तुझं अवेळी कोसळणं भावतं मला
भावनांचे उद्रेक झेलतानांही शांत असतोस
माझा पाऊस नसतोच असा..
उन्मुक्त ,अव्यक्तच रहाणारा
बेभान होणं जमत नाही तुला..
अनावरतेचा मखमली साज ही पेलत नाही तुला
नागचाफ्यांतला गंध श्वासांत भरून रहातो..
शुभ्रमौतिकांचे सडे सांडत येणारी
प्रत्येक ओळ मी
गिरवत रहाते माझ्या तळहातावर..
प्रतिबिंबातला अनोळखी होत जाणारा
शहारा सरसरत रहातो शरीरभर…
अंगभर लपेटून घेते
इवल्या सोनचाफ्याचा बहर
केशर माखल्या ऋजुतेची ग्वाही..
क्षणभरच ओझरती ठेवत
तू तुझा पाऊस मिटून घेतोस
सैंरध्रींचा मखमली साज
ओघळत रहातो अनावर…
© लीना राजीव.
Leave a Reply