नवीन लेखन...

साकुरामय – जपानची गुलाबी सफर (जपान वारी)

साकुरा (चेरी ब्लॉसम) म्हणजे जपानची गुलाबी सफर.

वसंत ऋतुचे आगमन दर्शविणारी. आशा-आकांक्षा, सौंदर्य आणि नवीन जीवनाचे प्रतिनिधित्व करणारी अशी साकुराची फुले.

स्प्रिंग सिझन मध्ये जपानला भेट देणे हे जग भरातल्या पर्यटकांचे स्वप्न असल्याने  विविध टुरिस्ट कंपन्या आणि इथल्या नागरीकांसाठी एक  ट्रेड मार्क इव्हेंट असल्यासारखे आहे. निसर्गाचे प्रत्येक सोहळे साजरे करणारे हे जपानी नागरीक, त्यांचे कधी कधी विशेष कौतुक वाटते. आपल्याकडे जसे वर्ष भर विविध सण-समारंभ उत्साहाने आणि आनंदाने साजरे केले जातात तसेच जपानमध्ये प्रत्येक ऋतु!

साकुरा हे जपानचे राष्ट्रीय फूल आहे का? असे सहज काही जपानी लोकांना  विचारल्यास त्यातल्या ५०% लोकांकडून पटकन होकार मिळतो असा माझा अनुभव आहे. सर्व वयोगटात लोकप्रिय असणारे हे साकुरा. राष्ट्रीय फूल नाही बरं का! लोकप्रियताच ती केवढी; गल्लत होते अशी मग!

जपानच्या दक्षिणेकडील भागापासून पुढे वरती उत्तरेकडे असा साकुरा फुलण्याचा क्रम आहे. ह्या जपानी लोकांनी शिस्तबद्धता आणि वक्तशीरपणा निसर्गाकडूनच घेतला असावा कदाचित.मार्च महिन्यात साकुरा फुलायला सुरुवात होते. पुढे मे महिन्याच्या साधारणपणे पहिल्या आठवड्यापर्यंत साकुरा सिझन असतो. जपानच्या ओकिनावा बेटावर हा साकुरा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीसुद्धा अनुभवता येतो. सिझनचा शेवट मात्र होक्काइदो मध्ये होतो. साकुराची फुले जास्तीत जास्त १० दिवस राहतात आणि त्यानंतर गळून पडतात. पाकळ्यांचा जमिनीवर पडलेला सडा आणि वाऱ्यावर उडणाऱ्या त्या पाकळ्या सगळं वातावरण गुलाबी करून टाकतात.

हवामान बदला नुसार साकुरा फुलण्याचा काळ पुढे मागे होत असल्याने ‘साकुरा फोरकास्ट’ म्हणजे साकुरा फुलण्याचा अंदाज वर्तवणारे माहिती पत्रक इथे प्रकाशित केले जाते. ते पाहून विस्तारित माहिती आपल्याला जाणून घेता येते. माहिती गुगल वरती सहज उपलब्ध होते.

त्या माहिती पत्रकामधे जपानच्या प्रत्येक राज्यातील साकुरा सिझनची सुरुवात व साकुरा पूर्णपणे फुलण्याचा (Peak) काळ ह्यांच्याबद्दल माहिती दिली जाते. त्यामुळे आपल्याला ट्रिपचा किंवा हानामीचा प्लॅन आखणे सोप्पे जाते.

जपानमध्ये डझनभर तरी साकुराच्या जाती आहेत, त्यापैकी बहुतेक वसंत ऋतु म्हणजेच स्प्रिंग मध्ये फक्त काही दिवस फुलतात. एखादी व्यक्ती फुलांच्या विविधतेमधे रमून जाणार नाही तर नवलच म्हणायचे!

त्यांचा पुरे पूर आनंद घेण्यासाठी ‘हानामी’ (Cherry Blossom Viewing) पार्टी असतात. घरगुती स्तरावर आणि बाकी मोठ्या प्रमाणात ह्या पार्टी आयोजित केल्या जातात. हानामी बर्‍याच शतकानुशतके साजरे केले जात आहे आणि जपानी संस्कृतीत खूप मोठे स्थान त्याने पटकवले आहे.
रंगीबेरंगी दिव्यांच्या साथीमध्ये ह्या साकुराचा अनुभव रात्री सुद्धा घेता येतो.

अनेक विविध प्रकार असणार्‍या ह्या साकुरामध्ये तीन प्रसिद्ध व सर्वसामान्यपणे  दिसून येणार्‍या जाती म्हणजे ‘सोमेई योशिनो’ , ‘यामाझाकुरा’ आणि ‘शिदारेझाकुरा’

सोमेई योशिनो’  प्रत्येक कळीमध्ये पाच पाकळ्या असतात. फिकट गुलाबी रंग म्हणजे जवळजवळ पांढरीच दिसतात ही फुले. हा बहर गुच्छांमध्ये(क्लस्टर) फुलतो. जे झाडाच्या पानांच्या आधी उघडतात.

‘यामाझाकुरा’  बऱ्यचजागी पहायला मिळणारा वाइल्ड साकुरा(Hill Cherry).ओळखण्याची एक ट्रिक ह्याची पाने आणि फुले एकाच वेळी उमलतात. त्यामुळे फक्त गुलाबी रंग न दिसता हिरवा रंग सुद्धा हजेरी लावतो.

‘शिदारेझाकुरा’ (Weeping Cherry tree) म्हणजे ओळखायला सोपा! ह्या झाडाच्या फांद्यांवरून खाली झिरपणारी ती साकुराची फुले रात्रीच्या वेळी चमचमणाऱ्या विविध दिव्यांच्या प्रकाशात (illumination) अजूनच मोहक दिसतात.

अशा अनेक जाती असणार्‍या साकुराच्या फुलांना वास/गंध नसतो. दिसायला मात्र अतिशय सुरेख नाजुक आणि मोहक असतात.  शॉपिंग करण्यासाठी ,साकुराच्या सिझन मध्ये ‘साकुरा फ्लेवरचे’ काहीही मिळेल जपान मध्ये अक्षरश: नाव घ्याल त्यात हा फ्लेवर असतो. वस्तू,सौंदर्य प्रसाधने ,  पेय, खाद्यपदार्थ, अगदी साकुराच्या फुलांमधल्या पराग कणांपासून तयार झालेला साकुरा मध सुद्धा!

साकुरा सिझन मध्ये मनमुराद आदरातिथ्य करवून घेता येते. जपान देशातल्या अगणित प्रेक्षणीय जागांवरती साकुराचा आनंद आपण घेऊ शकतो. हा साकुरामय जपान पाहणे आणि अनुभवणे नक्कीच एक सुंदर आठवण देऊन जाते हे मात्र खरे!

 

— © प्रणाली मराठे

Avatar
About प्रणाली भालचंद्र मराठे 17 Articles
मी सध्या जपान मध्ये वास्त्यव्यास असून ,येथे जपानी भाषेची भाषांतरकार म्हणून काम करत आहे. जपानी भाषेमध्ये जितके नावीन्य आहे तितकेच या देशामध्ये आणि यादेशातील रहिवाश्यांमध्ये. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या जपान देशाचे सौंदर्य अलौकिक आहे. जे मी आपणापर्यंत माझ्या लेखनाद्वारे पोहोचवू इच्छिते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..