इंग्रजी व अन्य परकीय भाषा :
आतां इंग्रजी शब्दांचा आढावा घेऊं ; तसेंच हिब्रू व अन्य भाषांवरही जरा नजर टाकूं. बर्याच इंग्रजी शब्दांचा उगम ग्रीक अथवा लॅटिनमधे सापडतो, हें सर्वांना माहीतच आहे, आणि तें पुढील शब्दांमधेही स्पष्ट होईल.
• ‘Agor’ / ‘Agora’ : हा पुरातन ग्रीक भाषेमधील शब्द आहे. त्याचा अर्थ असा आहे –
open space, public square, a market-place, forum, popular (political) assembly, a place where such assembly meets. वेबस्टर डिक्शनरीप्रमाणें, या शब्दाचा उच्चार ऍग्अर (ऍग्-अ-र) होईल.
त्याचें ‘आगर’शी उच्चारसाम्य उघड आहे. ग्रीकमधील या शब्दाच्या बहुवचनाचा उच्चार होतो : ऍग्अरी
(ऍग्-अ-री). [ म्हणजे, इथेंही आपल्या ‘आगरी’ शब्दासमान आलाच ! ].
इथें लगेचच आपल्याला पारशी लोकांची ‘अग्यारी’ आठवते. [ अग्यारी हा शब्द पुरातनन (अवेस्तन) पर्शियन भाषेशी संबंधित आहे ] . तिथेंसुद्धा लोकांचा समूह एकत्र येतो ; तें धार्मिक स्थान आहे. परंतु, पुरातन काळीं धर्म आणि राजकारण हातात हात घालूनच जात असत. म्हणजे, इंग्रजी (किंवा ग्रीक) शब्दाचा अर्थ पुरातन पर्शियन (अवेस्तन) भाषेतील अर्थाशी साधर्म्य ठेवतो. परंतु, त्यातून कोकणातील ‘आगर’ला असलेला अर्थ थेट ध्वनित होत नाही. मात्र, ग्रीक भाषेतील ‘agora’ मधे व पारशी अग्यारीतही गर्दी असते (माणसांची), व कोकणी आगरातही गर्दी असते (झाडांची), हा एक योगायोग समजावा काय ?
Agor/agora या नांवाची स्थळें इटली, ग्रीस, टर्की इथें आढळतात. हा शब्द मूळ ग्रीक आहे, हें आपण पाहिलें. अर्थातच, तो ग्रीकमधून रोमन म्हणजे लॅटिन भाषेत गेला. त्यामुळे तो ग्रीक व लॅटिन या भाषांमध्ये आढळतो, ग्रीस व इटली या देशांमध्ये आढळतो. मग टर्कीचें काय ? त्याचें स्पष्टीकरण असें आहे की, ज्याला आजच्या काळात टर्की म्हणतात, त्या भूभागात अनेक शतकांपूर्वी (इ.स. पूर्वी) ग्रीक वसाहत होती. (तिला ते बायझेंटियम म्हणत असत, व त्या भागाला अनोतोलिया असें नांव आहे). त्या काळी तेथें ग्रीक भाषेंचें प्राबल्य होतें. नंतरच्या काळात त्या भूभागात रोमन लोकांचें राज्य आलें. (त्यांनी त्या शहराला कॉनस्टँटिनोपल नांव दिलें). त्यानंतर अनेक शतकें तिकडे लॅटिन भाषेचें प्राबल्य होतें. पंधराव्या शतकात तुर्कांनी तिकडील रोमनांना हरवून आपलें राज्य त्या भूभागात स्थापलें. त्यांनी राजधानीच्या शहराचें नांव बदलून, कॉनस्टँटिनोपलचें इस्तंबूल केलें खरें, पण त्या भूभागातील अनेक स्थानिक नांवें तसीच राहिली. त्यामुळे आजही टर्कीमध्ये Agora हें स्थलनाम दिसून येतें.
• इंग्रजीत आणखीही एक ‘agora’ आहे, ज्याचा उगम हिब्रू ‘आगोरॉट्’ या शब्दात आहे. [ कांहीं वेळा शेवटचें अक्षर अनुच्चारित असतें, अथवा त्याचा उच्चार ‘निसटता’ होतो. (आजही इंग्रजीत आपण असे उच्चार पहातो). हा शेवटचा ‘ट्’ जर ,कांही जमातींच्या उच्चारांमधे, ‘silent’ (अनुच्चारित) किंवा ‘निसटता’ असेल, तर त्या हिब्रू शब्दाचा उच्चार साधारणपणें मराठी ‘आगर’ सारखाच होईल. वेबस्टर डिक्शनरी या ‘agora’चा उच्चार देते ‘आगोरॅ/आगोरा’ ]. इस्त्राइलमधील एका जुन्या नाण्याचे तें नांव आहे. नाणें हें देवाणघेवाणीचें साधन आहे. म्हणून, पुरातन काळी जेंव्हा बार्टर-सिस्टम चालत असे, त्या काळात या (किंवा त्यासमान) शब्दाचा अर्थ एखाद्या वस्तूशी / स्थानाशी निगडित होता काय हें बघावें लागेल. त्यासाठी ग्रीक, लॅटिन, कॉप्टिक, आरॅमाइक, वगैरे भाषांमधे शोधावें लागेल. तसेंच, महाराष्ट्रातील
‘बेने-इस्त्राइल’ या ज्यू कम्युनिटीच्या ‘ज्युडिओ-मराठी’ बोलीमधेसुद्धा पहावे लागेल.
• ‘Agri-‘ : A prefix relating to farming. हा शब्द लॅटिन ager (म्हणजे, शेत) या शब्दापासून उद्भवला आहे. त्याच्या उच्चाराचें ‘आगर’ / ‘आगरी’ या शब्दांशी साधर्म्य पहावे. (मराठी ‘आगर’चा एक अर्थ ‘शेत’ हाही आहेच).
• ‘Agro-‘ : A prefix relating to agriculture. हा शब्द ग्रीकपासून उद्भवला आहे, ज्याचा अर्थ आहे ‘Soil’ म्हणजे माती ( खास करून, शेतातील माती).
• ‘Agger’ : (उच्चार aj’ar, म्हणजे ‘अजर’. या उच्चाराचें वैदिक संस्कृतच्या ‘अज्र’ या उच्चाराशी साम्य पहावें). या शब्दाचा उगम लॅटिन आहे, अशी माहिती वेबस्टर डिक्शनरी देते : या शब्दाचा अर्थ असा –
1) A high tide in which water rises to a certain level, recedes, then rises again.
2) A low tide in which water recedes to a certain level, rises slightly, then recedes again.
Both these are also called ‘Double Tide’.
3. या शब्दाचा आणखीही एक अर्थ आहे : Rampart in an ancient Roman Building , Or an Earthern mound. (पण, या अर्थाचा आपल्याला आपल्या सध्याच्या अभ्यासात उपयोग नाहीं.)
हा ‘agger’ शब्द महत्वाचा आहे, असें मला वाटतें. कारण, हें जें लाटांचें वर्तन वर वर्णिलेलें आहे, तें खाडीच्या काठीं बघायला मिळतें. कोकणातील आगर सुद्धा साधारणपणें खाडीजवळच असतें, तेव्हां ही वरखाली जाणारी लाट आगरात शिरणारच किंवा किमान आगराच्या कडेपर्यंत तरी जाणारच.
अशा प्रकारानें आपल्याला कोकणी आगराचा व इंग्रजी (लॅटिन) agger याचा संबंध जोडता येतो.
Agger हा शब्द जर्मनीतील एका नदीलाही आहे. तिथेंही, या शब्दाचा पाण्याशी संबंध आहे, हें ध्यानात येईल. हा शब्द जर्मनीत कसा गेला असावा ? त्याचें स्पष्टीकरण असें आहे की, युरोपच्या तिकडील भागात पूर्वी रोमनांचें राज्य होतें. त्यामुळे, हा शब्द लॅटिन शब्द तिकडे वापरला गेला असणार, व त्याचा वापर तसाच unchanged स्वरूपात तिकडे चालू राहिला.
• या समुद्रकाठाच्या किंवा खाडीकाठाच्या संदर्भानें आपण आणखी एक शब्द पाहूं. तो आहे, मलय भाषेमधील (मलेशिया मधील) ‘ अगर’ अथवा ‘अगर-अगर’, तें एका समुद्री वनस्पतीचें (sea-weed चें) नाव आहे. मध्ययुगीन चीनमधे ‘अगर-अगर’ या वनस्पतीचा वापर केला जात असे , आजही केला जातो. या ‘अगर’ / ‘अगर-अगर’ चा वापर मध्ययुगात एक जेली म्हणून रतिक्रीडेच्या वेळी, किंवा एक डिसइनफेक्टंट म्हणून होत असे. आज, याचा वापर जिलेटिनच्या ऐवजी खाद्यपदार्थांत होतो; व वेबस्टर डिक्शनरीअनुसार याला ‘चिनी-जिलेटिन’ किंवा ‘जपानी-जिलेटिन’ म्हणतात. त्याअर्थी, एकाहून अधिक सुदूर-पूर्व-आशियामधील / आग्नेय आशियामधील (Far-Eastern Asian / South-East Asian) भाषांमध्ये ‘अगर-अगर’ हा शब्द प्रचलित होता व आहे. अशा वनस्पत (sea-weeds) तिवरांमधेही (mangroves मधे) असूं शकतात ; व तिवरें खाडीकाठी असतात, हें आपल्याला ठाऊक आहे. हा शब्द Far-Eastern Asia मध्ये कुठून आला, याचा शोध घ्यायला हवा. चीनचा गेली हजार वर्षेंतरी मलायाशी समुद्री व्यापार असल्यामुळे, चिन्यांनी तो शब्द मलायाकडून , किंवा मलेशियानें चीनकडून, घेतलेला असण्याची शक्यता नाकारतां येत नाहीं. भारताचा या ‘अगर-अगर’शी कांहीं संबंध ? त्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत.
Leave a Reply