नवीन लेखन...

डुईसबुर्ग जर्मनी ‘प्राणिसंग्रहालयाचा’ फेरफटका – भाग १

जून २०१८ मध्ये आम्ही जर्मनीत डुईसबर्ग इथे राहावयास गेलो होतो. भारतात परतण्यापूर्वी चार-पाच दिवस आधी मुलगा व सुनेने  हा अनोखा आणि  नयनरम्य प्राणिसंग्रहालय  बघून घ्या असा आग्रह धरला. म्हणून आम्ही घरून नाश्ता करून व थोडा खाऊ- पाणी बरोबर घेऊन २७ जून २०१८ रोजी सकाळी दहाच्या सुमारास प्राणीसंग्रहालय पाहण्यासाठी निघालो.  त्यांच्या घरापासून केवळ ३ बस स्टॉप  इतके अंतर. प्राणिसंग्रहालय  बघून आल्यावर वाटले एवढे जवळ जाऊन आपण प्राणी  संग्रहालय बघितल  नसत तर मनात कायमची रुखरुख राहिली असती !

प्रत्यक्ष जाऊन आल्यावर आम्ही आनंदाने फुलून गेलो.  फक्त लहान मुलांसाठी ते प्राणिसंग्रहालय नव्हते तर सर्वांसाठी एक मनोरंजन पार्क होते. इथले ‘चायनीज गार्डन’ तर नितांत  सौंदर्याने बहरलेले आहे,  नटलेले आहे. चिनी राजाच्या दरबारातील वाद्य वादनाचा कार्यक्रम चालू असल्याचे सुंदर तैलचित्र आहे.  त्याच्या दारात उभे राहून मी माझा फोटो काढून घेतला.

प्राणी संग्रहालय, ‘रुहार’ वरील मलहेमच्या सीमेवर डुईसबुर्ग मधील शहरी ‘जंगलाच्या’ उत्तरेकडील भागात वसलेले आहे.  याचं वैशिष्ट्य म्हणजे ‘फेडरल हायवे’ जवळ असल्यामुळे  थोडं अंतर चालल्यावर, छ्योट्या रस्त्यावरून, आत गेल्यानंतर, गेटच्या आत,  एवढ  मोठ  प्राणी संग्रहालय असेल याची सुतराम  सुद्धा कल्पना करता येत नाही.

प्राणी संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशदारावर, संग्रहालयातील प्राणिमात्रांच्या वर्गीकरणाचे, त्यांची माहिती देणारे दिशा दर्शविणारे फलक आहेत. आत प्रवेश केल्यानंतर अतिशय सुंदर आणि सोप्या तऱ्हेने  केलेले मार्गदर्शन अतिशय परिणामकारक आहे. त्यातील काही फलकांची झलक या लेखाच्या सुरवातीलाच दर्शविली आहे.

१२ मे १९३४ रोजी स्थापन झालेले हे ‘डुईसबर्ग  प्राणी संग्रहालय’ जर्मनी मधील  सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयापैकी एक आहे.  हे ‘डोल्फिनेरिअम ‘ (DOLPHINERIUM),  साठी तसेच,  १९९४  पासून ‘कोआलास’ प्राण्याचे  प्रजनन केंद्र म्हणून प्रसिद्धीस पावले आहे.  ‘कोआलास’  मूळ ऑस्ट्रेलियामधील अस्वलासारखा दिसणारा छोटा  ‘शाकाहारी- मांसाहारी’ प्राणी आहे.

खऱ्या अर्थी , १९३६  मध्ये,  प्रथम हत्ती व लहान, लहान प्राण्यांच्या  संवर्धनापासून या प्राणिसंग्रहालयाचा  विस्तार होत गेला. १५.५ हेक्टर क्षेत्रफळावर २८० पेक्षा जास्त प्रजाती येथे असून ५००० पेक्षा अधिक प्राण्यांचे संवर्धन  केले जाते.  दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी काही काळ प्राणी संग्रहालय बंद ठेवण्यात आले होते . २००४ साली प्राणिसंग्रहालयाला ७० वर्षे पूर्ण झाली, त्या निमित्ताने ‘पूर्ती’ समारंभ साजरा झाला आणि ७० वर्षांचा इतिहास प्रदर्शनाद्वारे मांडण्यात आला होता.  १२ मे २०२१ मध्ये त्याची तब्बल ८७ वर्षे  पूर्ण झाली.   आता तर जगभरातून दर वर्षी दहा लाख लोक प्राणिसंग्रहालयiला भेट देतात.  प्राण्यांचा तसेच डॉल्फिन ‘शो’चा  आनंद लुटतात.

या प्राणिसंग्रहालयात डॉल्फिन,  कोआलास, तसेच कोडियाक अस्वले, मोठी मांजरे, जिराफ, हत्ती, झेब्रा, ऱ्हिनोस, उंट,  जग्वार, चिंपांझी,  उरांगगोटांन, गोरिला, निरनिराळ्या देशांतील हत्ती, वाघ, सिंह आहेत. त्याच प्रमाणे सांबर, मोर, पोर्कीपून (साळींदर),  लाल गुलाबी रंगाचे फ्लेमिंगो, ऱ्हिनोज , कांगारू, हरिणे   हिप्पोपोटॅमस, मोठ्या प्रमाणात आढळणारी कासवे, असे असंख्य प्रकारचे प्राणी, पक्षी आणि जलचर प्राणी, लक्ष वेधून घेतात, मन मोहून टाकत, आपले वय विसरायला लावतात. लहान मुलांप्रमाणेच आपण शीळ घालतो, टाळ्या वाजवित आनंद व्यक्त करतो. सहजपणे आपले हात,  क्षण टिपण्यासाठी  कॅमेराकडे वळतात.

संपूर्ण युरोप मधील प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि निरीक्षकांना येथे खास सवलती उपलब्ध करून दिल्या आहेत आणि त्यांच्यासाठी हे प्राणी संग्रहालय तर एक पर्वणीच आहे.

एवढा मोठा परिसर असून सुद्धा इतक्या प्राणी- पक्षी याना दिला जाणारा उत्तम आहार,  परिसराचे सभोवतालचे वातावरण,  नियोजित, हेतुपुरस्सर  निर्माण केले गेलेले उपयुक्त तापमान, प्राण्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी वैद्यकीय तपासणी सेवा, प्राण्यांना वावरण्यासाठी पुरेशी जागा आणि  त्यांच्यात, ‘भीती-मुक्त’ मानसिकता निर्माण  करण्यासाठी  केलेला सततचा पाठपुरावा, अशा अनेक विधायक  गोष्टी केल्या जातात.  त्याच बरोबर पर्यटकांसाठी  उभारलेले ‘रिफ्रेशमेंट स्टँड्स’, वनस्पतीने नटलेल्या बागा,  खेळती हवा,  स्वच्छता आणि शिस्त यांचा उत्तम संगम झालेला आढळतो. ‘रिओ- निग्रो’   ट्रॉपिकल Aquarium, टॉरटोईज एनक्लोजर, वगैरे विभाग आहेत.

डॉल्फिनेरियम

इव्हो, पेपिना,  डेल्फी, डेझी, डार्ट, डेबी, डोबी अशा नावांचे डॉल्फिन या प्राणिसंग्रहालयात आहेत.   सुमारे तीन दशलक्ष लिटर समुद्री पाण्यात पाणी असलेल्या तलावात डुंबत आणि विहार करतात.  हे रासायनिक दृष्ट्या स्वच्छ केले जात नाही कारण क्लोरीन हे धोकादायक ठरू शकते. परंतु विशेष उपकरणांसह, पाण्यातून वेगाने हवा खेळवून  ते स्वच्छ केले जाते.  हे  जर्मनीतील सर्वात मोठे डॉल्फिनेरियम. डॉल्फिनचे दररोज तीन ‘शो’ – म्हणजे खेळ होतात.  आम्ही जेव्हा हा शो पाहिला तेव्हा जवळजवळ बाराशे ते पंधराशे, विशेषतः मुलं आणि त्यांचे पालक होते प्राथमिक शाळेच्या अनेक सहली आल्या होत्या. डॉल्फिन जेव्हा पाण्यातून  सरकन  बाहेर येऊन उंचच उंच उडी  मारून, परत पाण्यात सूर मारतात तेंव्हा काठावर बरेच पाणी उडते. त्या पाण्याच्या फवाऱ्यात भिजायला मुलांना खूपच आवडते. ती सर्व मुलं मोठमोठ्याने गलका  करत, किंचाळत, नाचतात तेंव्हा, ते बघून, ज्येष्ठ नागरिकांच्या मनातही उत्साह संचारतो आणि मजा येते. त्यांच्या लहानपणीच्या आठवणी  त्यांच्या डोळ्यासमोर येतात.

डॉल्फिन कुठून अकस्मात पणे वर उसळी मारून येणार याची कल्पना नसते. कधी जवळ, तर कधी दूर,  कधी दोन तर कधी तीन- चार,  कधी पाच- सहा डॉल्फिन  असे नाचत नाचत, डोळ्यांचे पारणे फेडत एका-पाठोपाठ एक असे क्षणात  उंच उडी घेत, नाचत नाचत परत पाण्यात सूर मारतात,  तेव्हा त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक करावेसे वाटते.  त्यांची पाण्यातील सांघिक  कवायत, आकाशातल्या विमानांच्या सांघिक कवायतींची आठवण  करुन  देतात. प्राण्यांकडून इतक उत्कृष्ट  काम करुन घेणे किती जिकिरीचे आहे, हे खरोखरच जाणवते.

— वासंती गोखले

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..