रेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये झाला. इ.स. १७८४ मध्ये पोस्टाची पत्रे घेऊन जाणाऱ्या घोडागाड्यांचे वेग वाढविण्यासाठी रस्त्यांमधे लाकडी फळ्या अंथरून त्यावरून या घोडागाड्यांना पळविले जाई. या फळ्यांवर गाड्या ताशी १३ ते १६ किलोमीटर वेगाने धावू शकत. नंतर लाकडाची झीज कमी व्हावी म्हणून इ.स. १७८९ मध्ये कास्ट आयर्न रुळ दगडी चौथऱ्यावर बसवून त्यावर या गाड्या प्रथम घोड्यांनी व नंतर वाफेच्या इंजिनाने नेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. पहिले इंजिन निकोलस कुनाट या एका फ्रेंच मेकॅनिकने १७६९ मध्ये बनविले. त्यामधे सुधारणा झाल्या. पण ही सर्व इंजिने रस्त्यावरच धावत. इ.स. १८०४ मध्ये ट्रेव्हिथीकनेच रुळावर धावणारे वाफेचे इंजिन बनविले.
जॉर्ज स्टिव्हन्सन यांना रेल्वेचे जनक मानण्यात येते. कारण त्यांनी कशाचाही शोध न लावता सर्व वस्तूंचा उत्तम मेळ घालून इ.स. १८२५ मध्ये जगातील पहिली रेल्वे सुरू केली. ही रेल्वे इंग्लंडमधील स्टॉकटन आणि डार्लिंग्टन या दोन स्टेशनांदरम्यान धावली. या ६.५ टनी इंजिनाने माणसांनी भरलेले ३८ डबे ताशी (१२ मैल) १९.३२ किमी वेगाने चालवले. आज चुंबकीय शक्तीवर चालणारी रेल्वे ताशी ५०० किमीपेक्षा अधिक वेगाने जाते.
यानंतर १८३३ मध्ये अमेरिकेत मोहॉक ते हडसनचे दरम्यान पहिली रेल्वे धावली. तिचा युरोपमधला प्रवेश १८३५ मध्ये न्यूरेनबर्ग ते फूर्थ असा जर्मनीमध्ये झाला व पुढील दहा वर्षात फ्रांस, इटाली व हॉलंडमध्ये त्याचा विस्तार झाला.
इ.स. १८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर लॉर्ड डलहौसी यांनी भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी मुंबई-आग्रा, कलकत्ता-लाहोर व मुंबई-मद्रास या ब्रॉड गेज रेल्वे मार्गाची सूचना केली. ती मान्य झाल्यावर लगेच काम सुरू झाले आणि १६ एप्रिल, १८५३ ला मुंबई-ठाणे ही भारतातील पहिली रेल्वे सुरू झाली. त्यानंतर भारतातल्या बऱ्याच रेल्वे कंपन्या इंग्लिश लोकांच्या होत्या. आता मात्र भारतातील रेल्वेचा कारभार भारतीयांच्याच हातात आहे.
Leave a Reply