पॉप क्वीन उषा उत्थुप यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९४७ रोजी मुंबई येथे झाला.
उषा उत्थुप यांचे वडिल पोलीस अधिकारी. त्यांचे बालपण गेलं ते भायखळ्यातल्या पोलीस क्वार्टरमध्ये. पारंपारिक तामिळ ब्राम्हण घरात शास्त्रीय संगीत शिकण्याची पद्धतच असते. त्यामुळे उषा उत्थुप यांच्या घरात शास्त्रीय संगीत होतेच. पण मुळात उषा उत्थुप यांचा आवाजच वेगळ्या पठडितला. त्यामुळे संगीत शिकताच येणार नाही, असं शिक्षकांनीच घोषित करून टाकलं होतं. त्यांच्या मोठ्या बहिणी आणि भाऊ मात्र संगीताचा रियाझ करायचे. त्यांचं पाहून थोडंफार संगीत शिकता आलं, तेवढंच काय ते शास्त्रीय प्रशिक्षण.
रॉक, पॉप, जॅझ या पद्धतीची गाणि सिलोन रेडिओवर ऐकत असतांना आपल्या आवाजाला साजेसं संगीत हेच असावं, अशी अनुभुती झाली. शिकवणारं तर कुणी नव्हतंच. मग स्वतःच ऐकून ऐकून शिकणं सुरू झालं. शास्त्रीय संगीत शिकणा-या उषाच्या मोठ्या बहिणी कधीमधी रेडिओवर गात असत. त्यांच्याबरोबरच रेडिओस्टेशन वर आलेल्या नऊ वर्षाच्या उषाचा आवाज अमिन सयांनींनी ऐकला आणि त्यांना एक गाणं गाण्याची संधी दिली. ‘मॉकींगबर्ड हिल’ हे रेडिओवर गाजणारं गाणं सादर झालं. आणि त्यानंतर बरेचदा रेडिओवर पॉप संगीत म्हणण्याची संधी मिळाली. रंगमंचावर गाणं सादर करण्यासाठी मात्र आपल्या मुळगावी, चेन्नईला जावं लागलं. चेन्नईमध्ये माऊंट रोडवरच्या नाईन जेम्स नाईटक्लबमध्ये सहज म्हणुन नातेवाईकांबरोबर गेलेल्या उषाने त्यांच्या आग्रहास्तव क्लबच्या बॅंण्डबरोबर गाणं सादर केलं. मॅनॅजरला ते ईतकं आवडलं, की तीने आठवडाभर क्लबमध्ये रोज गाणं म्हणावं अशी गळ त्याने घातली. सात दिवसांच्या गाण्याचं मानधन म्हणुन कांजीवरमची साडी मिळाली. तेव्हापासुनच मग हीच साडी उषाजींचा ट्रेडमार्क बनली.
मुळात पॉप, जॅझ या पाश्चात्य गाण्याला, त्यातही नाईटक्लबमध्ये गाणी म्हणण्याला त्या काळी अजीबातच प्रतिष्ठा नव्हती. उषाजींच्या ‘सादगी’ मुळे या क्षेत्राला भारतात मानाचं स्थान मिळवता आलं. साडी, गजरा, दागीने ही त्यांची वेषभुषा त्यांचं भारतीयत्त्व जपत गेली, आणि पाश्चात्य संगीत सादर करणारी ही तरूणी देखील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सादर करणा-या कोणत्याही घराण्याच्या गायिकेपेक्षा वेगळी नाही, हे लोकांना लक्षात येऊ लागलं.
कलकत्त्याच्या त्रींकास नाईट क्लब मध्ये गात असतांनाच त्यांची गाठ जानी चाको उत्थुप यांच्याशी पडली. मुळच्या केरळमधील कोट्टायमच्या असलेल्या या युवकाशी विवाह करूनच त्या उषा उत्थुप झाल्या. कलकत्ता, मुंबई, दिल्लीत नाईट क्लब्समध्ये गाण्याचे कार्यक्रम होतच होते. दरम्यान काही अल्बम्सही रिलिज झाले. नाव मात्र व्हायचं राहिलं.
१९७० च्या सुमारास दिल्लीतल्या ओबेरॉय इंटरकाँटिनेंटल हॉटेलात गात असताना त्याच हॉटेलात देवआनंद आणि त्यांच्या नवकेतनमधील काही सहका-यांचा मुक्काम होता. त्यात संगीतकार राहुलदेव बर्मनही होते. ‘हरे राम हरे कृष्ण’मध्ये हिप्पींच्या ‘दम मारो दम’ गाण्याची जुळवाजुळव सुरू होती. नेहमीपेक्षा वेगळ्या आणि हिप्पी संस्कृतीशी जुळेल अशा आवाजाच्या शोधात आरडी होते. उषाचा आवाज त्यांच्या मनाला एकदम भिडला आणि मग ही मंडळी उषाला भेटली. ‘हरे राम हरे कृष्ण’मधल्या आवाजाने चांगलीच धूम मचवली आणि उषाचं नाव देशभर झालं.
सत्तर आणि ऐशींच्या दशकात आरडी आणि बप्पी लेहरी सारख्या संगीतकारांकडे उषाजींनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली. खुप गायला मिळालं नाही, पण जेवढं मिळालं ते खुप गाजलं. म्हणुन मग स्टेज शो करण्यावर भर दिला. स्टेज शो च्या निमित्ताने त्यांना भारतभर फिरायला मिळालं. अनेक स्थानिक भाषा यामुळे आत्मसात करता आल्या.
तामिळ, तुळू, तेलुगु, मराठी, कोकणी, बंगाली, पंजाबी, कन्नड, मल्याळम, गुजराती, ओरीया, आसामींसह सतरा भारतीय भाषा आणि ईंग्लीश, डच, फ्रेंच, जर्मन, ईटालियन, सिंहली, स्वाहिली, रशीयन, स्पॅनिश, नेपाळी, झुलुसह अनेक विदेशी भाषांमधून त्यांनी गाणी गायली. यापैकी अनेक भाषा त्यांना बोलताही येतात.
उषाजींना अभिनयाचंही अंग आहे. ‘बॉम्बे टू गोवा’मध्ये एका गाण्यात त्यांनी दर्शन दिलं होतं. नंतर काही दाक्षिणात्य चित्रपटांतूनही छोटी छोटी कामं केली. मल्याळी चित्रपटही केले. ‘सात खून माँफ’मध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाजने मोठी भूमिका देऊन त्यांच्या अभिनयक्षमतेचा चांगला वापर करून घेतला.
— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply