दादर गुवाहाटी (आसाम) एक्सप्रेस मध्ये शिरेपर्यंत मौशु काय मजेत होती. ’बाबा केवढा लांबचा प्रवास असेल हा? अगं! प्रवासात इतकी मजा येणार आहे, नुसती धमाल आहे. आई लवकरच येणार आहे या आशेने ती खिडकीतून येणारी माणसे शोधत होती, गाडी सुरु झाली आणि आई आलेली नाही हे कळताच तिने जे भोकाड पसरले त्या आवाजाने त्याच्या मनावर साधा दयेचा रेघोटा सुद्धा उठला नाही, एसीच्या डब्यात फारच कमी प्रवासी होते, कारण या गाडी सारखी टुकार गाडी कोणतीच नसेल, आणि म्हणूनच त्याने ही गाडी पत्करली होती, चुकून कोणी ओळखीचे न भेटो हा मुख्य डाव होता. तिच्या जीवनातील एका अघोरी प्रवासाची ही सुरवात होती. बंगाल प्रांतातील जलपईगुरी पर्यंत ५२ तासाचा प्रवास म्हणजे एक दिव्यच होते. पुढच्या स्टेशनवर तरी आई येईल या भाबड्या आशेवर मधेच मुसमुसत तर एकदम भोकाड पसरत आकांद तांडव करत होती. निगरगट्ट निष्ठुर मनाचा बाप तिची गोड शब्दात समजूत घालत होता. शेवटी रडून रडून ती गाढ झोपी गेली. एका गुहेत प्रवेश तर केला होता, पुढचा मार्ग माहीत नव्हता, डोळ्यात आसुरी आनंदाची झाक होती.
मुंबईत संगीताने सकाळी १० वाजता त्याच्या ऑफीस मध्ये फोन लावला. आणि फोनवरील संभाषण ऐकून ती ढासळलीच, मधेच फोन बंद झाल्याने मॅनेजर साहेबानी फोन लावला, ’संगीता मॅडम बिपीनने तडका फडकी १५ दिवसापूर्वी काहीही सबळ कारण न देता राजीनामा दिला, आमच्याशी फार उध्दटपणे तो वागला आणि कंपनीकडून मिळणाऱ्या सर्व पैशाचा चेकही घेऊन गेला, आपण पुढे काय करणार याचा खुलासाही त्याने केला नाही. बॅंकेमुळे ते संगीताला चांगले ओळखत होते, पण या क्षणाला तरी आपल्या घरात घडलेल्या घटनेची तिने वाच्यता केली नाही. मनाला शांत ठेवत ती झाल्या घटनांचा विचार करत असताना या कपटी खेळाचा हेतू काय? हे उमगण्याचा प्रयत्न करत होती. तिची बॅंकेची नोकरी, तिची प्रगती आणि त्याचा अहंकार या सर्व गोष्टी त्याला डाचत होत्या, ती त्याच्या कोणत्याच गोष्टी पुढे बधत नव्हती, तेंव्हा तिला एक जबरदस्त प्रहार करुन कायमचेच नेस्तनाबूत करायचे आणि मुलीला तिच्यापासून कायमचची तोडयचीच ह्या सूड भावनेने तो पेटलेला होता. घरात कोणतीही चिठ्ठी ठेवलेली नव्हती, केरळ मध्ये आई वडीलांशी संबंध नव्हतेच विचारपूस तरी कोठे करणार?
संगिताच्या आईच्या शाळेतील एका शिक्षकाचे भाऊ श्री विश्वास पेंडसे मुंबई पोलीस खात्यातील गुन्हा शोध विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते. दोन दिवस उलटून गेलेले, कोणताही फोन येण्याची सुतराम शक्यता नव्हती आता पोलीस चक्रात पडल्या शिवाय तरणोपाय नव्हता. श्री. पेंडसे यांच्या मदतीने बांन्द्रे पोलीस स्टेशन मध्ये नवरा व मुलगी घरातून पळून गेल्याची रीतसर तक्रार नोंदविली गेली. पेंडसे यांच्या दबावामुळे प्रमुख पोलीस अधिकारी अभिजित सावंत यांनी अतिशय सौम्यपणे पोलिसी खाक्या न वापरता जबानी नोंदविली. आमच्या परीने आमचे सर्वस्व पणाला लावून त्याच्या पर्यंत नक्की पोहचू अशी ग्वाही दिली, आपल्याला पावले फार शिताफीने व काळजीपूर्वक टाकावी लागतील, मुलीला नेण्याचा हेतू कळत नसल्याने तो काही दगाबाजी करू शकतो अशी शंका त्यानी व्यक्त केली. दोघां मधील वैवाहिक संबंध, त्याचे कोणत्या परस्त्रीशी संबंध असण्याची शक्यता, अशा अनेक मनाला क्लेश देणाऱ्या प्रश्नांच्या सरबत्तीला संगीताला तोंड द्यावेच लागले होते आता त्याच्या ऑफीस मधील अनेक व्यक्तीना चौकशीत सहभागी करणे अत्यंत गरजेचे होते, आता तर सगळे जगजाहीर झाल्याने उलट सुलट चर्चेला उधाणच फुटले होते. घरच्या चौकशीत सर्व कपाटे, बेडरूम यांची कसून छाननी केली गेली होती. बिपीनने पैशाची सर्व आंखणी फार चतुर पद्धतीने केलेली, ना संगीताच्या दागिन्यांना हात लावलेला, ना तिच्या बॅंक खात्यात ढवळा ढवळ केलेली, दोघांमध्ये वितुष्ट होते हे सांगावेच लागले होते.
मौशूच्या वाढदिवसाच्या वेळचा त्या दोघांचा फोटो पोलीसांनी ताब्यात घेतला होता. संगीताच्या दु:खाने तिला पार बुडवून टाकले होते. सर्व बाजूंनी जीवनात होता न संपणारा अंध:कार.
— डॉ. अविनाश वैद्य.
Leave a Reply