एकदाची आमची गाडी मलकापूर कडे निघाली , वाटेत एकदोन वेळा चहा पाणी घेण्यासाठी थांबलो तेव्हा मी लघवीच्या निमित्ताने थोडे दूर जाऊन बिडी ओढत होतो . ( अगदी सुरवातीला मी जेव्हा ११ वी ता असतांना धुम्रपान सुरु केले होते तेव्हा आधी एकदम भारी भारी सिगरेट्स ओढत होतो , डनहिल , रोथमन्स , ५५५ , मोर छाप , अवंती चिरूट वगैरे सगळे प्रकार ओढत झाले होते .. धुम्रपान हे व्यसन बनल्यावर मग विल्स , ब्रिस्टॉल . फोरस्क्वेअर , विल्सफ्लेक , वगैरे पुढे मग पिवळा हत्ती ,कुल , चारमिनार असा उतरता प्रवास करत शेवटी मी आर्थिक परिस्थितीमुळे गणेश बिडी , संभाजी बिडी यावर येऊन स्थिरावलो ) .अर्थात मी जरी दूर जाऊन लपून बिडी पीत असलो तरी बिडीचा उग्र वास काही लपत नाही म्हणून त्यामूळे मी बिडी ओढली की हळूच गुपचूप येऊन गाडीत बसत होतो , मनात सारखी धास्ती असे की गाडीतील कोणाला आपण बिडी ओढतो हे समजायला नको , सकाळी सकाळी ब्राऊन शुगर चा डोस भरपूर घेतल्यामुळे आता एकदम मलकापूर ला पोचल्यावरच रात्री पुन्हा ब्राऊन शुगर घ्यायची हे ठरवले होते . रात्री साधारणतः १२ वाजता आम्ही मलकापूरला पोचलो , गाडीच्या व्यवस्थापकाने नेहमीच्या लॉजवर मुक्काम करण्यासाठी २ खोल्या बुक केल्या होत्या .
सगळे सामान खोलीत नेल्यावर आधी मी लॉजच्या संडासात शिरलो आणि माझा चेसिंगचा कार्यक्रम सुरु केला . ( आधी ब्राऊन शुगर मी चीलीमित थोडी टाकून ओढत असे , मग सिगरेट मध्ये तंबाखू बरोबर मिसळून पीत होतो आणि नंतर जास्त नशा येते म्हणून चेसिंग सुरु केले होते , चेसिंग म्हणजे सिगरेटच्या पाकिटात जो बेगड किवा चांदीचा कागद येतो त्यावर ब्राऊन शुगरची तपकिरी पावडर टाकून मग त्या ठिकाणी चांदीच्या खालून काड्यापेटीची काडी पेटवून त्याला आंच द्यायची की त्या पावडरचे काळ्या रंगाच्या घट्ट पण प्रवाही अश्या द्रवात रुपांतर होते मग तो चांदीचा कागद ज्याला पन्नी म्हणतात तो हळू हळू वरखाली करत जायचे व त्या काळ्या द्रवातून जो धूर बाहेर पडतो तो तोंडात ठेवलेल्या कागदाच्या पुंगळीतून तोंडात ओढायचा , मग तो धूर तसाच छातीत भरून ठेवून वर ऐक बिडीचा झुरका मारून छातीतच दोन्ही धूर मिसळायचे आणि मग ते एकत्र बाहेर सोडायचे , खूप किचकट प्रकार होता पण त्याने लगेच नशा येत असे व नंतर सवयीने ही प्रक्रिया एकदम सोपी झाली होती ) झटपट चेसिंग करून मी परत रुमवर आलो आणि मग इस्माईल भाईशी गप्पा मारत झोपी गेलो .
दुसऱ्या दिवशी पण सर्वांच्या आधी उठून मी चेसिंग केले आणि मग स्नान वगैरे उरकून आम्ही बाहेर पडलो , आम्हाला जेवण , नाश्ता वगैरे साठी रोज २५ रुपये इतका भत्ता मिळत असे हे पैसे रोज सकाळी व्यवस्थापक आमच्या हातात ठेवत असे मग त्यात आम्हाला जे हवे ते आम्ही खाऊ पिऊ शकत होतो . मी पहिले की ते सगळे लोक सकाळीच भरपूर नाश्ता करून घेत होते व मग रात्री एकदम जेवण करत होते , मी देखील तेच केले . मग आम्ही जवळच्या एका गावी पोचलो , जसे गाडीने गावाची वेस ओलांडली तसे इस्माईल भाईनी स्पीकर वरून बोलण्यास सुरवात केली ‘ आला आला आला , उंट आला , बक्षीस घेऊन आला , चला चला लवकर चला , बक्षीस घ्यायला चला , ‘ बोलताना ते एफ एम रेडीओ वर जसे रेडीओजॉकी बोलतात तसे आवाजात सुंदर चढ उतार करत होते , मध्येच ‘ जो वादा किया वो निभाना पडेगा, हेव इतर गाणी गुणगुणत होते स्पीकरवरून येणारे हे आवाज आणि आवाहन एकूण गाडी भोवती लहान मुले त्यांचे पालक अशी गर्दी जमत असे मग लगेच इस्माईल भाई ती बक्षिसाची योजना जाहीर करून १ रु . ला १ बिडी बंडल विक्रीला सुरवात करत जमलेले लोक बिडीबंडल घेतला की तो फोडून त्यातील चिठ्ठी काढून त्यातील नंबर सांगत आणि इस्माईल भाई त्यांच्या जवळ ठेवलेल्या वस्तूंमधून जो नंबर असेत ते बक्षिश त्या व्यक्तीला देत .
खूप झुंबड उडत असे गाडीभोवती व या गर्दीत सर्वाना बरोबर गाडीच्या खिडकीतून बिडी बंडल विकणे , सुटे पैसे परत देणे , आणि बक्षिश देणे हे सगळे झटपट करावे लागत असे , इस्माईल भाई १० वर्षापासून हे काम करत असल्यामुळे ते अगदी सराईत पणे हे करत , त्यांनी मला आधीच सांगून ठेवले होते की मी त्यांच्या कडे पाहून हे सगळे शिकायचे आहे .त्या मुळे मी बारकाईने त्यांचे निरीक्षण करत होतो व त्यांना जमेल तशी मदतही करत होतो . पुढच्या गावात गेल्यावर त्यांनी माईक माझ्या हाती दिला व म्हणाले आता तू बोल स्पीकरवरून मी देखील लगेच सुरु केले ‘ आला आला आला , उंट आला ..” वगैरे ते खुश झाले माझ्यावर .माझी ग्रहणशक्ती चांगली असल्याने मला ते काम शिकण्यास वेळ लागला नाही .
दिवसभर आम्ही एकूण ५ गावे फिरलो , मध्ये एका मोठ्या गावात आम्ही चहा पाणी केले होते . दिवसभर मिळून एकूण २०० बंडल्स ची विक्री झाली होती अर्थात दिवसभरात कोणालाही बादली बक्षीस मिळाली नाही . रात्री परत लॉजवर आल्यावर मी आधी संडासात शिरलो चेसिंग करायला , परत आल्यावर इस्माईल भाईनी मला विचारले ‘ आपका पेट खराब हुंवा है क्या ? आप जैसे ही मौका मिलता है टॉयलेट जा रहे हो ” मी त्यांना हो असे उत्तर दिले . मला या सगळ्या लोकांसमोर सभ्य मुलासारखे वागणे कठीण जात होते ,प्रत्येक वेळी बिडी ओढताना दूर जावे लागे तसेच चेसिंगच्या वेळी जास्त वेळ संडासात बसावे लागे ही कसरत अवघडच होती पण ते करणे भाग होते कारण माझ्या सोबत असलेल्या कोणालाही कसलेही व्यसन नव्हते आणि तो माझा प्रशिक्षणाचा कालावधी होता त्यामूळे माझ्याबद्दल सगळ्यांचे मत चांगले व्हावे असा माझा प्रयत्न होता .
( बाकी पुढील भागात )
— तुषार पांडुरंग नातू
Leave a Reply