प्रसंग १- साल आठवत नाही, पण भुसावळला वडिलांनी एक दिवस एक अंक माझ्यासमोर टाकला आणि म्हणाले- ” यातील दि. बा. मोकाशींची ” आता आमोद सुनासि आले ” ही कथा वाच “. वाचली. कालौघात त्यावर ज्ञानाचे, अज्ञानाचे थर बसले. शेवटी कळली मात्र आज !
प्रसंग २- सुमित्रा ताई भावे यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या न पाहिलेल्या चित्रपटांचे बघणे झाले, त्यावर लिहिणे झाले. त्यादरम्यान कोठेतरी अलीकडच्या “दिठी ” चा उल्लेख होता.
प्रसंग ३- आषाढी वारीच्या निमित्ताने “माझा कट्टा “मध्ये डॉ. मोहन आगाशेंना ऐकलं – ” दिठी म्हणजे आत्मानुभूतीचा अनुभव ” असं ते म्हणाले.आणि दि. बा. मोकाशींच्या कथेवर तो बेतलाय असा सुगावा लागला. वरील पहिला प्रसंग राख झुगारून मनात रसरसला.
मग शोध सुरु केला. कोठेतरी रिव्हयू , कोठेतरी मिनिटभराचे ट्रेलर पण चित्रपट घावेना. मग कळले “सोनी लाईव्ह ” वर आहे. काल एक महिन्याची वर्गणी भरली आणि आज पाहिला.
ज्ञानोबा माउलींच्या बाबतीत असा उल्लेख होतो- ” एकतरी ओवी अनुभवावी.” वाचावी नाही- अनुभूतीचा वादा करायला सांगितलंय. कथा वाचलीय, अनुभवली नव्हती. म्हणजे तिचे तुकडे तुकडे वाट्याला आले होते. उदाहरणार्थ मुक्ताई नगरला वडिलांच्या आजोळी गेलो की गोठ्यातील गाई-म्हशींची धार काढण्याचे दृश्य पाहण्याची उत्सुकता असायची. गडी किंवा वडिलांचे मामा दोन्ही गुढघ्यांमध्ये बादली धरून दूध काढायचे. मला तत्परतेने हाकलायचे – ” इथे थांबू नको, गाय /म्हैस दूध चोरते “. मला आज ते कळलं – रामजी सगुणा गाईची “सुटका ” करताना अमृता सुभाष ला झापतो ” बाई असून तुला कळंना व्हय गं, जरा सगुणेभोवती आडोसा लाव. ”
मुक्या प्राण्यांच्याही लज्जेचा केवढा सहज हा विचार !
३० वर्षे वारी केलेल्या रामजीला द्वैत /अद्वैत समजावून सांगायला पुन्हा माऊली पुढे सरसावते. जन्म-मृत्यू अलग करता येत नाहीत. मात्र दोन्हींमध्ये अपरिहार्य वेदना असते. रामजीचा तरुण मुलगा उफाणलेल्या नदीच्या भोवऱ्यात सापडून दिसेनासा होतो. घरी सून – ओली बाळंतीण ! तिने रामजीच्या इच्छेनुसार “मुलगा ” दिला नाही, म्हणून दुःखावेगाने रामजी नातीला आणि सुनेला घराबाहेर जाण्याचे फर्मान सोडतो.
गावकऱ्यांच्या सहवासात “ज्ञानेश्वरी ” आणि “अमृतानुभवात ” मन रमवू न शकलेला रामजी उद्वेगाने म्हणतो- ” माझी तीस वर्षांची तपश्चर्या व्यर्थ गेली. मला आता पोथीतले काही ऐकायचे नाही आणि ते कळतही नाही. तो विठ्ठल कां उत्तरं देत नाहीए माझ्या प्रश्नांची? माझ्या मुलाला सद्गती/मोक्ष देणार आहे की नाही तो? “
गावकरी म्हणतात- ” अरे किती भार टाकशील त्याच्यावर ?”
गिरीश कुळकर्णी विचारतो- ” पोथीने आजवर लाखो प्रश्नांना उत्तरे दिलीत, पण मला सांगा- जेव्हा पोथ्या नव्हत्या, तेव्हा लोकांना प्रश्नच पडायचे नाहीत कां ? ”
सुज्ञ मोहन आगाशे समजावतात वडीलकीच्या अधिकारात-
” बाबारे उत्तरं असतात. काहींना सापडतात, काहींना मिळत नाही.”
सगुणा गाय अडल्यावर तिच्या वेदना डोळ्यांत घेऊन अमृता सुभाष पडत्या पावसात हाती कंदील घेऊन रामजीला शोधत येते. पोथी श्रवण अर्धवट सोडून रामजी मदतीला धावतो. सगळे कौशल्य पणाला लावून सगुणेची सुटका करतो आणि स्वतःचीही.
तिला बाळ (कालवड ) होत असताना माझं बाळ कां गेलं, या प्रश्नाचं उत्तरही त्याला मिळतं. तातडीने घरी येऊन तो सुनेला आणि नातीला थांबवतो- ” माय गं, तुझ्या या म्हाताऱ्या लेकराला माफ कर. ओली बाळंतीण तू, उंबऱ्याबाहेर जायचे नसते.”
आभाळ सावरते, सगुणेची सुटका होते तसा रामजी निवळतो. ज्ञानोबा माऊलींचे काम झालेले असते.
असं मानतात- माऊली समोर ज्ञानाचा (खरं तर अज्ञानाचा ) तोरा मिरवत जायचं नसतं, तिच्या कुशीत लडिवाळपणे शिरायचं असतं. मग ती सगळी गुह्ये उलगडून सांगते- रामजीला शिकवलं तसं !
प्रश्न संपलेला, स्थिर झालेला रामजी पोथीकडे वळतो. आता आमोद सुनासि आलेला असतो.
डॉ आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुळकर्णी, उत्तरा बावकर, अमृता सुभाष सारेजण माउलींच्या बोटाला धरून “दिठी ” दाखवितात. राहता राहिला “किशोर कदम ” ( सौमित्र). त्यालाही “अनुभवावे.” इतका उच्च कोटीचा अभिनय अभावानेच पाहायला मिळतो. तो रामजीमय झालाय. उण्यापुऱ्या एक तास सत्तावीस मिनिटांनी आपण आधीचे राहिलेलो नसतो.
माउलींच्या एका ओवीत दृश्यात्मकता ओतल्यावर, तिला चित्ररूप दिल्यावर एवढा परिणाम, तर संपूर्ण ज्ञानेश्वरीवर असे किती चित्रपट निघू शकतील?
मंगेशकर भावंडांनी आळंदीचे कुळकर्णी कुटुंब आपल्या स्वर्गीय स्वरात ऐकवून आपल्या श्रुती धन्य केलेल्याच आहेत, आता आपली “दिठी ” धन्य झालीय.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply