नवीन लेखन...

श्री वेंकटेश प्रपत्ती – मराठी अर्थासहित

स्वामी प्रतिवादी भयंकरम् अण्णा रचित श्री वेंकटेश प्रपत्ती – मराठी अर्थासहित

प्रपत्ति या शब्दाचा अर्थ परमेश्वर चरणी पूर्ण भक्तिभावाने पत्करलेली शरणागती. या काव्यात श्री वेंकटेशाच्या पदी आश्रय मागितला आहे. सहसा आजच्या जगात आश्रय मागणे ही अपमानास्पद गोष्ट समजली जाते. तथापि तेजस्वी आणि साजि-या वेंकटेशाच्या पदकमलांपाशी आश्रय मागण्यात कमीपणा तो कसला ? स्वामींनी मोठ्या भक्तिभावाने ते केले आहे.

पहिल्या श्लोकात जगन्माता लक्ष्मीचे स्तवन करून स्वामी वेंकटेशाच्या पदकमलांच्या स्तुतीकडे वळतात.

या स्तोत्रातील प्रथम श्लोक शार्दूलविक्रीडित व इतर सर्व श्लोक सिंहोन्नता वृत्तात रचले आहेत.


ईशानां जगतोऽस्य वेङ्कटपतेर्विष्णोः परां प्रेयसीं
तद्वक्षस्थलनित्यवासरसिकां तत्क्षान्तिसंवर्धिनीम् ।
पद्मालङ्कृतपाणिपल्लवयुगां पद्मासनस्थां श्रियं
वात्सल्यादिगुणोज्ज्वलां भगवतीं वन्दे जगन्मातरम् ॥ १॥

मराठी– या जगाची स्वामिनी असणा-या, वेंकटपर्वताचा प्रभू विष्णूच्या अत्यंत आवडत्या, त्याच्या वक्षावर नेहेमी आनंदाने निवास करणा-या आणि त्याची सोशिकता वाढवणा-या, जिचे कमलिनी सारखे बाहू कमळांनी सजलेले आहेत, जी कमळावर बसली आहे, आणि प्रेम ममता व इतर गुणांनी झळाळणा-या, जगाची माता असलेल्या लक्ष्मी देवीला मी नमन करतो.

सम्राज्ञी जगतास वेंकटपतीची लाडकी विष्णुची
वक्षी नित्य निवास, वृद्धि करिते त्याच्या दया वृत्तिची ।                                                                        हाती कोमल शोभते कमळ, जी पद्मासनी बैसली                                                                              माया प्रेमगुणे प्रभा भगवती माता मिया वंदिली ॥ ०१


श्रीमन् कृपाजलनिधे कृतसर्वलोक
सर्वज्ञ शक्त नतवत्सल सर्वशेषिन् ।
स्वामिन् सुशील सुलभाश्रितपारिजात
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ २॥

मराठी– हे लक्ष्मीपती, कृपासागरा, सर्व जगताच्या जनका,सर्व जाणकार, सर्वशक्तिमान, नमस्कार करणा-याला प्रेमळ, विश्वाचा गाभाच असणारा, जगताचा मालक (परंतु) सौहार्दपूर्ण,सहजासहजी प्राप्त होणारा, शरण आलेल्याला प्राजक्ताप्रमाणे (सुगंध देणारा) अशा वेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

ज्ञानी, जगा जनक, श्रीपति, भक्तप्रेमी
या विश्वव्यापक समर्थ दयार्णवा मी |
प्रेमे प्रभो सहज देसि सुगंध दासा
आलो पदी शरण मी तव श्रीनिवासा ॥ ०२


आनूपुरार्पितसुजातसुगन्धिपुष्प
सौरभ्यसौरभकरौ समसन्निवेशौ ।
सौम्यौ सदाऽनुभवनेऽपि नवानुभाव्यौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ३॥

मराठी– पायातील वाळ्यापाशी वाहिलेल्या सुगंधी साजि-या पुष्पांचा परिमळ अधिकच वाढविणा-या, नेहेमी शेजारी शेजारी एकसारखी दिसत असली तरी दर वेळी नवाच अनुभव देणारे स्वरूप असणा-या तुझ्या प्रसन्न पावलांना मी शरण जातो.

पायी सुमे सुखद गंधित वाहिली ती
त्यांचा सुगंध पद सन्निधि वाढवीती ।
प्रत्येक दर्शन नव्या अनुभूति येता
वंदू सुकोमल पदा वृषशैलनाथा ॥ ०३


सद्योविकासिसमुदित्वरसान्द्रराग-
सौरभ्यनिर्भरसरोरुहसाम्यवार्ताम् ।
सम्यक्षु साहसपदेषु विलेखयन्तौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ४॥

मराठी– नुकत्याच उमललेल्या, पाझरणा-या गडद लाल रंगाच्या आणि उत्कृष्ट सुवासाच्या कमळाशी (वेंकटेशाच्या पावलांची) समानता दर्शविणा-या, घाई घाईत उच्चारलेल्या शब्दांचे खंडन करणा-या, श्रीवेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

“की पाझरे भडक लाल सरोज रंगे”
घाईत भाषण “फुले मधु गंध संगे” ।
खोडून साम्य वचना अविलंब काढी
वंदू वृषाचलपती तव पादजोडी ॥ ०४


रेखामयध्वजसुधाकलशातपत्र
वज्राङ्कुशाम्बुरुहकल्पकशङ्खचक्रैः ।
भव्यैरलङ्कृततलौ परतत्व चिन्हैः
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ५॥

मराठी– चित्र रेखाटलेली पताका, अमृताचा घट, छत्र, वीज, अंकुश, कमळ, कल्पवृक्ष, शंख, चक्र या भव्य,परमात्म्याच्या खुणांनी ज्यांचे (पायाचे) तळवे भूषित झाले आहेत अशा व्यंकटेशाच्या पावलांना मी शरण जातो.

राजीव, कल्पतरु, अंकुश, चंचलेच्या
झेंडा, सुधा घट खुणा छत, चक्र साच्या ।
शंखासवे पदतळी परमात्म भारी
श्रीवेंकटेशचरणावर नम्र सारी ॥ ०५


ताम्रोदरद्युतिपराजितपद्मरागौ
बाह्यैर्महोभिरभिभूतमहेन्द्रनीलौ ।
उद्यन्नखांशुभिरुदस्तशशाङ्कभासौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ६॥

मराठी– तळव्याच्या आतील (तळ) भागाच्या तांबुस रंगाने माणिक रत्नांना हरविणारे, तर बाहेरच्या (वरील) भागाने तेजस्वी इंद्रनील मण्याला जिंकणारे, तारकांप्रमाणे असणा-या नखांच्या तेजाने चंद्राच्या आभेलाही वरचढ ठरणा-या श्री वेंकटेशाच्या पावलांना मी शरण जातो.

तांबूस वर्ण हरवी तळ माणिकाला
पाऊल उर्वरित जिंकत इंद्रनीला ।
इंदुप्रभे नमविती किरणे नखांची
श्रीवेंकटेशचरणे मज आस-याची ॥ ०६


सप्रेमभीति कमलाकरपल्लवाभ्यां
संवाहनेऽपि सपदि क्लममादधानौ ।
कान्ताववाङ्ग्मनसगोचरसौकुमार्यौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ७॥

मराठी– प्रेम आणि भय या दोन्ही भावनांसमवेत लक्ष्मीच्या पालवीसारख्या कोमल हातांनी चेपूनही थकावट जाणवणारे, सुंदर, ज्यांची कोमलता वाणी आणि मनाला आकलन होत नाही अशा वेंकटेश्वराच्या चरणांना मी शरण जातो.

प्रेमे भये मृदु करे चुरते पदांना
पद्मा, तरी तरत्री नच येत ज्यांना ।
वाणी मना न उमगे मृदुता जयांची
जोडी नमू सुभग वेंकटपावकांची ॥ ०७


लक्ष्मीमहीतदनुरूपनिजानुभाव-
नीलादिदिव्यमहिषीकरपल्लवानाम् ।
आरुण्यसङ्क्रमणतः किल सान्द्ररागौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ८॥

मराठी– श्री देवी, भूदेवी, नीला देवी आणि आपल्या महानतेला सुयोग्य इतर देवींच्या पालवीसारख्या (कोमल) हातांच्या लालीच्या संयोगामुळे जी खरोखर लालबुंद झाली आहेत, त्या श्री वेंकटेशाच्या पावलांना मी शरण जातो.

राण्या सुयोग्य महनीय रमा रसा वा      (रसा- पृथ्वी)
नीला करी गडद लाल रंगी गिलावा ।
त्याच्या सवे जुळुन जी बहु लाल होती
मी वंदितो शरण येउन पावले ती ॥ ०८


नित्यानमद्विधिशिवादिकिरीटकोटि-
प्रत्युप्तदीप्तनवरत्नमहःप्ररोहैः ।
नीराजनाविधिमुदारमुपादधानौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ९॥

मराठी– सदा (चरणांवर) नमन करणा-या ब्रह्मा,शंकर वगैरे (देवांच्या मस्तकावरील) मुकुटातील नवरत्नांमधून बाहेर पडणा-या प्रखर किरणांनी ज्यांच्या आरतीचा विधीच जणू संपन्न होतो त्या श्री वेंकटेशाच्या पावलांना मी शरण जातो.

 पायावरी सुर, जटी, झुकती विरंची     (जटी-शंकर, विरंची- ब्रह्मा)
रत्ने झळाळत शिरी मुकुटी तयांची ।
नीरांजनेच करिती जणु आरतीला
आलो असे शरण श्रीनिधिच्या पदाला ॥ ०९


विष्णोः पदे परम इत्युतिदप्रशंसौ
यौ मध्व उत्स इति भोग्यतयाऽप्युपात्तौ ।
भूयस्तथेति तव पाणितलप्रदिष्टौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ १०॥

मराठी– ‘विष्णूचे अत्त्युच्च पद’ अशी वेदांनी ज्यांची वाखाणणी केली आहे, ज्यांच्या(पासून मिळणा-या) परमोच्च आनंदाचा ‘मधाचा (माधुर्याचा) झरा’ असा उल्लेख वेदात केला आहे, जे पुढेही तसेच आहेत असे तुझ्या उजव्या हाताने दा्खवले आहेत, त्या वेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

‘उत्तुंग पाउल’ अशी करिती प्रशंसा
सांगे श्रुती ‘मधुर निर्झर’ हाच खासा ।
अत्त्युच्च मोद तळहात जयांस दावी
जागा मला तिरुपती चरणी मिळावी ॥ १०

टीप– या श्लोकातील ‘परम पद’ व ‘मध्व उत्स’ यांचा संदर्भ ऋग्वेदातील प्रथम मंडलातील विष्णुसूक्ताशी (सूक्त १५४) आहे.


पार्थाय तत्सदृशसारथिना त्वयैव
यौ दर्शितौ स्वचरणौ शरणं व्रजेति ।
भूयोऽपि मह्यमिह तौ करदर्शितौ ते
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ ११॥

मराठी– अर्जुनाला त्याच्या सारख्या (सुयोग्य) सारथ्याने, तू, ‘(मला) शरण जा’ असे जे चरण दाखविलेस, पुनः मला येथे (आपल्या) हाताने दाखविलेल्या त्याच वेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

पार्थास दाविसि तयासम सारथी तू
हस्ते स्वतः शरण ये चरणी मला तू
येथे पुन्हा कर तुझा मज दावितो जे
श्री वेंकटेशपद आश्रयस्थान माझे ॥ ११

टीप– या श्लोकातील ‘शरणं व्रज’ या पंक्तीचा संदर्भ गीतेतील ‘सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज | अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच: ॥’ या  १८ व्या अध्यायातील ६६ व्या श्लोकाशी आहे.


मन्मूर्ध्नि कालियफणे विकटाटवीषु
श्रीवेङ्कटाद्रिशिखरे शिरसि श्रुतीनाम् ।
चित्तेऽप्यनन्यमनसां सममाहितौ ते
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ १२॥

मराठी– माझ्या(सारख्या पाप्याच्या) शिरावर, (कृष्णावतारात) कालिया सर्पाच्या फण्यावर, (रामावतारात) दाट जंगलात, श्रीवेंकट पर्वताच्या शिखरावर, वेदांच्या मस्तकावर (उपनिषदात), इतर कोठेही मन गुंतलेले नाही (फक्त तुझ्या ठायी आहे ) अशांच्या हृदयातही समभावाने स्थापित झालेल्या वेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

माझ्या शिरावर, फण्यावर कालियाच्या
रानात दाट, शिखरी वृषपर्वताच्या ।
जेथे मनी न दुसरे, शिखरी श्रुतींच्या
सारे समान पदि आश्रय वेंकटाच्या ॥ १२


अम्लानहृष्यदवनीतलकीर्णपुष्पौ
श्रीवेङ्कटाद्रिशिखराभरणायमानौ ।
आनन्दिताखिलमनोनयनौ तवैतौ
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ १३॥

मराठी– ज्या पायांवर वाहिलेली ताजी फुले कोमेजत नाहीत, जी पावले वेंकट पर्वताच्या शिखरांसाठी आभूषण आहेत, सर्व जनांच्या मनांना व नेत्रांना जी आनंद देतात त्या तुझ्या- वेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

कोमेजती न सुमने नव वाहिलेली
लेणीच जी वृषगिरी शिखरांस झाली ।
आल्हाद देत सकला नेत्रां मनांना
आलो असे शरण श्रीनिधि पावलांना ॥ १३


प्रायः प्रपन्नजनता प्रथमावगाह्यौ
मातुस्स्तनाविव शिशोरमृतायमानौ ।
प्राप्तौ परस्परतुलामतुलान्तरौ ते
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ १४॥

मराठी– सहसा लहान बालक जसे आईच्या अमृत समान दुधाने भरलेल्या स्तनाचे ठिकाणी रममाण होते तसे आपद्ग्रस्त लोक जेथे तल्लीन होतात, ज्यांची तुलना इतर काशाशीही न होता फक्त एकमेकांशीच होऊ शकते,वेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

जेवी शिशू रमत अमृत मातृवक्षी
तल्लीन होत बहुधा जन जेथ कष्टी ।                                                                                              जे एकमेक उपमेय न अन्य कोणी                                                                                            वंदी असे चरण मी तव चक्रपाणी ॥ १४


सत्त्वोत्तरैः सततसेव्यपदाम्बुजेन
संसारतारकदयार्द्र दृगञ्चलेन ।
सौम्योपयन्तृमुनिना मम दर्शितौ ते
श्रीवेङ्कटेशचरणौ शरणं प्रपद्ये ॥ १५॥

मराठी– ज्यांची पदकमले नित्य सत्प्रवृत्तीच्या जनांकडून पूजिली जातात आणि ज्यांचे शांत व दयापूर्ण कृपाकटाक्ष (शिष्यांचे) संसारापासून रक्षण करतात असे माझे (कवीचे) गुरू (स्वामी मानवत मामुनीगळ वरावरमुनी) यांनी दाखविलेल्या श्रीवेंकटेशाच्या पदी मी शरण जातो.

ज्यांच्या पदा सतत सात्विक पूजिताती
ज्यांच्या कृपाळु नजरा भव तारिताती ।
माझे वरावर गुरू मज दाविताती
त्या श्रीनिवास चरणी शरणागती ती ॥ १५

टीप– स्वामी अण्णा यांनी आपले आचार्य, स्वामी मानवल मामुनिगल(वरावर) यांची थोरवी येथे वर्णिली आहे.


श्रीश श्रिया घटिकया त्वदुपायभावे
प्राप्ये त्वयि स्वयमुपेयतया स्फुरन्त्या ।
नित्याश्रिताय निरवद्यगुणाय तुभ्यं
स्यां किङ्करो वृषगिरीश न जातु मह्यम् ॥ १६॥

मराठी– हे वृषपर्वताच्या राजा, श्रीपती, तूच (प्राप्त करून घेण्याचे) साध्य आहेस आणि लक्ष्मीच्या मध्यस्थीतून निर्माण झालेले तूच साधनही आहेस. नेहेमी लक्ष्मीच्या सान्निध्यात असणा-या निष्कलंक आणि गुणवान अशा तुझा मी स्वतःचा विचार न करता नित्य दास होईन.

हे श्रीपती मजसि साधन साध्य तूची
त्यासी शिफारस तुझ्या सजणी रमेची ।
लक्ष्मीसमीप अकलंक गुणावतारा
मी दास होत तव ना करितो विचारा ॥ १६

॥ इति वेङ्कटेशप्रपत्तिः ॥

***********************

— धनंजय बोरकर
(९८३३०७७०९१)

 

धनंजय मुकुंद बोरकर
About धनंजय मुकुंद बोरकर 60 Articles
व्यवसाय इलेक्ट्रॉनिक (एव्हियॉनिक्स) इंजिनियर. संस्कृत भाषेची आवड. मी केलेले संस्कृत काव्यांचे मराठी गद्य व स्वैर पद्य रूपांतर - १. कविकुलगुरू कालिदासाचे `ऋतुसंहार' (वरदा प्रकाशन, पुणे) २. जयदेवाचे `गीतगोविंद' (प्रसाद प्रकाशन, पुणे). ३. मूकशंकराचार्याचे `मूक पंचशती' ४. जगन्नाथ पंडितांचे `गंगा लहरी' इत्यादी. मी ऋतुसंहार मधील श्लोकांवर आधारित एक दृकश्राव्य कार्यक्रम तयार केला असून त्याचे अनेक कार्यक्रम पुण्यात व इतर ठिकाणीही सादर केले आहेत.

1 Comment on श्री वेंकटेश प्रपत्ती – मराठी अर्थासहित

  1. फारच सुंदर भक्ती पूर्वक आणि चपखल भाषांतर. अभिनंदन आणि नमन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..