पुन्हां एकदा कोकणातील ‘आगर’ :
आतां, माझें प्रतिपादन असें आहे की, कोकणातील ‘आगर’ म्हणजे ‘नारळी-पोफळीची बाग’ या अर्थाचा शब्द, संस्कृतोद्भव ‘आगर’ म्हणजे स्थान, श्रेष्ठत्व वगैरे अर्थांच्या ‘आगर’ शब्दापेक्षा वेगळा आहे (उच्चार एकच असला तरी). इथें मराठी व्युत्पत्ति कोशातील टिप्पणीची पुन्हा आठवण करून देतो, की, ‘मिठागर वगैरेतील आगर शब्द संस्कृतोत्पन्न नसावा अशी शंका येते.’
तर मग, प्रश्न असा उठतो की, हा ‘आगर’ म्हणजे ‘नारळी-पोफळीची बाग’ या अर्थाचा शब्द कोकणात आला कुठून ? त्याच्यावर आपण आतां थोडा विचार करूं या. माझें मत असें आहे की तो समुद्रापलिकडून आला असावा. इथें आपण दोन शक्यतांचा विचार करूं या.
पहिली शक्यता :
• पहिला भाग आहे, पूर्वेकडूनचा प्रवास तपासून पहाणें. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासूनच मलाया, थायलंड, कंबोडिया इथें भारतीय वंशाचे राजे होते. (इंडिनेशियामधील ‘बाली’ बेट तर आजही हिंदू आहे). तेथील तत्कालीन भाषांमधेंही संस्कृत, पाली इ. भारतीय भाषांमधून आलेले शब्द दिसतात. त्या देशांचा भारताशी व्यापारी संबंध होता. त्यामुळे भारत व मलाया यांच्यात एकीकडून दुसरीकडे या शब्दाचा प्रसार झालेला असूं शकतो. हिंदीत ‘अगर’ हें (सुगंधी) वनस्पतीचें/ झाडाचें नांव आहे. पालीमधेंसुद्धा त्यासारखाच शब्द असणार, आणि पालीमधून तो मलायाला जाणें शक्य आहे. मध्ययुगीन दक्षिण भारतामधील नृप ‘सप्तसमुद्राधीश’ अशी पदवी लावीत. म्हणजेच, दक्षिण भारताकडूनही पूर्वेच्या देशांशी संबंध होते. असें असल्यामुळे, भारतीय संस्कृति व भाषांकडून तिकडे शब्द गेले असण्याची शक्यता आहे, तसेंच तिकडूनही इकडे शब्द आले असण्याची शक्यता आहे. ( ‘अगर’ आणि ‘आगर’ या शब्दांचा झाडें / वनस्पतींशी संबंध आहे. त्यातूनच, मलायात एका वनस्पतीला ‘अगर-अगर’ असें नांव पडलें असेल काय, असा प्रश्न आपण आधी उपस्थित केलेलाच आहे). कंबोडियातील जगप्रसिद्ध ‘अँग्कॉर वॅट’ (Angkor Wat) हें १३व्या शतकातील नृपति सूर्यवर्मन याच्या काळातील हिंदू ‘temple-complex’ म्हणजे मंदिरांचा संच आहे. (याचें मूळ नाव वेगळेंच होतें). ‘विकिपीडिया’ सांगततो की, अँग्कॉर हा शब्द ‘नोकोर’ या शब्दापासून आला आहे, व तो शब्द संस्कृत ‘नगर’ या शब्दापासून आला आहे’ . असा ‘द्राविडी प्राणायाम’ करण्यापेक्षा, मला असा विचार अधिक योग्य वाटतो, की ‘अँग्कॉर’ हा शब्द आकर/आगार/आगर/आँगर अशा एखाद्या शब्दावरून येऊं शकतो. ‘वॅट्’ हा शब्द पाली ‘वत्त’ पासून आलेला आहे, असें विकिपीडिया सांगतो, व त्याचा अर्थ देतो, ‘temple grounds’. हा शब्द पाहिल्यावर तर, ‘ मंदिर, त्याचें आवार व आजूबाजूचें आगर ’ हा ‘अँग्कॉर वॅट’ चा अर्थच योग्य वाटतो.
पण, हें झालें शब्द भारतातून तिकडे जाण्याचें. तिकडून शब्द इकडे येण्याचें काय ? त्याचें उत्तर असें : असा समज आहे की, नारळ हें फळ ( इ.स. च्या पहिल्या शतकात ) मलायामधून, किंवा इंडोनेशिया वगैरे भूभागामधून, भारतात आलें असें म्हणतात. त्याचप्रमाणें, कांहीं शब्दसुद्धा पूर्वेच्या समुद्रापलिकडून इकडे आले असतील. आधी भारतातून तिकडे शब्द गेला व नंतर कांहीं काळानें, (म्हणजे, कदाचित् इसवी सनाच्या पहिल्या सहस्त्रकाच्या उत्तरार्धात), तो शब्द तसाच किंवा त्याचें अपभ्रंश रूप होऊन, ( व, मूळ अर्थानें किंवा सुधारित अर्थानें ), तिकडून इकडे परत आला, असें होऊं शकतें. तसें झालें असल्यास, तो कोकणात एकतर दक्षिण भारताकडून आला असूं शकेल, किंवा पूर्व भारतातील आंध्रभागाकडून. त्याकाळीं सोपारे व चौल पासून नाणेघाट (जुन्नरभागात) व तेर (मराठवाड्यातील उस्मानाबाद) मार्गे व्यापारी सार्थ (तांडे) आंध्रभागात जातच असत. तेव्हां त्या मार्गानेंही शब्दाची आयात शक्य आहे. कोकणच्या संस्कृतीचा, खाद्यपदार्थांचा व लोककलांचा दक्षिणेशी संबंध आहेच. त्यामुळे तिकडूनही शब्दाची आयात होणें शक्य आहे. (मराठी जनसामान्यांच्या भाषेतील कांही शब्दांचे मूळ तमिळ भाषेत आहे, असा सिद्धांत विश्वनाथ खैरे यांनी मांडलेला आहेच. तसेंच मराठी शब्दांवरील कानडीच्या प्रभावाबद्दल शं. बा. जोशी यांनी लिहिलेलें आहे). म्हणून , शब्दांच्या अशा स्थलांतराची शक्यता अभ्यासण्यासाठी, आपल्याला तमिळ, कानडी, तेलगु, मल्याळी या भाषांमधे ‘आगर’ किंवा त्यासमान शब्द शोधून अधिक खोलात जावें लागेल.
जरी अशी भारतात पूर्वेच्या समुद्रापलिकडून आगर शब्द येण्याची शक्यता कमी असली, तरीही असा अभ्यास व्हायला हवा. तसेंच, (समुद्रापलिकडून न येवो न येवो, पण भारतातल्या-भारतातच, अशा प्रकारें सुद्धा), आंध्र, तमिळनाडु, कर्नाटक, केरळकडून हा शब्द मराठीत आला असेल काय याचाही अभ्यास होणें आवश्यक आहे.
तरीपण, पूर्वेच्या समुद्रापलिकडून आगर या शब्दाचें कोकणात आगमन झालेलें आढळलें तर, तें त्याचें पुनरागमनच असेल, असें मला वाटतें. त्याचा उल्लेख आधी केलेलाच आहे. म्हणजेच, त्या शब्दाचें कोकणातील मूळ-आगमन (सर्वप्रथम-आगमन, first-time entry), अन्य कुठून तरी व बर्याच आधीच्या काळात झालेलें असावें (आणि मधल्या काळात तो इथून लुप्त झालाच नसावा) असें माझें मत आहे. ती शक्यता आपण तपासून पाहूं या.
दुसरी शक्यता :
मला ही शक्यता अधिक वाटते की, कोकणात रूढ असलेल्या अर्थाचा ‘आगर’ हा शब्द मूलत: पश्चिमेकडून समुद्रमार्गानें आलेला असावा (आणि तोही इ.स.च्या सुरुवातीच्या काळात किंवा त्याच्याही आधी) . अशा प्रकारें आलेले इतर शब्द आपण पहातोच की. देवीसिंह चौहान यांनी दाखवून देलें आहे की, ‘व’ हा प्रत्यय अरबी दर्यावर्दी व्यापार्यांकडून मराठीत आलेला आहे. त्याचप्रमाणें, जंजीरा (जझीरा), नाखवा (नाख़ुदा) हे शब्द मराठीत फारसीमधून आलेले आहेत. ‘आगर’चें तसेंच कांहींतरी असूं शकतें.
प्रथम गोष्ट म्हणजे, इंग्रजीमधून किंवा पोर्तुगीजमधून हा शब्द मराठीत थेट (डायरेक्टली) येणें शक्य नाहीं. कारण, वास्को-द-गामा (जो पोर्तुगीज होता) हाच मुळी भारतात आला १४९८ मध्ये .
इ.स. १६०० मधे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, आणि त्यानंतरच इंग्रजांचा भारताशी खरा संबंध सुरू झाला. पण, आपण तर आगर / आगरी हा शब्द इ.स. १३६७ च्या शिलालेखात पाहिला आहे.
तीच गोष्ट फारसीची. अल्लाउद्दीन खिलजीनें देवगिरीचें यादवांचें राज्य जिंकलें १३०६/१३०७ मधे, व दिल्लीच्या अफगाणांची सत्ता दक्षिणेत खरी स्थापन झाली १३१५ नंतर. त्यानंतर दक्षिणेत राजकीय उलथापालथ होत राहिली, व बहामनी राज्य स्थापन झालें १३४७ मधें. १३६७ पर्यंत त्यांचा वावर कोकणात कितपत सुरूं झालेला असेल ? कारण, त्या काळी कोकण हें विजयनगरच्या अधीन होतें. नागाव येथील १३६७ च्या शिलालेखात फारसीतला शब्द येण्यास, मधील काळ फारच अपुरा आहे.
परंतु त्याच्या अनेक शतकें आधीपासून अरब, ग्रीक वगैरे लोक भारतात येत होते. अरब दर्यावर्दी होते व त्यासाठी भारताच्या किनार्याला भेट देत असत. शिकंदर भारतात आला इ.स.पू. चवथ्या शतकात. असें म्हणतात की, शिकंदराच्याही आधी बॅक्ट्रिया भागात ग्रीक वसत होते. तें कांहींही असो, पण शिकंदरानंतर, भारतात ग्रीक विविध कारणांनी येत होते, त्यांनी भारताच्या जवळच्या बॅक्ट्रिया भागात राज्येही स्थापली होती, व त्यांचे भारताशी संबंधही होते. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या काळापासून, किंवा त्याही आधीपासून, भारताचे मध्यपूर्व आशियातील देशांशी व रोमशी (अथवा सध्याच्या टर्की या देशातील तत्कालीन रोमन राज्याशी) व्यापारी संबंध होतेच. या सगळ्या संबंधांच्या फलस्वरूप, इ.स.च्या पहिल्या सहस्त्रकाच्या सुरुवातीच्या काळात, किंवा त्याच्याही आधी, हा ‘आगर’च्या जवळपासच्या उच्चाराचा शब्द कोकणात पोचला असावा. आपण ‘agger’ या लॅटिन शब्दाचा अर्थ पाहिला आहे, व त्याचा कोकणातील आगराशी कसा संबंध पोचूं शकतो, हेही पाहिलें आहे. कोकणपट्टीवर येणार्या व्यापारी अरबांतर्फे, किंवा इ.स. च्या सुरुवातीच्या शतकात महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालेल्या बेने-इस्त्राइलींतर्फे, किंवा त्यांच्या एक-दोन शतकानंतर गुहागरला उतरलेल्या चित्पावनांतर्फे, हा शब्द तत्कालीन प्राकृत भाषेमधे सामील झाला असावा, असें मला वाटतें. (मौर्यकाळापासूनच उत्तरेकडून दक्षिणेकडे जनसमूहांचें स्थलांतर होतच होतें. चित्पावन उत्तरेकडून समुद्रमार्गानें गुहागरला आले, अशी आख्यायिकाच आहे. चित्पावन मूळचे ग्रीकवंशीय असावेत असें मला वाटतें. त्याचें थोडें विवेचन पुढें केलेलें आहे ) .
पुढे गुप्तकाळात (साधारणपणें इ.स. ३२० ते ५५०) संस्कृत ही राजभाषा झाली, संस्कृतचें पुनरुत्थान झाले, व प्राकृत शब्दांचें संस्कृतीकरण (संस्कृतायझेशन) झाले (उदा. सोपारें चे शूर्पारक). त्यावेळी, या शब्दाचें ‘आगर/आगार’ असें रूप झालें, व तें अन्य अर्थ असलेल्या समानुच्चारी शब्दाशी मिसळून गेलें. पुढील काळात संस्कृतचें पुनश्च प्राकृतीकरण (अपभ्रंश भाषा) झाले, आणि त्या स्थित्यंतरातून पुढे तो त्या रूपानें मराठीत आला, असा या कोकणातील ‘आगर’ (म्हणजे नारळी-पोफळींची बाग) या शब्दाचा प्रवास दिसतो.
Leave a Reply