वाराणसी आणि तेथील गूढ जीवन आपणांस परिचित असलेल्या संस्कृतीच्या, गंगेच्या, आणि काशी-विश्वेश्वराच्या पार आहे.
एक “अछूत छोटी ” आणि एक ” विधवा नूर ” यांचे अंतरंग विकास खन्नाला उलगडून दाखविण्यास ९१ मिनिट पुरतात. पांढऱ्या रंगाने वेढलेले अंतर्विश्व घेऊन हिंडणाऱ्या नीना गुप्ताला नेल पॉलिश, कुल्हड मधील चहा, टपरीतील सामोसा आणि शेवटी होळीचा रंग अशा काहीबाही, सुचतील त्या प्रयत्नांमधून छोटी विधवावतारातून माणूसपणाकडे खेचत असते.
तिला विहंगम असे राधा नृत्य गंगाकिनारी करायला भाग पाडते. समाजाच्या खिडक्या दारांमुळे बिचकत पण अंतर्यामी खुलत नूर या प्रयत्नांचे स्वागत करते. विधवापण आणि माणूसपण एकसारखेच किळसवाणे असते हे तिला उशिरा कळते पण तरीही ती ठामपणे छोटी सोबत उभी राहाते आणि शेवटी तिची “आई ” होते. अनारकली, भ्रष्टाचारी पोलीसयंत्रणा , टीव्ही जर्नालिस्ट असे काही कंगोरेही या दोघींमधील नाते गहिरे करतात.
पूर्वायुष्याचे तुकडे छोटीला समजोत ना समजोत, नूर तिला सांगत राहते. यामध्ये विश्वकवी टागोरांचाही उल्लेख येतो. नंतर भेदरलेल्या छोटीला पदराआड घेऊन बनारस सोडून कोठे जायचे असा निश्चय करीत असताना निरागस छोटी म्हणते- ” आपण टागोरांकडे जाऊ या.” मी स्तिमित झालो.
अडचणीच्या वेळी कवीच्या वळचणीला जाण्याची ही केवढी जिजीविषा, आणि तो कवी आपल्याला वाचवेल यांवर किती श्रद्धा ?
कवीचे घर कसे अंतर्बाह्य निर्मळ असते, हे औदुंबरच्या कवी “सुधांशूंच्या ” घरी आम्ही वर्षानुवर्षे अनुभवलंय. दरवर्षी १४ जानेवारी चा संक्रांतोत्सव, त्यांच्या घरी साहित्योत्सव असला तरी घरातील सहृदय कुटुंबियांचे स्वागतशील वागणे कायम लक्षात राहिले आहे.
” अनारकली ” च्या मृत्यूची साक्षीदार छोटी, गंगेच्या उदरातून मरता मरता वाचते, तेव्हापासून ती गुरुदेवांच्या कवितेतील ” व्हेअर द हेड इज हेल्ड हाय अँड माईंड इज विदाऊट फिअर ” या ओळी जगायला सुरुवात करते. निर्भय नूर या ओळी मृत्यूनंतरही तिच्या अंतःकरणात पेरते.
कवीच्या शब्दांनी पाठबळ मिळाल्यामुळे,माझ्या वडिलांची सोवळी आजी (लाल आलवण नेसून ) २५ माणसांच्या घराचा गाडा कशी समर्थपणे ओढायची, हे मी लहानपणी एदलाबादला पाहिलंय. चित्कला मुक्ताई (वेळप्रसंगी ज्ञानियांच्या राजालाही जगण्याचे भान पुरविणारी) तिच्या पाठीशी अदृश्यपणे जाणवायची.( गेल्या चार पिढ्यांपासून मुक्ताईचे पुजारीपण आमच्या घराण्यात आहे.)
प्रसंगी हा चित्रपट लाऊड, अंगावर येणारा वाटतो खरा, पण आयुष्यही त्यातील पात्रांच्या अंगावर पदोपदी असेच धावून येत असते आणि त्यांचे चिमुकले भावविश्व चिरडून टाकायचा प्रयत्न करीत असते. विधवा नूरचा प्राणवायू या विषम लढ्यात संपतो, पण छोटी सुप्रीम कोर्टापर्यंत करीयर घडवते. आणि एका होळीला रंगांचे ढिगारे घेऊन वाराणशीच्या विधवांचे बेरंग आयुष्य पांढऱ्या पट्ट्यापलीकडे नेते. ही आगळीवेगळी श्रद्धांजली असते नूरला, जिच्यामुळे छोटीला एक रंगीत फ्रॉक मिळतो. त्यांवर समाजाने टाकलेल्या डागांची पर्वा न करता ती नूरच्या पार्थिवावर होळीचे रंग शिंपडते आणि तिचे ” जाणे ” रंगयुक्त करते.
चित्रपटाचा शेवट गंगेत सोडल्या जाणाऱ्या दिव्यांनी होतो आणि पडद्यावर शब्द झळकतात- ENDLESS ! (अंतहीन )
काय अंतहीन आहे या जगण्यात ?
– विधवांवरील, (FOR THAT MATTER) या देशातील स्त्रियांवरील अत्याचार?
– संथ वाहणाऱ्या सहनशील गंगेच्या ETERNAL लाटा ?
– पात्रात सोडलेले आशेचे अल्पायुषी पण जिद्दी दिवे (ज्यातला छोटीसारखा एखादाच पैलतीराला जातो)?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply