इतिहासकार, नाटककार, चित्रकार, नेपथ्यकार, मराठी लेखक, कला समीक्षक दत्तात्रय गणेश गोडसे यांचा जन्म ३ जुलै १९१४ रोजी झाला.
चित्रकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, कलासमीक्षक, इतिहास आणि लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक अशी द. ग. गोडसे यांची चतुरस्र ओळख होती. द.ग.गोडसे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील वाघोडे येथे झाला. त्यांनी शालेय शिक्षण सावनेरला, आणि कॉलेज शिक्षण नागपूरच्या मॉरिस आणि नंतर मुंबईच्या विल्ससन कॉलेजातून घेतले. त्यांनी लंडन विद्यापीठाच्या ’स्लेड स्कूल ऑफ फाइन आर्ट’मधून ललितकलेचे प्रशिक्षणही घेतले. दत्तात्रय गणेश गोडसे यांनी मराठीत अनेक विषयांवर लिखाण केले. शिवाजी-मस्तानी-रामदास या ऐतिहासिक व्यक्तींवर, मराठी वाङ्मय-नाटकांवर, चित्रकला-शिल्पकला-वास्तुकलांवर आणि अगदी बुद्धकालीन स्थापत्यावर गोडसे लिहीत असत. थॉमस डॅनियल ने १७९० साली पेशव्यांच्या दरबाराचे एक रंगचित्र काढले होते. त्यावरही गोडसेंनी एक लेख लिहिला होता. त्यांचा मराठी चित्रकार दीनानाथ दलाल यांच्यावर लिहिलेला “भारलेल्या जगातून आलेला अलौकिक माणूस” हा लेख अतिशय गाजला होता. ना.सं. इनामदार यांनी ’राऊ’ ही कादंबरी लिहिताना द.ग. गोडसे यांची खूप मदत झाली, असे त्या कादंबरीच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. द.ग. गोडसे यांनी आपल्या चित्रांनी अनेक मासिके आणि पुस्तके सजवली. शक्तिसौष्ठव , गतिमानी, मातावळ, समन्दे तलाश,‘मस्तानी’,‘लोकघाटी’,‘नांगी असलेले फुलपाखरू’ अशी अनेकानेक विषयांवरची अभ्यासपूर्ण पुस्तके त्यांनी लिहिली. १०७ हून अधिक नाटकांचे ते नेपथकार होते. तीन मराठी आणि दोन हिंदी चित्रपटांचे ते कलादिग्दर्शकही होते. साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटना, ढोंगबाजी, गटबाजी, मक्तेदारी, भाषेचा-आशयाचा बोजडपणा, नावीन्याच्या आणि प्रयोगशीलतेच्या नावाखाली चाललेला भोंगळपणा हे वृत्तपत्रातून प्रसिद्ध होणाऱ्या या ’वाद-संवादा’चे विषय असत. वृत्ती-प्रवृत्तींवर टीका केली जाई आणि ती व्यक्तिगत पातळीवर घसरणार नाही, याची काळजीही घेतली जाई. शमा आणि निषाद म्हणजे अनुक्रमे द.ग.गोडसे आणि मं.वि. राजाध्यक्ष यांनी हे चुरचुरीत आणि पौष्टिक सदर जवळजवळ नऊ वर्षे चालवले. त्या काळात या सदरावर अनेकांचा रोषही ओढवला, पण अशी वृत्तिलक्ष्यी टीका वाचण्याची सवय वाचकांना लागली. ‘टवाळा आवडे विनोद’ या वचनाला छेद देणारे लेखन द.ग. गोडसे यांनी या सदरात सातत्याने केले.
१९४३ ते ५३ या वर्षांतील या सदरांचे निवडक संकलन वाद-संवाद (निषाद आणि शमा) याच नावाने प्रसिद्ध झाले आहे. तात्कालिक लेखन वगळून आजही प्रस्तुत वाटेल, असे लेख यात घेतल्याचे संपादकांनी म्हटले आहे. ‘मुद्रणसाक्षेप’ किंवा ‘पदवी आणि प्रबंध’ असे लेख याची उत्तम उदाहरणे आहेत. भारत सरकारने त्यांना ’भारताचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार’ या पुरस्काराने सन्मानित केले होते.
दत्तात्रय गणेश गोडसे यांचे निधन ५ जानेवारी १९९२ रोजी झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply