कितीही सोडवली आयुष्याची प्रश्नपत्रिका …
तरी भरायच्या राहतातच……. काही “”गाळलेल्या”” जागा
कितीही आठवायचा प्रयत्न केला तरीही …
कायम धूसर असतातच …… काही “”ढगाळलेल्या”” जागा
विसरून जाव्याश्या वाटत असल्या तरीही..
पाठ न सोडणाऱ्या असतातच…… काही “”डागाळलेल्या”” जागा
कधीच निसटून जाऊ नये म्हणून …
घट्ट मुठीत जखडून ठेवलेल्या असतातच ….. काही “”चूरगळलेल्या”” जागा
आपल्या आपल्या वाटत असताना….
डोळ्यादेखत दूर गेलेल्या असतातच ….. काही “”घरंगळलेल्या”” जागा
कितीही उसनं अवसान आणलं तरीही…
न टाळता येणाऱ्या असतातच …… काही “”मरगळलेल्या”” जागा
सर्वकाही अवतीभवती असूनसुद्धा …
अपूर्णत्वाची खंत वाटणाऱ्या असतातच …… काही “”बारगळलेल्या”” जागा
कधीकधी संधी समोर असूनही ….
जाणूनबुजून अंतर ठेवलेल्या असतातच …… काही “”वगळलेल्या”” जागा
दिवसेंदिवस गतिमान होत असलो तरीही….
पावलांचा वेग मंदावणाऱ्या असतातच ………. काही “”रेंगाळलेल्या”” जागा
कितीही सोडवली आयुष्याची प्रश्नपत्रिका
तरी भरायच्या राहतातच……. काही “”गाळलेल्या”” जागा
— क्षितिज दाते.
ठाणे.
Leave a Reply