समर्थ रामदास स्वामी म्हणतात,
देहे दुःख ते सुख मानीत जावे….
सुखाच्या आमच्या कल्पना एवढ्या बदलून गेल्या आहेत की खरं आणि शाश्वत सुख कुठे मिळेल असा विचार करायला सुद्धा वेळ नाही कोणाकडे !
प.पू. गोंदवलेकर महाराज आपल्या प्रवचनामधे म्हणतात,
सुखापेक्षा समाधान महत्वाचे.
सुख हे न संपणारे असते. एक सुख भोगून झाले की, दुसरे हवेसे वाटते. जिथे सुख संपते तिथे समाधान सुरू होते. किती अर्थपूर्ण वाक्य आहे ना हे. एका गोष्टी मधे संतुष्टी होतच नाही. एकावर एक फ्रीचा जमाना आहे. तिथे सुख कुठे संपते हे कसं कळणार ?
प्रमेहाच्या सूत्रामधे या सुखासनाचा सर्वात प्रथम उल्लेख करावासा वाटला. आळशी बनत जाणे, वृत्तीने, कर्माने, तनाने आणि मनाने सुद्धा!
आजची तरूण पिढी. दोष देत नाही, पण नाक्यावरून दळण आणायचं झालं तरी बाईकचं बटन स्टार्ट केल्याशिवाय दळण सुद्धा आणले जात नाही. छोटी छोटी काम करायचा आळस हा पुढे मधुमेहासारख्या आजाराला जन्म देतो, हे लिहून ठेवणारे दूरदृष्टीचे ऋषी, भारतात होऊन गेले याचा अभिमान बाळगायलाच हवा. पण पाश्चात्यांच्या आपण एवढे आहारी गेलो आहोत की, आमच्या ऋषींचे कौतुक सोडाच, पण भारतीयांनाच मागासलेपणाचा शिक्का मारून आपण मोकळे होतो.
घरातील छोट्या छोट्या गोष्टी करायला लाज कशाला बाळगायची ? ही कामे करताना आरोग्याचे पण रक्षण होतेच आहे, असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
किती सोप्पं आणि सुखासिन झालं आहे जगणं.
चुल फुंकावी लागत नाही, की जमिन सारवावी लागत नाही,
पाणी ओढायला लागत नाही, किंवा शेंदावे लागत नाही, नळ सोडला किंवा बटन दाबले की पाणी किचनमधे !
ठिबक सिंचनमुळे पाणी झाडांना सुद्धा द्यावे लागत नाही.
ट्रॅक्टरमुळे नांगर हातात धरावा लागत नाही,
मिक्सर आल्यामुळे पाटा वरवंटाही गेला. टेबलखुर्ची आली नि खाली बसून जेवणारी पंगत संपली,
एवढंच काय वारा घेण्यासाठी सुद्धा हात हलवावा लागत नाही.
हळदीकुंकु असेल तर निमंत्रणे देण्यासाठी फिरावे लागत होते, वाॅटसपमुळे तेही नाही.
शाॅपिंगही ऑनलाईन. पैसे मोजायचे पण श्रम नाहीत, करा स्वाईप !
पाश्चात्य देशात काम करायला माणसं मिळत नाहीत म्हणून मशीनची निर्मिती करणे ही त्यांची गरज होती, पण माणसांची मुबलकता असलेल्या प्रिय भारत देशात, पाश्चात्यांनी बनवलेली मशिन्स घरात आणून, माणसे मुबलक मिळतात म्हणून मशिन चालवायला पुनः बाई किंवा बाबाला ठेवायला लागले. ही सुखासिनता नव्हे काय ?
नंतर आजारपण आल्यावर दिवसाला सोळा सोळा प्रकारची औषधे खात बसून आरोग्य विकत घ्यायचे ? याला काय म्हणावे ?
मध्यंतरी एक जपानी व्हिडिओ बघीतला होता, माणसाला बेड वरून हलवून उठवायला घड्याळ. त्याचा बेड आणि त्याला उभा करायला मशिनची प्रगत टेक्नाॅलाॅजी. त्याचे गाल बाजुला करून तोंडात टूथब्रश ढकलून त्याचे दात घासले गेले, नंतर चुळ भरायला पाणी तोंडात सोडले गेले, चुळ भरायला छोटे बेसिन, आपल्या पिकदाणी सारखे तोंडासमोर हजर.
रोबोच्या दुसऱ्या हातानी ओले झालेले तोंड पुसायचे. वगैरे वगैरे टेक्नाॅलाॅजीची कमाल दाखवली जात होती. हा सुखाचा अतिरेक नव्हे काय ?
अतिशयोक्तीचा दोष सोडून देऊ….
पण निदान…
आपली ताट वाटी आपली आपण उचलून ठेवावी, जमलं तर घासावी.
आपले कपडे आपण बुचकळून काढावेत.
आपली गाडी आपण धुवावी. पुसावी तरी.
आपले अंथरूण पांघरूण आपणच घालावे, आपणच आवरावे.
आणि
आपल्या देवघरात एकदा तरी त्याच्यासमोर ओणवे रहावे.
देहे दुःख ते सुख मानीत जावे……
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02.02.2017
Leave a Reply