आकाशवाणीवरील वनिता मंडळ आणि नाटय़ विभागाच्या निर्मात्या उमा दीक्षित यांचा जन्म २५ मे ला झाला.
उमा दीक्षित या सर्वोदयी कार्यकर्ते गोविंद काशीराम शिंदे आणि त्यांच्या पत्नी सर्वोदयी कार्यकर्त्यां सुशीला यांच्या कन्या.
आघाडीचे विनोबाजींचे कार्यकर्ते ७०च्या दशकात होते त्यामध्ये नानासाहेब गोरे, अण्णासाहेब सहस्र्बुद्धे, एस. एम. जोशी यांच्या सारख्यांची एक पोलादी साखळी होती आणि उमा यांच्या खादीप्रेमी वडिलांचा या साखळीशी घट्ट व घरोब्याचा संबंध होता.
पुढे ते पनवेलजवळील ‘शांतिवन’च्या उभारणीत मग्न झाले. तिथल्या कुष्ठरोग्यांची सेवा करू लागले व एक पैसाही न घेता आयुष्याच्या अखेपर्यंत ते तिथेच ‘सेवाव्रती’ होऊन राहिले. तिथलेच झाले! उमा यांच्या आईना मात्र संसाराकडे पाठ फिरवणे शक्य झाले नाही. प्रोबेशनरी ऑफिसर या नात्याने तिने नोकरी केली. एम. ए.(इंग्रजी साहित्य) – मुंबई विद्यापीठ, व बी.एड. (इंग्रजी) मुंबई विद्यापीठ अशा दोन पदव्या संपादून घेतलेल्या उमा यांनी प्राध्यापकी करण्याचे मनात घोळत असतानाच स्टाफ सिलेक्शन बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आकाशवाणीत रुजू झाल्या. सुरुवातीला प्रसारण अधिकारी आणि २००३ नंतर कार्यक्रम अधिकारी म्हणून, निर्माती म्हणून त्या काम करू लागल्या.
१९८९ पासून आजपर्यंत ‘आकाशवाणी’वर जीव जडवून बसलेली, एक उत्तम सक्षम अधिकारी असा सन्मान मिळवलेल्या उमा आज फार मोठमोठय़ा कामांचा लीलया फडशा पाडत आहेत. आकाशवाणीत काम करणे, कार्यक्रमांची आखणी करणे हे भूषणच वाटायचे. वातावरण चांगले होते. जीव ओतून आवडीने काम करणारी माणसे होती. संगीतकार प्रभाकर पंडितांनी तर अगदी पित्याच्या भूमिकेतून मार्गदर्शन केले. कवी वसंत बापट यायचे. चहा पिता पिता ‘एक गीत लिहून द्या’ म्हटले की लोकगीतगंगा कार्यक्रमासाठी गीत लिहून द्यायचे. कुठलेही नाटक न करता नाटय़विभागाची धुराही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. तेव्हापासून आजतागायत नवनिर्मितीचा सिलसिला अखंड चालू आहे. उमा यांनी आकाशवाणीवर लक्षवेधी काम केलेलं आहे. मुंबईच्या आकाशवाणी केंद्राच्या सेंट्रल सेल्स युनिट या विभागात अत्युच्च लोकप्रिय आणि रेव्हेन्यू मिळविणा-या ‘चित्र लोक’ या कामाची कमर्शियल बुकिंगची जबाबदारी त्या पार पाडत असत. काही काळापूर्वी त्यांची कोल्हापूर केंद्रात कार्यक्रम अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांनी वनितामंडळात रेसिपी शोज, फोनवरून आजची पाककृती असे कार्यक्रम सादर केले. शेफ स्पेशल, प्रांतोप्रांतीची खासियत सांगत श्रोत्यांना रुचकर प्रवास घडवला. ‘वनितामंडळ’ हा स्त्रियांसाठी असलेला कार्यक्रम रोज ५५ मिनिटे सगळ्या केंद्रांवरून सादर केला जातो. स्त्रियांसाठी मनोरंजन, ज्ञान, प्रबोधन आपले प्रश्न मांडण्याचे हे हक्काचे व्यासपीठ. आकाशवाणीने, या सरकारी माध्यमातून स्त्रियांचा जो विचार केला आहे तो अन्य कुठल्याही माध्यमात केला गेलेला नाही,आज पर्यत त्यांनी अनेक उत्तमोत्तम कार्यक्रमांची निर्मिती तिने केली आहे. युनिसेफने प्रायोजित केलेली ९५ भागांची डेली सोप मालिका, ‘गाथा स्त्री शक्तीची’ अशी १३ भागांची एक व दुसरी नऊ भागांची,नऊ स्त्रियांच्या जीवनावर नाटक आणि मुलाखतींवर आधारित, असं घडलं २६ भागांची नाटय मालिका, किस्से रंगभूमीचे मुलाखतींवर आधारित, काही नभोनाटय मालिका उदा. या चिमण्यांनो परत फिरा रे, पैठणी, मातृरोपण १९ भाग, लेकीचा गं जलम ६ भाग, विठूच्या या तुळशीच्या मंजि-या (स्त्री संतांच्या रचनांवर आधारित) असे अनेक उपक्रम राबविणा-या उमा यांनी अनेक शीर्षक गीते रचली आहेत.
प्रसंगी काही मालिकांतून कामही केलेलं आहे. आठवणींच्या गंधकोशी, स्वयंप्रकाशिता, रंगमंचीय नाटकांचे नभोनाटय रूपांतर केले आहे. या व्यतिरिक्त त्यांची सर्वाधिक मौल्यवान कामगिरी म्हणजे, ‘आकाशवाणी अर्काइव्हजसाठी’ ध्वनिमुद्रणाचे काम करवून इतिहासाचे मौल्यवान स्वरूपाचे केलेले जतन कार्य!
सामाजिक, कौटुंबिक, आरोग्यदायी जाणिवांचे प्रतिबिंब वनितामंडळाच्या विविध कार्यक्रमांतून आणि नभोनाटय़ाच्या निर्मितीतून घडू लागले. ‘अहो प्रपंच’ ही कौटुंबिक मालिका, ‘मंत्र जगण्याचा’ ही ९५ भागांची दीर्घमालिका, रंगभूमीचा इतिहास सांगणारे ‘असं घडलं नाटक’ व ‘किस्से रंगभूमीचे,’ ‘या चिमण्यांनो परत फिरा रे,’ ‘पैठणी’, ‘मातृरूपेण’, ‘विठूच्या या तुळशीच्या मंजिऱ्या’, ‘लेकीचा गं जलम’, ‘स्वयंप्रकाशिता’ अशा असंख्य मालिकांतून अनेक विषय हाताळले.
त्यानिमित्ताने मोठमोठय़ा कलाकारांना आकाशवाणीवर आमंत्रित केले. त्यामुळे त्यांचा सहवास लाभला. आवाजातले वैविध्य सादर करून उमाताईंनी जणू ‘स्वर’भावयात्रा सुरू केली. विविध क्षेत्रांतील दिग्गजांशी परिचय झाला आणि अनुभवविश्व समृद्ध झाले.
१३ एपिसोडसाठी विक्रम गोखलेंनी सलगपणे केलेलं निवेदन, स्क्रीप्टवर काम करण्यासाठी तासन् तास बसलेली सोनाली कुलकर्णी, डोळ्यांत अश्रू आणून ‘माझंच नाटक मला ऐकवून रडवलंस पोरी’ म्हणणा-या सिंधुताई सपकाळ, तुझ्यासारखे लोक शासकीय सेवेत असतील तर देश कुठल्या कुठे जाईल, म्हणणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, आकाशवाणी आणि दूरदर्शनने आम्हाला बोलावलं तर नकार द्यायचा नाही नि पैशाचा विचार करायचा नाही असं म्हणणारे मच्छिंद्रनाथ कांबळी.. अशा खूप कलावंताच्या आठवणी उमा यांनी जपलेल्या आहेत.
उमा यांना मराठी नाटय परिषद बोरिवली शाखेचा ‘स्वराभिनय’ पुरस्कार, ‘आम्ही उद्योगिनी’चा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळवले आहेत. उमा दीक्षित यांनी ‘आकाशवाणी-दूरदर्शन जॉइंट फोरम’च्या युनिट सेक्रेटरी म्हणून काम केले आहे.
आकाशवाणीतील याच प्रवासात समीर दीक्षित हा आयुष्याचा जोडीदार भेटला. त्यांच्याशी विवाह झाल्यानंतर उमाताई ठाणेकर झाल्या. त्यांचे पती समीर ‘चित्रपट वितरक म्हणून व्यवसाय करतात.त्यांनी जवळपास शंभरच्या वर हिंदी-मराठी चित्रपटांचं वितरण केले आहे.’ त्याच्याविषयी अवधूत गुप्ते व अलका कुबल मोठय़ा अभिमानाने सांगतात की, आपण शंभर टक्के दिलं तर तो एकशे दहा टक्के परत देतो.’ इतका त्यांचा समीरच्या आत्यंतिक प्रामाणिकतेविषयी विश्वास आहे.
समीर यांनी ‘१० वर्षे आकाशवाणी, सागरिका, ऐका दाजिबा अल्बमसाठी भरपूर काम केले आहे. ते स्वत: तबला प्रेमी आहेत.
उमा दीक्षित आता दूरदर्शनवर कार्यक्रम अधिकारी व निर्माती या पदावर कार्यरत आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या ‘मैत्र हे शब्द सुरांचे’ ह्या अतिशय उत्तम मालिकेची संकल्पना व निर्मिती त्यांचीच आहे. उमा आकाशवाणी विषयी म्हणतात, मानवतेचा स्पर्श देणारं आकाशवाणी हे एक सशक्त माध्यम आहे. अत्यंत आनंद देणारं, सामाजिक बांधिलकीला पोषक ठरणारं, नोकरीचं रुक्षपण, सांचलेपण नसणारं, विचारांना चालना देणारं, आकाशवाणी म्हणजे माध्यमांची ताकद आहे! तळागाळाचा विचार करणारं, तळागाळाचे प्रश्न मांडणारं असं हे प्रभावी माध्यम आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply