नवीन लेखन...

फिरुनी नवी, जन्मेन मी

एक आटपाट मुंबई नगरी आहे. गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून ती चित्रपटाची ‘मायानगरी’ समजली जाऊ लागली. जागतिक पातळीवर आज आघाडीवर असणाऱ्या भारतीय चित्रपट व्यवसायाच्या जनकाचा जन्म १५१ वर्षांपूर्वी नाशिकमध्ये झाला. त्याचं नाव होतं, धुंडिराज उर्फ दादासाहेब फाळके!

वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्यांना मूक चित्रपट निर्मितीच्या वेडाने झपाटलेले होते. त्याविषयी अभ्यास करताना कमी झोपेमुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम झाला. डॉ. प्रभाकर यांनी त्यांना पुन्हा गेलेली दृष्टी प्राप्त करुन दिली.

पहिला ‘राजा हरिश्चंद्र’ हा एक तासाचा मूकपट तयार करण्यासाठी त्यांना आठ नऊ महिन्यांचा कालावधी लागला. राजा हरिश्चंद्राची भूमिका त्यांनी स्वतः केली, तारामतीची भूमिका साळुंके नावाच्या पुरुष कलावंताने साकारली व राजा हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका दादासाहेबांची कन्या, मंदाकिनी हिने केली. कठोर परिश्रमातून केलेल्या या चित्रपटाने दादासाहेबांना यश, कीर्ती, पैसा भरपूर मिळवून दिला. भारतीय चित्रपट उद्योगाची त्यांनी मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी आयुष्यभरात एकूण ५२ मूकपट, ‘गंगावतरण’ बोलपट, अनुबोधपटांबरोबर ३० लघुपटांची निर्मिती केली.

दादासाहेब फाळकेंच्या जन्म शताब्दीपासून भारत सरकारने त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ मानाचा, प्रतिष्ठेचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार सुरु केला. त्यांच्या पहिल्या पुरस्काराच्या मानकरी होत्या, देविका राणी. या वर्षीचा मानकरी आहे, रजनीकांत! या पन्नास वर्षांच्या कालावधीत कोणत्याही मराठी मंत्र्याला ‘सुलोचना दीदी’ला फाळके पुरस्कार द्यावा असं चुकूनही मनात आलं नाही, याचं ‘आश्र्चर्य’ वाटतं!!!

गेल्या शंभर वर्षांत मराठी चित्रपटसृष्टी देखील बहरली. कृष्णधवल मूकपटांपासून बोलपट, कृष्णधवल बोलपटापासून रंगीत चित्रपट, रंगीत सिनेमास्कोप चित्रपटापासून डिजिटल थ्रीडी चित्रपटापर्यंत तिने प्रगती केली. बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, प्रभात फिल्म कंपनी, राजकमल चित्रनिर्मिती संस्था, मा. विनायक, राजा परांजपे, राजा ठाकूर, दादा कोंडके, सचिन पिळगांवकर, स्मिता तळवलकर, सुमित्रा भावे, इत्यादींनी मराठी चित्रपटसृष्टीला देदीप्यमान यश मिळवून दिले.

१९६२ सालापासून महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पुरस्कार देण्यास सुरुवात केली. १९६१ सालातील ‘प्रपंच’ला पहिला व ‘सुवासिनी’ ला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९६७ पासून दरवर्षी सर्वोत्कृष्ट तीन मराठी चित्रपटांना अनुक्रमे पहिला, दुसरा व तिसरा पुरस्कार मिळू लागले. कलाकार, सहकलाकार, विनोदी कलाकार, प्रथम पदार्पण करणाऱ्या कलाकारांबरोबरच तंत्रज्ञांना देखील पुरस्कार दिले जाऊ लागले.

दरवर्षी ३० एप्रिल रोजी हा पुरस्कार सोहळा मुंबईत थाटामाटात साजरा होऊ लागला. आम्हा बंधूंना १९९६ साली ‘पैंजण’ चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट जाहिरातीसाठी पुरस्कार मिळाला. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही पुरस्काराची बातमी दूरदर्शनवरील मराठी बातम्यात संध्याकाळी प्रसारीत झाली. दुसऱ्या दिवशी ‘दै. सकाळ’सह सर्व वर्तमानपत्रात सविस्तर बातमी प्रसिद्ध झाली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पुणे आकाशवाणीवर बण्डा जोशी यांनी आमची मुलाखत घेतली.

१९९८ साली ‘तू तिथं मी’ चित्रपटासाठी व २००० साली ‘बिनधास्त’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट जाहिरातीसाठी आम्हाला पुन्हा पुरस्कार मिळाला. त्यासाठी अनुक्रमे आम्ही षण्मुखानंद हॉल व दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे गेलो होतो. त्यावेळीही वर्तमानपत्रात चित्रपट पुरस्काराच्या सविस्तर बातम्या आल्या होत्या.

नंतरच्या वर्षांपासून ३० एप्रिलला नियमित पुरस्कार सोहळे मुंबईत होत होते मात्र वर्तमानपत्रांनी त्या विषयीच्या बातम्या त्रोटक स्वरूपात देण्यास सुरुवात केली. मराठी चित्रपटांविषयीचे स्वारस्य कमी होऊन त्यांना जाहिराती महत्त्वाच्या वाटू लागल्या. हळूहळू महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सव कधी होतो, हे देखील चित्रपट रसिक विसरुन गेले. गेल्या दहा वर्षांत या सोहळ्याविषयी कुठेही सविस्तर बातमी वाचलेली नाही. गेले दोन वर्ष कोरोनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीला खीळ बसलेली आहे.

मराठी चित्रपट निर्मिती होते आहे, मात्र प्रदर्शित करायला थिएटर नाही. लॉकडाऊनमुळे सुमारे दोनशे चित्रपट तयार होऊन प्रदर्शनाची वाट पहात आहेत. निर्मात्यांचे पैसे गुंतून पडले आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन किमान खर्च निघाला तरी निर्माता जगेल, अन्यथा तो पुन्हा चित्रपट निर्मितीच्या वाटेला जाणार नाही.

आपण आज दादासाहेब फाळके यांच्या जयंतीनिमित्त आशा करुयात की, हे कोरोनाचे संकट गेल्यावर मराठी चित्रपटसृष्टी ‘पुन्हा नव्याने जन्म’ घेईल…

‘भारतरत्न’ पुरस्काराची योग्यता असणाऱ्या आदरणीय दादासाहेब फाळकेंना १५१व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

© सुरेश नावडकर.

मोबाईल ९७३००३४२८४

३०-४-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..