यशोदेच्या बाळकृष्णाने अंगणातील माती मुखी घातली आणि खाऊ लागला…. तोच यशोदेची नजर तिथे जाताच, तिने जोरात तिथे धाव घेतली आणि आपल्या बाळकृष्णाचे माती लागलेले हात आपल्या पदराने पुसले. त्याचे मुखही स्वच्छ केले. माती तोंडात तर गेली नसावी, या संशयाने आपल्या बाळकृष्णाला तोंड उघडे करून दाखवायला सांगितले. आणि जेव्हा बाळकृष्णाने आपले तोंड उघडे करून दाखवले. तेव्हा हे सर्वांनाच माहिती आहे, की बाळकृष्णाच्या मुखात यशोदेला साक्षात सूर्य, चंद्र, तारे यांनी सजलेल्या अशा असंख्य आकाशगंगा दिसल्या. अखंड ब्रह्मांड दिसले. उघड्या डोळ्यांनी नीट बघू शकणार नाही. असं भव्य दिव्य तेज दिसलं. प्रकाश दिसला. हे सर्व काय असावं? ही आपल्या अंतर्मनाची शक्ती…. जी साक्षात भगवंताने बालरूपामध्येच आपल्याला जाणीव करून दिली.
ज्या शक्तीची परमेश्वराने आपल्याला लीला दाखवली, ज्या शक्तीला आपण बाहेरच्या काळोखात शोधत आहोत. ती आपल्या अंतरी सामावलेली आहे, अंतर्मनात लपलेली आहे. फक्त तिला जागृत करता आलं पाहिजे. जे फक्त ध्यान चिंतनानेच शक्य आहे. अंतर्मनाची चेतना जागृत करण्यासाठी आपल्याला ध्यान खुप गरजेचं आहे. आपल्यातलं ब्रह्माण्ड आपल्याशीच संवाद साधण्यासाठी आपण ध्यान करणं खुप महत्वाचं आहे. अंतर्मनातल्या प्रकाशामध्ये जी दुर्मिळ गोष्ट आपल्याला सापडू शकते. ती बाहेरच्या काळोखामध्ये शोधण्यात आपण आपला वेळ व्यर्थ घालवत आहोत. म्हणूनचं बाहेरच्या काळोखाशी नातं न जोडता अंतर्मनातल्या प्रकाशाशी नातं जोडणं, म्हणजे साक्षात ब्रह्माण्डाशी नाते जोडण्यासारखे आहे.
— स्वाती पवार
Leave a Reply