रवि परांजपे यांचा अल्पपरिचय.
रवी परांजपे यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९३५ रोजी बेळगाव येथे झाला.
रवी परांजपे यांच्या घरातच कलेचा वारसा होता. लहानपणी ते अभ्यासापेक्षा रंगांमध्येच रमायचे. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी हातात कुंचला दिला. त्यामुळे रवी परांजपे यांना मोठ्या चित्रकारांची चित्र पाहण्याचा छंदच जडला. यानंतर फोटोवरून ते स्मरण चित्र काढायला लागले, फोटोवरून यासाठी की, व्यक्तींच्या प्रमुख हालचाली दाखवणाऱ्या रेघा या फोटोवरून अचूक टिपता यायच्या. दृश्यातून सौंदर्याचा शोध घेण्यासाठी त्यांनी दृश्य वास्तवाला जादुई रूप देऊन त्याकडे स्वतःच्या दृष्टीतून पाहिले व कागदावर रेखाटले.
त्यांच्या करीयरची सुरुवात टाइम्स ऑफ इंडिया मधील नोकरीने झाली. तेथे ते जाहिरातींसाठी इल्युजन करायचे.
नंतर रवी परांजपे यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. त्यांनी नैरोबी, केनिया मध्येही काम केले. रवी परांजपे यांनी अनेक जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले होते. नवचित्रकलेच्या प्रवाहाच्या विरुद्ध ठामपणे उभे राहून त्यांनी अभिजात शैलीचा पाठपुरावा केला.
रवि परांजपे यांची शैली अनोखी होती. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब, वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसत असे. दृश्य वास्तवाला दिलेला भावनिक प्रतिसाद परांजपे यांनी निर्मिलेल्या कलाकृतींमधून दिसतो. त्यामुळे त्यांचे रंग, ते हाताळण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती.अनेक वर्षांच्या चित्रसाधनेतून त्यांनी ती विकसित केली.
ते पुण्यात १९९० ला स्थायीक झाले. तेथे त्यांनी मोठा स्टुडिओ उभारला. ते एक उत्तम चित्रकार होतेच, शिवाय एक चांगले कला समीक्षक, लेखक होते, आणि ह्या पलीकडे जाऊन ते सामाजिक जाणीव असलेले एक नागरिकही होते. त्यांनी अनेक वर्षे दै.सकाळच्या बाल चित्रकला स्पर्धेला मार्गदर्शन केले.
त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.१९९५ साली त्यांना कम्युनिकेशन आर्ट्स गिल्डतर्फे कॅग हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देण्यात आला. १९९६ साली त्यांना दयावती मोदी फौंडेशन आर्ट कल्चर आणि एज्युकेशनतर्फे दयावती मोदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन, पं. जसराज यांसारख्या मान्यवरांकडे त्यांची चित्रं असून जगभरात त्यांच्या चित्रांचे चाहते आहेत.
रवी परांजपे यांना भावपुर्ण श्रद्धांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply