेमणूक झाली. त्यामुळे, अर्थातच आनंद झाला. त्याचबरोबर इतक्या वर्षात संपूर्णपणे एकट्याने राहावे लागणार, हि जाणीव झाली. वास्तविक, या देशात मी १९९४ मध्ये आलो आणि तेंव्हापासून मी कुणाबरोबर तरी रहात होतो. इथे तशी सोय होणे अशक्य!! Standerton या गावाचे नावच मुळी मी प्रथमच ऐकले होते, त्यामुळे चार लोकांकडे थोडी चौकशी केली. चौकशी अजिबात उत्साहवर्धक नव्हती, कारण, एकतर हे गाव अगदी अंतर्भागात, अगदी साधा मॉल देखील नाही, थंडी प्रचंड असते आणि भारतीय तसेच भारतीय वंशाचे फारच कमी लोक तिथे राहतात. म्हणजे वस्ती म्हणायची तर, काळे,गोरे आणि कलर्ड, यांचीच वस्ती प्रामुख्याने.
तरीही, मनाचा हिय्या करून तिथे गेलो. कंपनीने सुरवातीला तिथल्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केली होती. हॉटेल स्टेला नावाची युवती (तेंव्हा वय तिचे ३० होते, अर्थात प्रथम घटस्फोटीत!!) चालवत होती. रंगाने गोरी आणि अतिशय हसतमुख!! मी पक्का भारतीय, हे समजल्यावर अर्थात, बीफ किंवा पोर्क खाणार नाही अशा समजुतीत होती. यापूर्वी, मी हे खाल्ले आहेत, हे सांगितल्यावर ती थोडी चकितच झाली पण मी तिला, शक्यतोवर चिकन किंवा मटण, हेच सांगितले. जेंव्हा गेलो, तेंव्हा तिथला उन्हाळा सुरु झाला होता. या हॉटेलमध्ये मी जवळपास दोन आठवडे रहात होतो.
वास्तविक, Standerton हे जोहान्सबर्ग शहरापासून १८० किलोमीटर आत आहे. शहरापासून म्हणजे, जिथे दक्षिण जोहान्सबर्ग संपते (उपनगरे धरून!!) तिथून पुढे आत, १८० किलोमीटर!! डोंगराच्या उंचावर असे हे गाव आहे, लोकवस्ती साधारणपणे, लाख,दीड लाख, त्यामुळे सगळेच सगळ्यांना व्यवस्थित ओळखतात. आता, इथे पूर्वीसारखा वर्णद्वेष नसल्याने, हिंडाफिरायला चांगले आहे. गावाचा आकार अटकर असल्याने, प्रचंड वेगाने गाडी चालविणे शक्यच नाही.
साउथ आफ्रिकेत राहती घरे ही बहुश: बैठी असतात, कार्यालयीन इमारती मात्र उंच असतात. आल्यानंतर प्रथम काम म्हणजे कार्यालयीन कारभार समजून, सुरवात करणे, माझ्या आधीचा माणूस, राम नायडू, याची दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्याने, इथे मला संधी मिळाली. हा वास्तविक, भारतीय परंतु आता याची इथली चौथी पिढी, त्यामुळे केवळ नावापुरता भारतीय, हिंदीचा गंध देखील नाही. पण सुरवातीची ३ दिवस त्याच्याकडे दुपारच्या जेवणाची सोय झाली. इथला लंच म्हणजे, बहुश: sandwich!! परंतु KFC, SPAR इथून तयार थंड खाणे मागवण्यापेक्षा रामच्या घरून आलेले चांगले होते. नंतर तो गेल्यावर मात्र, प्रश्न उद्भवला. हॉटेलमध्ये दुपारचे खाणे, अशी सोय नसायची!! म्हणजे मिळायचे नाही असे नव्हे, पण मग त्यासाठी स्पेशल ऑर्डर देण्याची गरज असायची!! आता, राम देखील नाही म्हटल्यावर तिथून मागवण्याशिवाय पर्याय नव्हता!!
तेव्हढ्यात मला, एक छोटेसे घर मिळाले. १ बेडरूम,किचन आणि लाउंज असे ते घर होते. मी एकटाच रहात असल्याने, मला ते चांगले होते. उन्हाळ्याचे दिवस जरी असले तरी आणि माझा इथला जवळपास १० वर्षांचा अनुभव जमेस धरला तरी थंडी जाणवायची, विशेषत: पाऊस पडला, की वातावरणात चांगलाच गारवा पसरायचा. इथे गारवा निर्माण होण्यासाठी पावसाची तुरळक सर देखील पुरेशी आहे. एव्हाना, दोन आठवडे झाले, माझ्या डिपार्टमेंटमध्ये २ भारतीय वंशीय तर ३ गोऱ्या व्यक्ती काम करीत होत्या. माझा Accountant स्टीवन नामक गोरा, डेला आणि बार्बरा या गोऱ्या मुली, ली नावाची भारतीय वंशीय मुलगी, असे काम करीत होते. सुरवातीला, अर्थात “झळ” बसली, मला त्याचे कारण नंतर समजले, रामच्या जागी स्टीवनला येण्याची इच्छा होती आणि माझ्या येण्याने, त्याची संधी हुकली!!
त्यामुळे, त्याचा माझ्यावर “दात” होता. माझा Factory General Manager स्टीफन याच्याकडून मला ही माहिती कळली. माझ्या साउथ आफ्रिकन कारकिर्दीत, स्टीफन हा मला भेटलेला सर्वोत्तम गोरा माणूस. आता, गोऱ्यांचे राज्य राहिले नसून, नव्या वातावरणाशी जुळवणे क्रमप्राप्त आहे, याची, याला जितकी खोल जाणीव होती, तितकी त्याआधी आणि नंतर देखील, माझ्या संपर्कात आलेल्या कुठल्याही गोऱ्या माणसाला नव्हती. मी, या गावात नवीन आहे तसेच हे गाव, म्हणजे अगदी गाव म्हणावे असे मागासलेले आहे, असे असेल, परंतु त्याने माझ्यावर अतिशय प्रेम केले, इतके की महिन्याभरात, त्याने, त्याच्या घरात जेवायचे आमंत्रण द्यायला सुरवात केली.
नवीन घर तसे फर्निचरयुक्त जरी असले तरी स्वयंपाकाची भांडी घेणे आवश्यक होते. सुदैवाने, याच वेळेस, भारतात्न, माझा एल मित्र, प्रदीप मुळावकर, इथे एका सेमिनारसाठी जोहान्सबर्ग इथे येणार होता. त्याला लगेच जेवणाचा कुकर आणायला सांगितले. साउथ आफ्रिकेत, भारतीय लोक इतके आहेत, ( यात माझ्यासारखे किंवा पिढ्या न पिढ्या राहणारे, दोन्ही!!) की अशा गावात देखील भारतीय मसाल्यांची, डाळींची, भाज्यांची अजिबात चणचण भासत नाही. जसा प्रदीप इथे आला, तशी मी त्याला भेटायला गेलो.
त्याच्याबरोबर राजेंद्र गोगटे नावाची व्यक्ती आली होती. त्यावेळेस माझ्याकडे स्वत:ची गाडी नव्हती (इतकी वर्षे कंपनीची गाडी!!) त्यामुळे कंपनीच्या राखीव गाडीबरोबर,कंपनीचा ड्रायव्हर, त्यातून, तोपर्यंत,मी जोहान्सबर्ग फारसे पहिले नव्हते, त्यामुळे कंपनीच्या ड्रायव्हरशिवाय पर्याय नव्हता. मी, प्रदीप आणि राजेंद्र गोगटे, असे एकत्रित असल्याने आणि सुदैवाने, नव्याने ओळख झालेले राजेंद्र गोगटे आमच्याच सारखे समस्वभावी निघाल्याने चार दिवस भन्नाट धमाल!! प्रदीपने येताना, आठवणीने पुरणपोळी, ठेपले असे खास भारतीय पदार्थ आणले होते. जे परदेशात रहातात आणि अधिक करून, जिथे नोकरीनिमित्ताने फारसे भारतीय रहात नाहीत, अशा लोकांना “पुरणपोळीचे” अप्रूप अधिक जाणवेल.
असो, लगेच ऑफिसमध्ये कामाला सुरवात झाली. जसे काम सुरु झाले तशी गोऱ्या लोकांचे राजकारण देखील. लगेच काही माहिती द्यायची नाही, रिपोर्ट्स लगेच द्यायचे नाही, फायली दडवून ठेवायच्या इत्यादी कुचाळक्या सुरु झाल्या. अर्थात,हे आणि असे अनुभव मी, पूर्वीच्या नोकरीत घेतलेले असल्याकारणाने, मला त्याचा फारसा त्रास झाला नाही. माझ्या कामात, एक गोष्ट नव्याने करायला लागली आणि ती म्हणजे डेपो भेटी, अधिक करून Stock Check.माझ्या अखत्यारीत ४ डेपो होते. जरी कंपनी U.B.ग्रुपमधली असली तरी बियर उत्पादन वेगळे होते (अजूनही आहे) म्हणजे प्रसिध्द किंगफिशर बियर नसून, लोकल बियर – हलक्या प्रतीची बियर. फायनान्स प्रमुख म्हणून अधून,मधून Factory visit अत्यावश्यक!! त्यानिमित्ताने बियर कशी बनविली जाते, हे समजले.
अर्थात, २ वर्षाच्या कालावधीत, मी, केवळ २ वेळा, दोनच थेंब ती बियर चाखली आणि ती देखील नवीन product launch निमित्ताने!! धाडसच झाले नाही!! आमचा बिझिनेस सगळा Cash Basis वर!! त्यामुळे, व्यवहार सतत डोळ्यात तेल घालून करावा लागत असे. बदलत्या काळानुसार, कायदा आणि सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न उभे राहिले होते (आता तर त्यात अधिक वाढ झाली आहे!!), सुरक्षा व्यवस्था जरी माझ्याकडे नसली तरी अखेर एक जबाबदार अधिकारी म्हणून उत्तरदायित्व मला घ्यावेच लागायचे. नवीन डेपो उभारायचे, नवीन पब्स तयार करायचे, हा माझ्या कामाचा भाग होता. त्यानिमित्ताने, तत्सम agreements वगैरे किचकट गोष्टी पार पडणे गरजेचे होते.
इथेच मला गोऱ्या समाजाचे फार जवळून निरीक्षण करता आले, म्हणजे तो समाज, त्यांची कुटुंबव्यवस्था, संस्कृती (यात त्यांची लग्ने वगैरे…. माझा Accountant माझ्याच काळात तिसऱ्यांदा लग्नात अडकला होता!! पण ते नंतर….) त्यांचे जेवणखाण इत्यादी अनेक गोष्टी समजल्या. इथेच मी हा भाग संपवितो, पुढील भागात, साउथ आफ्रिकेतील दुर्दैवी दशावतार, याबाबत लिहीन, जे इथेच,नको तितक्या जवळून अनुभवायला मिळाले.
– अनिल गोविलकर