आस्यासुख या शब्दावरून आठवले, आस्य या शब्दाचा एक अर्थ तोंड, मुख असा सुद्धा होतो.
म्हणजे आपण आस्य सुख या शब्दाने जीभेचे चोचले पुरवणारे सुख जे कफ वाढवणारे असते, ते सुख प्रमेहाचा हेतु असते, असे म्हणायलाही हरकत नाही.
जेव्हा ग्रंथ लिहिले गेले तेव्हा जीभेचे फार चोचले नव्हते, त्यामुळे ग्रंथकारांना हा मुद्दा फार भर देऊन सांगावासा वाटला नसेल. पण आजच्या काळात मात्र हे जिह्वालौल्य खूपच वाढलेले आहे. याचे अतिसुख प्रमेहाचे कारण ठरेल. याचेच नव्हे तर कोणत्याही गोष्टीतील अति सुख किंवा अति दुःख हे सुद्धा रोगाचे कारण आहे.
शिवलीलामृतामधे देखील वर्णिलेलं आहे.
अतिरूप अतिधन अतिविद्या अतिप्रीतिपूर्ण ।
अतिभोगं अतिभूषण विघ्नासी कारण तेची होय।।
जिह्वा सुख म्हणजे मला जे आवडतं तेवढंच मी खाणार, बाकीचे नाही. मग ते हितकर असो, वा नसो. काही वेळा आपल्याला आवडत नसलं तरी एखादा पदार्थ आपल्याला खावा लागतो. त्यात आवड निर्माण करून खाल्ले तरच तो पचतो, नाहीतर नाही. आयुर्वेदातील बहुतांश औषधे न आवडणाऱ्या चवींची असतात. पण अंतिमतः सुख देणारी असतात, त्यामुळे कितीही वाईट तोंड करून प्यायला खायला लागली तरी हितकरच असतात, आणि मुख्य म्हणजे आयुर्वेदीय औषधे कायमची घ्यावी लागत नाहीत. रूग्णाला खायला काय आवडतेय यापेक्षा, वैद्य जाणतो, रूग्णाचे हित कशामधे आहे. म्हणून पथ्य संकल्पना फक्त आयुर्वेदातच आहे !
आता या पथ्य अपथ्यामधे रुग्ण, वैद्याचे डोके खातो, हे वेगळं हं !
असो.
माझे हित कशात आहे, हे वैद्याला विचारून आपला आहार ठरवला तर मरेपर्यंत औषधांची गरज उरत नाही. यासाठी थोडा संयम पाहिजे मनावर. आणि मनावर संयम ठेवण्यासाठी जीभेवर….
म्हटलंच आहे ना,
जेणे जिंकिली रसना….
जिंकल्या साऱ्या वासना.
जीभ हे ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय सुद्धा !! वाक् इंद्रिय आणि रसनेंद्रीय !
एकाचे काम बाहेर टाकणे, जसे शब्द.बोलणे.
एकाचे काम आतमधे घेणे जसे अन्नपाणी. गिळणे.
नियंत्रित खाणे आणि विचारपूर्वक बोलणे हाच संयम. म्हणून या आत बाहेर वळवळणाऱ्या जीभेवर संयम ठेवला तरच सर्व इंद्रियावर संयम येतो. पटलं ना !
मला सर्व मिळतंय मग मी खाल्लं तर काय बिघडलं? मी भोगून संपवेन, प्रत्येक वेळी त्यागच करायला हवा असं कुठाय ? असा विचार करणं चुकीचं आहे.
माझ्यासाठी योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवून खाणं, हे हितकर असते.
हे ज्याला समजले त्याला जीवन उमजले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.02.2017
Leave a Reply