जगी सर्वसुखी असा कोण आहे| विचारी मना तुचि शोधोनि पाहे|
मना तोचि रे पूर्वसंचित केले| तयासारिखे भोगणे प्राप्त जाले||११||
एकदा एका गावात गौतम बुद्ध उतरले होते, त्याच गावात एका स्त्रीचा पती मरण पावला होता. पती निधनाने ती खूप दुःखी झाली होती. गावातील काही लोकांनी तिला बुद्धा कडे जायचा, त्यांना भेटायचा सल्ला दिला. बुद्धदेव म्हणजे भगवंताचे रूप असल्यामुळे ते आपल्या मृत पतीला जीवंत करतील ह्या वेड्या आशेने ती भेटायला गेली. तिने आपली व्यथा बुद्धदेवाला सांगितली आणि नवऱ्याला जीवंत करण्याची विनंती केली. बुद्धदेव तिला म्हणाले “ज्या घरात कोणीही मरण पावले नाही अशा घरातील मोहरी तू घेऊन ये. माझ्या कमंडलुतील तीर्थात मी ही मोहरी घालीन. त्या मोहरीचे पाणी शिंपडताच तुझा नवरा जिवंत होईल.” त्या बाईने मोहरी मिळवण्यासाठी अनेकांचे दरवाजे ठोठावले. पण प्रत्येक घरात कुणी ना कुणी मेले होते. उलट तिला तिच्यापेक्षा अधिक दुर्दैवी आणि अधिक दुःखी स्त्रिया भेटल्या. जगाची दुःखं पाहून तिला नवी दृष्टी मिळाली. ईश्वराने आपल्याला किती सुख दिले आहे ह्याची जाणीव तिला झाली.
कै. वि. स. खांडेकर म्हणतात – ‘मानवी जीवन म्हणजे सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले वस्त्र होय.” सुख आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू. आपण सुखाचा सहज स्वीकार करतो पण दुःख पचवताना मात्र कष्ट सोसावे लागतात. दुःखाला कुरवाळायची सवय लागली आहे. दिवसभरात जितक्या लोकांबरोबर आपण चर्चा करतो त्याचा विषय सुद्धा दुःख, तणाव, कष्ट, समस्या.. .. हेच असतात. एखादी सुखद बातमी एकून आपल्याला खरंच किती सुख मिळाले ह्याची चाचणी करायला हवी. कारण बहुतेकदा आपल्या दुःखाचे कारण दुसऱ्याचे सुख ही असते. मानसशास्त्रज्ञ सांगतात की जो अनवाणी चालतो त्याने अपंगाकडे बघून समाधानी रहावे, ज्यांच्याकडे वाहाणा आहेत त्याने अनवाणी चालत असलेल्या कडे पाहून समाधान मानावे. वाहनातून जाणाऱ्याने पायी चालणाऱ्याकडे पाहावे. दुसऱ्याच्या दुःखाकडे बघून मनुष्य आपले दुःख किती छोटे आहे ह्याचे माप समजतो. त्यावेळी मात्र त्याला आपल्या दुःखाचा स्वीकार करणे शक्य होते. शंभर टक्के सुख व शंभर टक्के दुःख कोणालाच मिळाले नाही ही वास्तविकता आहे.
दुःख आल्यावर सुखाची चव कळते. जेव्हा सुख मिळत असते तेव्हा ते फिके वाटत असते. जसे एखादा व्यक्ति खूप दिवस उपाशी असेल तर त्याला जे मिळेल ते अन्न गोड लागते. किंवा खूप भूक लागली असेल तर जे मिळेल ते चांगले म्हणून खातो. तसेच आज जे प्राप्त झाले आहे त्याचा मनापासून स्वीकार करावा कारण जे आज आहे ते कदाचित उद्या आपल्या जवळ नसेल म्हणून त्याचे मोल समजावे. तसेच जे आज मिळत आहे ती आपल्याच कर्मांचे प्रतिफळ आहे. बीजारोपण आपणच कधीतरी केले होते ते आज नशिबी आले. हे फळ तुमचे आवडते की नावडते हे कोणीही विचारणार नाही. आपल्याला त्याचा स्वीकार हा करावाच लागतो. माझ्या जीवनात मला किती सुख मिळाले ह्याचे मोज माप आपण ठेवत नाहीत पण मी किती दुःख सोसली मात्र ह्याची यादी वर्षोनवर्षे जपून ठेवतो. त्यावर सर्रास चर्चा केली जाते. पण आपण हे विसरून जातो की जे उगाळू त्याचा सुवास सर्वत्र पसरेल. सुखाचे चंदन उगाळले तर त्याचा सुगंध पसरेल पण जर दुःख उगाळले तर त्याची दुर्गंध पसरेल. त्याने आपण स्वतः बेचैन होऊच पण आपल्या संपर्कात आलेले आपले प्रियजन ही दुःखी होतील. जर आपल्याला सर्वांना सुखी बघायचे असेल तर आपण आपले दुःख कोणतीही चर्चा न करता शांत मनाने स्वीकारावी.
मन शांत असेल तर त्या दुःखाचे मूळ काय आहे व त्याला कसे संपवावे ह्याची समज येईल. आणि मुख्य मुद्दा हा की काळ हा परिवर्तनशील आहे. आज जे आपल्या वाट्याला आले आहे ते आयुष्यभर तसेच नाही राहणार. सर्व वेळेनुरूप बदलत जाईल. त्या बदलाची वाट पहावी. वेळ हा एक शिक्षक आहे. जसे शालेय जीवनात अनेक विषय शिकवले जायचे व त्यांचे शिक्षक ही वेगळे असायचे. तसेच ह्या जीवनाच्या शाळेत अनेक गोष्टी शिकवण्यासाठी अनेक समस्या, दुःख, वेळ .. .. कारण बनतात. त्यातले सार घेऊन पुढे जावे. कोणी, का, कसे, कुठे, केव्हा अश्या अनेक प्रश्नाच्या जाळ्यात स्वतःला न अडकवता आपल्या मार्गावर चालत रहावे. आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद.
— ब्रह्माकुमारी नीता
Leave a Reply