१९८५ सालच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केलेली ही कविता ! आजही तितकीच ताजी आणि संदर्भयुक्त आहे –
मायबाप उमेदवारहो !
तुम्ही “उभे “राहण्यासाठी निवडणुका घेता,असं कळलं .
मग न मागता खालील सोयी मिळतील –
भिंती (फर्स्ट कम बेसिस वर), सभांसाठी कान
प्रचाराला घसे (रोज “जळजळते “डोस मात्र हवे )
टाळ्यांना हात, वाहने (७०० रू रोज +डिझेल तुमचे )
सभांकरिता देह (ट्रकमधून येण्यास उत्सुक)
आणि आश्वासनांनी हरखून जाण्यासाठी मने !
तुमचे मुखवटे कसे विनीत असतात –
जोडलेले हात ,लाचार हास्य ,पदयात्रा
(रोजंदारीवरच्या सुवासिनींचे ओवाळणे )
सगळे कार्यकर्ते दरवेळी नव्या जोमाने तुमच्यासाठी राबतात
साखर कारखाने ,सोसायट्या, पतसंस्था ,शाळांमधील वानरसेना !
तुम्ही मते मागता (कधी तर पैसेही वाटता त्यासाठी )
मग आम्ही आमचं “किंमती ” मत “दान “करतो तुम्हांला
आणि वाट पाहात बसतो – सुखाच्या पहाटवाऱ्याची
तुम्हीं मात्र मग्न असता –
या देशाचं अधिकाधिक “वाटोळं “करण्यात !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply