अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मध्ये डॉ. यशवंत पाटील यांनी लिहिलेला हा लेख
बहुतेक व्यक्तीचे जीवन वाहत्या नदीच्या प्रवाहासारखं असतं. माझंही बालपण याला अपवाद नव्हतं. नाशिक जिल्ह्यातील दिण्डोरी गावात एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म दीपपूजा अमावास्येला झाला. आषाढी आमावस्या, खेड्यात तिला गटारी अमावस्या म्हणतात. माझा जन्म झाला त्यावेळी दिण्डोरी गाव पाच हजार लोकवस्तीचे खेडे होते. (इ. स. १९४७). गावात अठरा पगड जातीचे आणि बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने राहत असत. माझा जन्म हा अमावस्येला, त्यातही गटारी अमावस्येला झालेला असल्यामुळे गावातील एका ज्योतिषाने माझे भविष्य अतिशय विपरित सांगितले. ‘हा मुलगा घराण्याला बट्टा लावेल. घराण्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविल, शाळेत जाणार नाही. शिकणार नाही अडाणी राहील. थोडक्यात तो सर्वांच्याच मुळावर उठेल…’ असे बरेच काही सांगितले होते. शेजाऱ्याापाजाऱ्यांचा, नातेवाईकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ‘एक अशुभ कार्ट!’ असाच होता. पण त्यास अपवाद होता आमच्या घराशेजारी जवळच राहणाऱ्या कै. आप्पासाहेब रामदासींचा. ते त्यावेळचे मॅट्रिक उत्तीर्ण झालेले, बडोदा संस्थानमध्ये दिवाणजींचे काम केलेले सद्गृहस्थ.
एके दिवशी माझ्या आई-वडिलांना त्यांनी बोलावून घेतले. राममंदिराचा रामदासी मठ अजूनही आमच्या गावात आहे. तेथे त्यांनी मला मांडीवर घेऊन माझ्या आई-वडिलांना सांगितले, “तुम्हाला ज्योतिषाने या मुलाबाबत (माझ्याबाबत) सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवू नका. हा मुलगा दीपपूजा अमावस्येला झालेला आहे. त्याचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे. खूप शिकेल. ज्ञानवंत, प्रज्ञावंत, यशवंत होईल. तुमच्या पाटील घराण्याचे नाव वाढवेल…” असे बरेचकाही सकारात्मक माझ्या आई-वडिलांना सांगितले. या प्रसंगापासून माझ्या वडिलांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला पण बहुतेकांच्या मनावर ज्योतिषाचे गारूड होते.
यथावकाश मला गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत घातले. पहिली ते चौथीच्या वर्गाला तेव्हा एकच शिक्षक असायचे. सुदैवाने आप्पासाहेब रामदासींचे चिरंजीव कै. नारायण रामदासी हेच आमचे वर्गशिक्षक होते. अतिशय प्रेमळ, गोष्टीवेल्हाळ, मायाळू, जणू दुसरे सानेगुरुजीच. खूप तन्मयतेने, पोटतिडकीने ते आम्हाला शिकवायचे. गोष्टी सांगायचे, माझ्याच गल्लीत माझ्या घराशेजारी रामदासी गुरुजींचे घर होते. त्यांचेही एकत्रित कुटुंब होते. मात्र इतरत्र जाण्यापेक्षा त्यांच्या घरी जाणे-येणे, खेळणे, अभ्यास करणे इत्यादी त्यांच्याच घरी असे. गुरुजींचे वडील आप्पासाहेबांचा माझ्यावर खास लोभ होता असे मला जाणवे. त्यांनी त्यांच्या नातवंडात आणि माझ्यात कधीच भेदभाव केला नाही. ते आमच्याकडून पाठांतर करून घेत. शुभम् करोती, रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र आदी म्हणून घेत. उच्चार सुस्पष्ट करण्यास सांगत. भरपूर खेळायला सांगत. म्हणून मी लहानपणी आमच्या घरी पाटील वाड्यात कमी आणि रामदासी गुरुजींच्या श्रीरामाच्या रामदासी वाड्यातच अधिक असे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्ये कानी पडो’ या न्यायाने माझ्या बाळपणी घडत गेलो, वाढत गेलो. त्यामुळे माझे उच्चार सुधारले. वाचन वाढले. संग जया जैसा, लाभ तसा तैसा’ या न्यायाने मला रामदासी कुटुंबाचा माझ्या लहान वयातच खूप फायदा झाला. आज माझ्या आयुष्याची जी इमारत माझ्या लहान वयातच झालेल्या संस्कारांचा खूप फायदा झाला. आज माझ्या आयुष्याची जी इमारत उभी आहे त्याचा मजबूत पाया आप्पासाहेब रामदासी आणि नारायण रामदासी गुरुजी यांनी घातला. दिनकर घोरपडे कुटुंबीयांचाही मोठा वाटा त्यात आहे.
अभ्यासात माझी चांगली प्रगती चालली होती. वर्गात सुरुवातीपासूनच माझा प्रथम क्रमांक असे. एकपाठी म्हणून माझा लौकिक शाळेत होता. शेतकरी कुटुंबात जन्माला येऊनही सुरुवातीस माझ्या बाळपणी शेतीच्या कामाबद्दल मला फारशी आस्था आणि ओढ नव्हती. शाळेत आणि विद्याभ्यासात माझी चांगली गती होती. ती वाढतही होती. याला कारण मला लाभलेले माझे गुरुजन.
पण दुर्दैव असे की माझी आई माझ्या लहानपणीच अचानक एकाएकी मरण पावली. माझे मातृछत्र हरपले. मी सैरभैर झालो. माझ्यावर माझ्या दोन थोरल्या भावांचा अंमळ (जाच) सुरू झाला. आमची शेती खूप मोठी होती, आहे. जमीनजुमला आहे. तू (म्हणजे मी) आता शेतावरच काम कर. तुझ्या हाताखाली नोकरचाकर, गडी माणसे असतील. नाही तरी तू शिकून नोकरीच करणार आहेस ना? मग आताच नोकरांचा मालक होऊन शेती-वाडी कडे लक्ष दे.
असे बरेच काही सारखे ऐकवत असायचे. पण शिक्षण हे सर्व सुधारणेचे प्रवेशद्वार आणि उत्कर्षाचे आणि प्रगतीचे प्रभावी साधन आहे हे बाळकडू माझ्या गुरुजनांनी मला खूप लहानपणीच दिले होते. म्हणून कुठल्याही अडीअडचणींची, अडथळ्यांची पर्वा न करता शिकायचेच हा माझा निश्चय होता. पण या निश्चयाचे तडे जाणारे…. आदरा बसणारे वातावरण आमच्या घरात निर्माण झाले होते. त्याला मी तोंड देत होतो.
माझ्या मोठ्या भावांचेच घरात राज्य होते. आई स्वर्गवासी झालेली. वडीलही माझ्या भावांपुढे हतबल झालेले. मी इयत्ता आठवीत असताना भावाने मला शाळेत जायला बंदी घातली. मी शाळेत येत नाही हे समजल्यावर आमचे मुख्याध्यापक कै. एन. के. पवारसर व वर्गशिक्षक कै. रामचंद्र काकडसर माझ्या घरी आले. दोघा भावांना समजावून सांगितले, “याला (म्हणजे मला) शिकू द्या. तो हुशार आहे. नाव काढील…” बरेच समजूतदारपणाच्या भाषेत सांगितले. त्यांनी मला शिकायला परवानगी दिली पण एक अट घातली. त्याला शिकायचे त्याने त्याच्या जबाबदारीवर व त्याच्या हिमतीवर शिकावे. आम्ही त्याला काहीच मदत करू शकणार नाही. त्याचे त्याने पाहून घ्यावे… हे सर्व ऐकून मला त्या बालवयात खूप वाईट वाटत होते. हतबल वडील काहीच करू शकत नव्हते. हे कळत होते पण मला शिकायचे होते.
पण आप्पासाहेब रामदासी आणि माझ्या आईची मैत्रीण सौ. सरस्वती तथा माई घोरपडे माझ्या मदतीला आले. त्यांचा दिनकर, माझ्यापेक्षा थोडा मोठा पण माझ्याच वर्गात होता. त्याचे वडील आमच्या गावचे पोलीस पाटील, एक वजनदार नावलौकिक असलेले व्यक्तिमत्त्व होते. माझा बालमित्र दिनकर घोरपड्याच्या पुस्तकावरून मी अभ्यास करू लागलो. एन. के. पवार सर, काकडसर किरकोळ आर्थिक मदत करीत होते. पण वर्गात मी लक्ष देऊन अभ्यास करीत होतो. परिणामी वर्गात माझा पहिला नंबर असायचा. माझा मित्र कसाबसा शेवटून पहिल्या दुसऱ्या नंबराने पास व्हायचा. पण मला अभ्यास करायला तो सतत प्रोत्साहन द्यायचा. पुस्तकांची व इतर शैक्षणिक साहित्याची मदत करायचा. बऱ्याच वेळी मी माईकडेच जेवायला असायचो. त्याही मला दिनकरपेक्षा वेगळ्या समजत नव्हत्या किंबहुना त्याच्यापेक्षाही त्या मला अधिक जीव लावायच्या. “हा (मी) खूप मोठा होईल. आईवडिलांचे नाव काढील….” असे बरेच काही म्हणून माझे कौतुक करीत. शाळेतील असे ओढग्रस्तीचे दिवस असूनसुद्धा एन. के. पवार, रामचंद्र काकड, माई घोरपडे, दिनकर घोरपडे, आप्पासाहेब रामदासी, प्रभाकर देशपांडे, अग्निहोत्री इत्यादी अनेकांमुळे खूप आनंददायी वाटत होते. माझ्या स्वत:च्या घरी माझा वावर तसा कमीच असायचा. मातृछत्र हरपले होते. अगतिक वडील काही करू शकत नव्हते. शेती कामासाठी मी बिनकाम्या आहे, निरुपयोगी आहे म्हणून माझे मोठे भाऊ माझा राग राग करीत होते. त्यांच्यापुढे इतरांचे काही चालत नसे. पण आपण शिकले पाहिजे, “नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” ज्ञानासारखे दुसरे पवित्र (आणि श्रेष्ठसुद्धा) काहीच नाही हे माझ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक-शिक्षकांनी माझ्या मनावर चांगलेच बिंबविले होते. मीही त्यास चिकटून, झटून अभ्यास करीत होतो. बघता बघता मी मॅट्रिकची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. त्यावेळी पहिल्या पन्नासात सतरावा क्रमांक आला होता. ‘अहा, ते सुंदर दिन हरपले, मधुभावाचे वेड ज्यांनी जयास लावियले
-डॉ. यशवंत पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१९ मधून)
Leave a Reply