मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।।
या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, हे साधकाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे जीवनाला स्वस्थता लाभू शकते. स्वामी स्वरुपानंदांच्या संजीवन गाथेत अभंग क्र. १२३ असा आहे.
चढो पालखीत पडो वा आगीत
देह नाशिवंत मातीमोल ।। १ ।।
काया कदा काळी जाणार जाईल।
सांभाळावे शील जीव भावे ।। २ ।।
देहाची आसक्ति असों नये चित्ती ।
वसो द्यावी प्रीति हरिपायी ।। ३ ।।
स्वामी म्हणे ऐसी करावी प्रार्थना ।
देवा नारायणा धाव पाव ।। ४ ।।
अर्थ:- मानवी देह नाशिवंत आहे. तेव्हा मानवी जीवन कधी सुखात राहते तर कधी दु:खाच्या आगीत होरपळून निघते. हा देह कधी तरी जाणारच असतो, त्यासाठी मनुष्याने शील (म्हणजे सद्गुण) जीवाभावाने सांभाळावे. (सद्गुणाच्या अंगीकाराने जीवन समृद्ध करावे, कसे ही वागू नये.) यासाठी चित्तात देहासक्ती ठेवू नये. हरीचे ठिकाणी प्रेम धरावे.
जीवनात षडविकार, षड्उपाधी, अहंता ममता आहे, याने जीवाची ससेहोलपट होत असते. तेव्हा या सर्वातून रक्षण करून भगवंतापायी भक्तिभाव-प्रेम दृढ व्हावे अशी प्रार्थना करावी.
या अभंगात दोन महत्त्वाच्या गोष्टी (वास्तविक, सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण यातील दोन गोष्टींवर लक्ष वेधू या.) १) “शील सांभाळावे जीव भावे।” २) “वसो द्यावी प्रीती हरिपायी।” या आहेत. तेव्हा शील हे जीवभावाने सांभाळावे. मानवी जीवनात शीलामुळे त्याचे मूल्य वाढते. जीवनात स्वस्थता येते. शील म्हणजे जीवनात सद्गुणांचा अंगिकार करावा. मग सद्गुण कशाने वाढू शकतात याबद्दल एक चिंतन श्रीमद्भागवत ग्रंथात ११ व्या स्कंधात १३ व्या अध्यायात भगवंतानी उपदेश देताना सांगितले आहे.
आगमोऽप: प्रजा देश: काल: कर्म च जन्म च ध्यानं मंत्रोऽथ संस्कारो दशैते गुणहैतव:।।
अर्थ:- आगम, पाणी, प्रजा, देश, काल, क्रिया (कर्म), जन्म, ध्यान, मंत्र, संस्कार या दहा गुणांनी सत्वगुणाची वृद्धी होते.
या प्रत्येक गुणात अत्यंत व्यापक सूक्ष्म असा भाव समाविष्ट आहे. या प्रत्येक गुणांचा साधक जीवनात फार मोठा प्रभाव आहे. तो कसा हे पाहूया.
आगम:- म्हणजे वेद-शास्त्र होय. याचा अर्थ वेद, शास्त्र उपनिषद, पुराणे, संत वाडमय, संतांचे अभंग, कीर्तन करावे वा ऐकावे. त्यांचे चिंतन करावे. त्यातील उपदेशाचा अंगिकार करावा. श्रवण ही साधनेतील पहिली पायरी आहे. दासबोध तसेच समार्थांच्या सर्व वाङमयात श्रवणाचे महत्त्व सांगितले आहे. तसेच भगवंत म्हणतात, “श्रवणाच्या माध्यमाने मी मनुष्याच्या हृदयात प्रवेश करतो. भक्तानी हृदयात राहायला जागा दिली तर मी राहतो. नाही तर मी निघून जातो.” म्हणून संत म्हणतात, “काम-क्राधे केले घर रिते।।” घर म्णजे हृदय, मन, बुद्धी, चित्त येथे असलेले विकार उपाधी, अहंता व ममता हे गेले की भगवंत हृदयात प्रगट होतो. याची जाणीव आनंदरूपाने साधकांनरा होते. याच्या मागे इतका व्यापक अर्थ आहे.
पाणी (आप):- म्हणजे तीर्थ होय. साधक काय खातो, काय पितो याचा यात समावेश आहे. तसेच तीर्थात देवत्वाची शक्ती त्वरित प्रकट होते. ‘तीर्थानं कुवर्ती तीर्थाणि”। हे नारद भक्ती सूत्र आहे. तीर्थात पवित्र शक्तीचा वास असतो. याने मन, बुद्धी, चित्त, हृदय पवित्र होते. पावन जागी परमात्म्याची जाणीव सहजतेने वा चटकन होते. असे तीर्थाचे महत्व असते.
प्रजा:- म्हणजे सत्संग होय. साधकांनी सदैव सत्संगात राहवे. सत्चा संग तो सत्संग होय. दुसरा अर्थ असा की, आपली इंद्रिये बहिर्मुखी आहेत तेव्हा त्यांचा बहिर्मुख संग म्हणजे विषयाचा संग होय. तेव्हा असा “संगस्य त्याग: इति संत्संग: ।” असे म्हणता येते. सत्संगाचा फार मोठा परिणाम हा जीवनावर होत असतो. ज्या संगात जीव राहतो तशीच कर्माची प्रेरणा मनुष्याला होते. म्हणून मनुष्याने सदैव चांगल्या संगतीत रहावे, तसेच, चांगले विचार, चांगले चिंतन मनात ठेवावे हा ही एक सत्संग असतो. यासाठी नारदांचे चरित्र मार्गदर्शक आहे.
देश:- म्हणजे “स्थान” होय. साधम कोठे राहतो. याला ही महत्त्व आहे. भक्तिशास्त्रात याला फार महत्त्व आहे. देवाची लीलाभूमी, संतांची कर्मभूमी, संतांची तप:स्थळी, समाधी स्थाने ही सर्व पवित्र स्थाने आहेत. अशा जागेत भगवंताची, संतांची, तपस्वींची ऊर्जा शक्ती अविरत कार्यरत असते. नित्य तेथे जरी वास करता आला नाही तरी मधून मधून तेथे राहवे. काही साधना, उपासना करावी. याचा पारतार्थिक वाटचालीस उपयोग होतो. उदा. पावस, वृंदावन, गोकुळ, सज्जनगड इ.
काल:- म्हणजे वेळ. आम्ही वेळेचा उपयोग काय करतो. मनुष्याकडे तीन गोष्टी निरनिराळ्या वेळी येतात व त्याचा याथार्थ उपयोग झाला नाही तर अनर्थ होतो. (एक) सत्ता (दोन) पैसा (धन), (तिन) वेळ (समय) लहानपणी वेळ असतो, सत्ता-धन नसते. तरूणपणी सत्ता-धन असते पण वेळ नसतो. वृद्धपणी वेळ असतो, सत्ता नसते, धनही असते किंवा नसते. त्यामुळे लहानपणी पूर्व संस्कार व विद्यामान संस्कार चांगले असतील तर लहानपणीच भगवद् भजनाची गोडी निर्माण होते. तरूणपणीच खऱ्या अर्थाने परमार्थ करावा, अभ्यास करावा. पण नेमके साधक म्हणजो वेळ नाही. जर तारूण्यात अभ्यास केला असेल तरच वृद्धपणी फलोन्मुख होण्याची शक्यता असते. तेव्हा वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे. यातच जीवनाचे सार्थक ठरू शकते, तर स्मरणशक्ती प्रखर असते. तरुणपणी आकलन शक्ती नसते, तर स्मरणशक्ती प्रखर असते. तरूणपणी आकलन शक्ती असते पण स्मरण शक्ती नसते. तरूणपणी अभ्यास नसेल तर वृद्धपणी आकलनशक्ती व स्मरणशक्ती दोन्ही राहत नाही. तेव्हा साधकांनी वेळेचा उपयोग सत्कारणी लावावा हे महत्त्वाचे आहे. सद्गुण वर्धनासाठी याचा उपयोग होतो.
कर्म:- म्हणजे क्रिया होय. मनुष्य कर्माशिवाय राहू शकत नाही. मनुष्याकडून सतत मानसिक, वाचिक व शारीरिक क्रिया घडत असतात. “गहन कर्मणो गतिः ।” असे ऋषी सांगतात. कर्म जीवाला बंधनात टाकते तर कर्म जीवाला बंधनातून सोडविते. तेव्हा कर्म प्रकार असे आहेत- (१) क्रियामण कर्म (२) प्रारब्ध कर्म (त्याचे उपप्रकार स्वेच्छा प्रारब्ध, निरिच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध) (३) संचित कर्म. हा एक भाग. दुसरे कर्मप्रकार (१) विहित कर्म (नित्य वा नैमित्तिक कर्म) (२) अकर्म (३) विकर्म (४) निषिद्ध कर्म (५) निष्काम कर्म तेव्हा मनुष्याने नित्य किंवा निष्काम कर्मे करावीत. जेणे करून भगवंताशी अनुसंधान राहिल. थोडक्यत वेळेचा सदुपयोग करावा. कर्माचा हेतू व भाव सदैव शुद्ध असावा.
जन्म:- म्हणजे अनुग्रह होय. “सस्कारात द्विज उच्चते।” संस्काराने जीवाला द्विजत्व येते. माता-पिता मलाला शरीरिक, जन्म देतात, पण सद्गुरु हे जीवाला मानसिकरित्या “मानसिक” देह देतात. त्याने तो पैलतीर पार करू शकतो. म्हणून याला “जन्म” म्हटल आहे. सद्गुरूमहिमा सर्वांनी गायला आहे. ते जीवाला, शिष्याला “आपणा सारिखे करीती तात्काळ।” प्रमाणे जीवाला सबळ करतात. याचा अर्थ साधकाने गुरू करावा. सद्गुण वर्धनात गुरुचा प्रवेश उपकारक ठरतो. समर्थ
रामदासांच्या मताप्रमाणे चैतन्यमयी गुरू असावा.
ध्यान:- म्हणजे ही एक साधना आहे. धर्मशास्त्र दृष्ट्या भगवत्प्राप्तीचे साधन म्हणजे श्रमण, मनन, निदिध्यास (ध्यान), समाधी हे आहेत. साधकांनी या मार्गानी जावे. ध्यानाच्या अभ्यासाने मन, बुद्धी, चित्त शांत राहते. उत्साह, स्फूर्ती व प्रेरणा निर्माण होतात. यातून जीवनाचे सार्थक होते. तेव्हा हा अभ्यास सद्गुण वर्धनासाठी उपयुक्त आहे.
मंत्र:- ज्या उपास्य देवतेची जीव उपासना करतो. त्याच्या मंत्राची उपासना घडली तर उपासकाला ती देवता उपासनेत साहाय्य करते. मंत्रानी जीवाला बळ येते. भगवद् अनुसंधनास म्हणून करून, सद्गुणवर्धन करावेत. हा उद्देश
भगवंताच्या सागण्याचा आहे. मंत्रात भगवद्शक्ती कार्यरत असते.
संस्कार: – मानवी जीवनात संस्काराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. संस्कारांचा प्रभाव व्यक्तापेक्षा अव्यक्तावर फार असतो. पूर्व संस्काराचा प्रभावही साधनेवर पडत असतो. म्हणून कान्होपात्रासारखी “स्त्री” ही पिंगलेच्या उदरी जन्माला येऊनही संत पदवीला पोहचली. जीवाने कुठे जन्म घ्यावा हे त्याच्या हाती नसते. मात्र त्याने केलेली उपासना महत्त्वाची असते. ती कधी वाया जात नाही. कान्होपात्रेवर संस्कार विपरीत वातावरणाचे झाले. पण पूर्व संस्काराच्या अव्यक्त प्रभावाने वारकऱ्यांत सामील होऊन ती पांडुरंग चरणी विलीन झाली. हे संस्काराने घडले. प्रल्हादाचा जन्म आसुराच्या उदरी झाला. पण मातेच्या गर्भात असतानाच नारदांच्या संस्काराने तो भगवद्भक्त बनला. तेव्हा चांगले संस्कार करीत असावे. ते कधी वाया जात नाहीत. तेव्हा संस्करानी सद्गुणांचा अंगिकार होत असतो. अशा प्रकारे भगवंत उद्धवाला दहा गोष्टी सद्गुण वर्धनासाठी सांगतात. तसेच “शील जीव भावे सांभाळावे” असे स्वामी स्वरूपानंद सांगतात.
यातील आणखी एक चरण म्हणजे “वसो द्यावी प्रीति हरिपायी। ” साधकांनी कोणत्याही स्थितीत हरिचरणी प्रेम करावे. सर्वदा। हा भाव असावा. हरिचरण प्रेम म्हणजे निर्गुणावरचे प्रेम आहे. सगुण प्रेमाचा मनुष्य (दृश्यावरचा) अनुभव घेत
असतो. त्यातील गोडी नाशवंत आहे. तेव्हा अविनाशी प्रेम हे केवळ अव्यक्तावरच होऊ शकते. तेव्हा ते प्रेम निर्माण होऊन टिकण्यासाठी या सर्वांची आवश्यकता आहे, असे वाटते. स्वामींनी सर्वांना भगवद्प्रेमात ठेवावे अशी प्रार्थना करूया.
बालपणी खेळ यौवनी विलास ।
वार्धक्यी जीवास व्याधि-चिंता ।। १ ।।
बालपणी शाळा तारूण्यी संसार ।
वार्धक्यी जो जार तयाचा चि ।। २ ।।
जन्मुनियां वाया कष्टविली काया ।
स्व-हित साधाया वेळ नाही ।। ३ ।।
स्वामी म्हणे विसरला देवा ।
सयासी विसावा कैंचा अंती ।। ४ ।।
– स्वामी स्वरूपानंद
— डॉ. अजित कुलकर्णी.
साभार: गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ९ वा
पुणे.
Leave a Reply