“तू नसता”
कावरे बावरे होते
मन येते…तुजपाशी ।।
कधीकुठे कधीकुठे
तुझ्यासवे वावरते ।
बोलतुझे शब्द मुके
काळजात साठवते ।
तू नसता ना दिसता
कोण धरे हृदयाशी ।।ध्रु।।
अंधारी अजूनही
मन माझे घाबरते ।
अंगाई नसतांना
नीज मला ना येते ।
प्रेमाचा हात तुझा
पाठीवर या नाही ।
काळाचा घाव कसा
जीव बिचारा साही ।
तू नसता ना दिसता
कोण धरे हृदयाशी ।।१।।
होऊनी स्वप्न असे
भास तुझे बघ येती ।
एकांती मायेने
जोजवून मज जाती ।
भेटीने तुझ्या कसे
शांतशांत मन होई ।
ओठाने नाद धरे
तुझाच आई आई ।
तू नसता ना दिसता
कोण धरे हृदयाशी ।।२।।
कावरे बावरे होते
मन येते… तुजपाशी तुजपाशी
…. मी मानसी
Leave a Reply