सांग सांग भोलानाथ,
शाळा सुरू होईल काय?
कोरोनाचं संकट टळून
शाळा उघडेल काय?
भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
आठवड्यातून बाहेर जायला मिळेल का रे एकदा
भोलानाथ भोलानाथ
आई, ए आई ऽ ऽ , बाबा ऽऽऽ कुठे आहात सगळे?
मला जाम कंटाळा आलाय? बाबा कधी जायचं शाळेत, निदान समोरच्या बागेत तरी जाऊदे ना? चार दिवस झाले मी कुठेही गेले नाहीये.
ए आई काय करीत होतीस, भांडी घासत होतीस? अगं त्या मावशी का नाही येत आहेत आपल्याकडे? हे सगळं काय चाललंय?
अग हो कोरोना कोरोना कोरोना हेच ऐकतेय नुसतं. म्हटलं ना आपण ‘गो कारोना’ तरी हा कोरोना जात का नाहीये? मला तर जाम कंटाळा आलाय. हो ग धुतले ग हात किती वेळा धुऊ. हो अगदी चोळून धुतले गं त्या जाहिरातीतल्या बंटीसारखा विचार देखील आला मनात,
‘‘ए बंटी तुझा साबण स्लो आहे का?’’ किती ते हात धुवायचे?
ए आई कसा होतो ग हा कोरोना काय म्हणतेस? त्या गणितात शिकवतात तसं?
हा म्हणजे ए बरोबर बी, बी बरोबर सी, म्हणजेज ए बरोबर सी. म्हणजे , ए ने बी ला हात लावला आणि जर ए ला रोग असेल तर तोच रोग बी लाही होईल बी ने सीला हात लावला तर तोच रोग सीलाही होईल बापरे म्हणजे आख्खं एक्स वाय झेड पर्यंत…. अरे देवा…
बाबा, तुम्ही बाहेर जाताना मास्क लावून का जाताय? आणि बाकी सगळ्या जगाला सुट्टी आहे, किंवा काय ते वर्क फ्रॉम होम आहे, पण तुम्हाला, डॉक्टर काकांना सुट्टी का नाही? काय म्हणता बँक ही अत्यावश्यक सेवा आहे? लोकांना पैशाची कमी पडायला नको म्हणून बँक चालू ठेवलीय का? अरे देवा, पण मग आता तुम्हीही काळजी घ्या.
ए आई, पण परवापर्यंत तरी संपेल का गं हे? परवा माझा वाढदिवस आहे, अगदी खूप लांबच्या नाही, पण पलीकडच्या बिल्डींगमध्ये राहणार्या माझ्या मैत्रिणींना, मावशीला, आत्याला माझ्या बहीणभावडांना तरी बोलवायचं का ग आपण?
काय म्हणतेस कुणालाही बोलवायचं नाही, आई, तूच असं करतेयस? नेहमी तर मला म्हणत असतेस, की घरी कोणी आलं की बोलावं, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत. त्यांना पाणी विचारावं आणि आता ग आता?
अरे देवा, म्हणजे आपला वाढदिवस करायचा नाही असंही सांगितलंय का शासनाने? अच्छा अच्छा म्हणजे आपल्यामुळे दुसर्याला किंवा दुसर्यामुळे आपल्याला काही त्रास होऊ नये म्हणून शक्यतो बाहेर जायचं नाही, काय म्हणतेस शक्यतो नाही जायचंच नाही.
शी बाबा.
शाळेत जायचं नाही, परीक्षा रद्द झाली, क्लास नाही मग करायचं तरी काय? आयडिया आई, नाहीतरी मावशी नाहीत, मी तुला थोडी मदत करते. मी तुला मटार सोलून देऊ का? आणि दुपारी केर पण काढेन.
काय गं आज्जी कशाला हाका मारतेयस? काय म्हणतेस? आजपासून तू मला रामरक्षा शिकवणारेस, रामरक्षा म्हटल्याने आपल्यावरचं म्हणजे जगावरचं संकट नाहीसं होईल. बरं बरं मी नक्की शिकेन ग रामरक्षा.
आज्जे, आज्जू ये ग तू इकडे आपण दोघी मिळून पत्ते खेळुयात. हो अगं इतकं लगेच कुचकं नको बोलू. मला सारखा तो फोन बघून कंटाळा आलाय, डोळे पण दुखतायत. दादीटला बघ नुसता फोनमध्ये डोकं खुपसून बसलाय. काय म्हणतेस तो आईला मदत करतोय. वा वा काय करतोय मदत? काय आज तो कुकर लावायला शिकला? पण आई मला गॅसजवळ जाऊ देत नाही, म्हणते तू लहान आहेस? मग मी काय करू? मी आपली भाजी निवडेन, केर काढेन.
आजी, तू या लोकरीचा स्वैटर विणतेयस मला पण शिकवशील का गं? मी पण तुला आमच्या शाळेतला डान्स शिकवेन. अगं काही नाही मोडत तुझा पाय नाचून? अगदी सोपा आहे. जमेल तुला. आणि आपण सगळे मिळून अंताक्षरी पण खेळू.
पण माझा वाढदिवस घरातच जाणार, मला केक मिळणार नाही, बाहेर जाऊन काही खायला मिळणार नाही.
काय म्हणतेस आई, तू यूट्युबवर बघून माझ्यासाठी घरीच केक करणारेस वाव ऽ ऽ किती मज्जा. आपण सगळे मिळून घरात धमाल करू म्हणतेस. बरं बाई, पण माझा हा वाढदिवस वायाच जाणार ना?
काय म्हणतेस? ‘शिर सलामत तो पगडी पचास म्हणजे काय?’’ अच्छा अच्छा म्हणजे या वाढदिवशी जर आपण सरकारचं ऐकलं, नियम पाळले तर आपलंच नाही तर देशाचंही भलं होईल बरं, आणि आजचा एक वाढदिवस घरात केला तर पुढे अनेक वाढदिवस मी साजरे करू शकेन.
हो हेही खरंच आणि आई अगं हे सारं संपलं की, आपण जाऊच की बाहेर पण तोपर्यंत मात्र मी अजिबात वाईट वाटून घेणार नाही, मला तुझं म्हणणं अगदी पटलंय. बघ तोपर्यंत मी रोज नवीन नवीन काही तरी शिकत राहीन. व्यायामसुद्धा करीन बरं आम्हाला शाळेत शिकवतात आणि तुम्हाला पण शिकवीन.
योग करू, शतपावली करू, घरात राहूनच मज्जा करू
या कोरोनावर मात करू, जगावरील संकटाला दूर करू.
मी घरातच राहीन…… घरातच राहीन. गो कोरोना गो कोरोना
भोलानाथ कोरानावर औषध निघेल काय? भोलानाथ भालानाथ.
— सौ. शिल्पा पराग कुलकर्णी
Leave a Reply