इ. स. पू. २२० पासून हा प्रदेश चीनच्या आधिपत्याखाली होता. इ. स. १८०० पर्यंत हे मासेमारी व शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांचे एक लहानसे ठिकाण होते; परंतु सागरी मार्गाने पूर्व व पश्चिमेकडे ये-जा करण्यासाठी हे महत्त्वाचे व मोक्याचे ठिकाण असल्यामुळे यास जागतिक व्यापार व लष्कराच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले.
पहिल्या अफू युद्धानंतर (१८३९–४२) हाँगकाँग बेट नानकिंग तहान्वये ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आले. १८६० च्या दुसऱ्या अफू युद्धानंतरच्या पीकिंगच्या (बीजिंग) तहात ठरल्याप्रमाणे कौलून द्वीप-कल्पाचा प्रदेश ब्रिटनच्या स्वाधीन करण्यात आला. तसेच १८९८ च्या परिषदेत नमूद केल्याप्रमाणे त्याच वर्षापासून न्यू टेरिटरी प्रांतासह २३५बेटे ब्रिटनला ९९ वर्षांच्या करारावर चीनकडून मिळाली. अशा प्रकारे ब्रिटनने चीनकडून संपूर्ण हाँगकाँग प्रदेश हस्तगत करून येथे आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात ८ डिसेंबर १९४१ रोजी जपानने हाँगकाँगवर हल्ला केला. या युद्धात ब्रिटनचा पराभव झाल्यामुळे २५ डिसेंबर १९४१ रोजी संपूर्ण हाँगकाँग ब्रिटनने जपानच्या स्वाधीन केले. ३० ऑगस्ट १९४५ मध्ये ब्रिटिश सैन्याने जपानच्या ताब्यात असलेल्या हाँगकाँगवर हल्ला करून संपूर्ण हाँगकाँगचा प्रदेश जपानकडून परत मिळविला व मे १९४६ मध्ये पुन्हा आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित केले. ब्रिटिश अमदानीत हाँगकाँगची भरभराट झाली. औद्योगिकीकरण वाढले; आरोग्याच्या सुविधांमध्ये वाढ झाली. येथील संपूर्ण अर्थव्यवस्था विकसित होण्यास मदत झाली.
हाँगकाँगच्या भौगोलिक स्थानामुळे चीन आणि ब्रिटन यांच्यात अनेकदा तणाव निर्माण झाले. १९८२–८४ दरम्यान हाँगकाँग प्रश्नासंबंधी चीनव ब्रिटनमध्ये वाटाघाटी झाल्या. १९ डिसेंबर १९८४ रोजी बीजिंग येथे दोन्ही सरकारच्या प्रमुखांनी संयुक्त घोषणापत्रावर सह्या केल्या व त्यानुसार संपूर्ण हाँगकाँग प्रदेश १ जुलै १९९७ पासून ब्रिटनने चीनच्या स्वाधीनकेला. चीनच्या राष्ट्रीय पीपल्स काँग्रेसने ४ एप्रिल १९९० रोजी हाँगकाँग-संदर्भात एक पायाभूत कायदा करून १ जुलै १९९७ रोजी हाँगकाँगची विशेष प्रशासकीय विभाग म्हणून स्थापना केली. त्यानंतर चीनने हाँगकाँगची पुनर्बांधणी करून येथील पायाभूत सुविधांचा विकास केला. १९९७ मध्ये हाँगकाँगचा प्रथम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुंग-ची-हॉची नियुक्ती करण्यात आली.
आता हाँगकाँग हा चीनमधील एक स्वायत्त प्रदेश आहे. त्याचे क्षेत्रफळ एक हजार १०८ चौ. कि.मी. (४२८ चौ.मैल) आणि लोकसंख्या ७० लाखांच्या आसपास आहे. सिंगापूरप्रमाणेच हाँगकाँग हे देखील एक महत्वाचे जागतिक आर्थिक केंद्र आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply