हां बाबू, हां बाबू, ये ‘सर्कस’ है… माझ्या पिढीतल्या सर्व जणांनी सर्कस पाहण्याचा आनंद लुटलेला तर आहेच शिवाय आपल्या मुलांना देखील आवर्जून सर्कस दाखवलेली आहे. पूर्वी करमणुकीचे जे काही कार्यक्रम असायचे त्यात सर्कस हा लहान मुलांना सर्वाधिक आवडणारा प्रकार होता.
भारतात सर्कस सुरु झाली १८८२ साली. विष्णुपंत छत्रे यांनी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय सर्कसचा पहिला शो केला. त्यानंतर महाराष्ट्राबरोबरच केरळ व बंगाल मधील काही मंडळींनी सर्कसला नावारूपाला आणले. पुण्यात कमला नेहरू नावाची सर्कस डेक्कन जिमखाना मैदानावर आल्याचं मला आठवतंय. त्यानंतर जेमिनी, रॅम्बो, राॅयल, अपोलो, दि ग्रेट बाॅम्बे, नॅशनल, इ. अनेक नावांच्या सर्कशी येऊन गेल्या. माझ्या लहानपणी सर्कसचे मैदान हे नेहमीचे ठरलेले होते, ते म्हणजे सारसबाग जवळचे खेळाचे मैदान. त्या भव्य मैदानावर सर्कस नावाचे ‘गाव’, उन्हाळ्याची किंवा नाताळची सुट्टी असताना उतरायचे. सर्कस येण्याआधी तशी पेपरमध्ये जाहिरात यायची. मैदानावर मध्यभागी सर्वात मोठा तंबू उभारला जात असे. त्याच्या एका बाजूला हत्ती, घोडे, ऊंट व प्राण्यांचे पिंजरे, दुसऱ्या बाजूला कलाकारांचे तंबू व स्वयंपाकाचे तंबू असायचे. मैदानाच्या दर्शनी बाजूस एक कुंपणवजा लाकडी फळ्यांची भिंत असायची व त्याच्यावरती सर्कसमध्ये होणाऱ्या कसरतींची, प्राण्यांची, विदुषकांची रंगीत चित्रे मोठ्या संख्येने सलग लावलेली असायची. तिकीट बुकिंगच्या चार खिडक्या असायच्या. मध्यभागी प्रवेशद्वार.
पहिल्या शोला शहरातील मान्यवर मंडळींना निमंत्रण असायचं. शहरातील रस्त्यांवरुन सर्कसची एक गाडी तर कधी हत्ती जाहिरात करीत फिरत असे. सुरुवातीचे काही दिवस व रविवारी सर्कसचे तिन्ही शो हाऊसफुल्ल जायचे. काही दिवसांनी शाळेमधून सर्कसचा शिक्का मारलेले पास वाटले जायचे. त्यामुळे तिकीटावर सवलत मिळत असे. आम्ही मित्र-मित्र मिळून सर्कस पहायला जायचो. तिकीट अर्थात बाल्कनीचं असायचं. त्या लाकडी फळ्यांवर बसून दुपारचा शो आम्ही पहायचो. एका बाजूला बॅन्ड वाजत असायचा. साधारणपणे आधीच्या शोच्या शेवटी जो खेळ झाला असेल तो दुसऱ्या शोला सुरुवातीला होत असे. बहुधा वरती लावलेल्या झोक्यांच्या कसरतीने सुरुवात होत असे. त्यानंतर तोफेतून माणूस बाहेर पडणे. घोडे, ऊंट, हत्ती, वाघ, सिंह यांच्या करामती. सिंहाच्या जबड्यात डोके घालणे हे पाहून अंगावर काटा यायचा. अधूनमधून विदुषकांच्या करामती चालूच असायच्या. रंगेबेरंगी पक्ष्यांचा एक शो होऊन जायचा. त्यातील पोपट सिगारेटने तोफ पेटवायचा. आक्राळ विक्राळ तुकतुकीत पाणघोडा आणला जायचा. त्याला गोलाकार फिरवताना ब्रेड खायला दिला जायचा. सीलमासे चेंडू खेळायचे. चिपांझी सायकल चालवायचे. एका मोठ्या जाळीच्या गोलामध्ये दोन मोटारसायकलस्वार एकाचवेळी उभरत्या आठवल्या फेऱ्या मारायचे, थोडं जरी जजमेंट चुकलं तर अपघात हा ठरलेला. इकडे खेळ चालू असताना पाॅपकाॅर्न, आईस्क्रीम विकणारे फिरत असत. गॅलरीनंतर खुर्च्यांच्या रांगा असत. त्यांच्यापुढे गादीच्या खुर्च्या मांडलेल्या असत. आम्हाला मात्र सर्कस पुढून पाहण्यापेक्षा गॅलरीतून पहाणे जास्त सुरक्षीत वाटत असे. एकापाठोपाठ एक खेळ पाहताना तीन तास कधी होऊन जायचे हे कळायचंही नाही.
जसा मी सर्कस पाहण्याचा आनंद घेतला तसाच माझ्या मुलाला देखील सर्कस दाखवताना मला पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला. शेवटी सर्कसचे शो आरटीओ जवळ, गोळीबार मैदानावर, डेक्कनच्या नदीपात्रात होऊ लागले. २००० सालापासून सर्कसवर निर्बंध घातले गेले. आता प्राण्यांचा वापर सर्कसमध्ये करता येत नाही. फक्त कसरती आणि विदुषकांसाठी सर्कस कोण पहाणार? परिणामी सर्कसच्या व्यवसायाला अवकळा आली. ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट सर्कसशी संबंधित होता. त्याचे बरेचसे चित्रीकरण जेमिनी सर्कस जिथे चालू असे, तिथे केलेले आहे. ‘सर्कस’ नावाची एक हिंदी सिरीयल फार गाजली होती. त्यामध्ये आजचा सुपरस्टार शाहरुख खान होता. शाहरुखचे ते उमेदवारीचे दिवस होते. त्याचे बरेचसे चित्रीकरण पुण्यातच झालेले आहे.
आता मात्र आपण पुढच्या पिढीला सर्कस दाखविण्याचा आनंद मिळवू शकणार नाही याची खंत वाटते. तो मिळविण्यासाठी ‘मेरा नाम जोकर’ चित्रपट पहावा लागेल. त्यातील एका गाण्यात राजकपूर ने म्हटलंय….
हां बांबू, ये सर्कस है, शो तीन घंटे की.. पहिला घंटा बचपन है, दुसराऽ जवानी, तिसराऽ बुढापा…
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२२-११-२०.
Leave a Reply