आस्यासुखं स्वप्नसुखम दधिनी
ग्राम्यौदकः आनूपरसः पयांसि ।
नवान्नपानं गुडवैकृतंच
प्रमेहहेतु कफकृच्च सर्वम।।
मधुमेह होऊ नये यासाठी काय करू नये, यासाठी आपण बघत असलेल्या या श्लोकाचे सार काय ?
प्रमेह होऊ नये म्हणून
अंगाला घाम आणून ।
शरीरातील क्लेद काढून
राहून सदैव दक्ष ।
आहारावर असावे लक्ष ।। 1।।
प्रमेह होण्यासाठी मधुर रसाबरोबरच न पचलेल्या आहारातून निर्माण झालेल्या कफाचा विकृत चिकटपणा म्हणजे क्लेद कारणीभूत असतो. जो तयार होऊ नये यासाठी सदैव दक्ष राहीले पाहिजे.
केली जर मेहनत
प्रमेह होईल नत ।
शरीरा येई लघुत्व
शंका मनी आणू नये ।।2।।
मेहनत केली तर मधुमेह नाहीसा होतो.
शरीराच्या हालचाली जेवढ्या जास्ती तेवढा शरीराला हलकेपणा येतो.
फिरायचे फिरोन करावे
बसायाचे बैसोन लिहावे ।
बसणे ठिकाणी झोपणे
ऐसे करणे बरे नव्हे ।। 3 ।।
जे काम फिरून करता येण्याजोगे असते, ते बसून करू नये, जे बसूनच करायचे असेल ते झोपून करू नये.
दीवास्वाप टाळावे
टेबलावरी लवंडावे ।
पांघरूण घेऊन झोपावे
हे क्लेदाचे कारण ।। 4 ।।
दुपारची झोप अजिबात नको. अपवाद ग्रीष्म आणि शरद ऋतु.
झोपायचे असल्यास जेवणाअगोदर एक डुलकी टेबलखुर्चीत बसून काढावी.
कष्टाची कामे करोन
झोपावे निश्चिंत होवोन ।
फुका कारणे लोळोन
क्लेद माजतो अंगासी ।।5।।
झोप तेव्हाच लागते, जेव्हा मेहनत करून थकवा आलेला असतो. जेवणानंतर येणारा अशक्तपणा हा क्लेद वाढवणारा असतो.
आळसे सुख मानो नये
सुखाचा अतिरेक करो नये ।
दुःखाचे दुःख मानो नये
अंतिम सुखी होण्यासी ।।6।।
झोपेचे सुख हे थकवा घालवण्यापुरते असावे. झोप पूर्ण होऊनही लोळत राहाण्याचे सुख घेण्याचा प्रयत्न करू नये.
शरीराला सुखाचा अतिरेक झाल्यास आयुष्य दुःखाचा अतिरेक सहन करावा लागतो. म्हणून देहे दुःख ते सुख मानीत जावे, आत्ता थोडासा त्रास वाटला तरी अंतिम सुख म्हणजे आरोग्य मिळेल.
आपुले औषध स्वये करिती
ते कुऱ्हाडीचा दांडा होती ।
पथ्यापथ्य वैद्यास पुसती
तयांसी नाव विवेक ।। 7।।
मिडीयाच्या माध्यमातून अनेक सल्ले घरगुती औषधे वाचनात येत असतील तरी प्रत्येकाची प्रकृती वेगळी म्हणून प्रत्येकाचे औषध वेगळे या नियमानुसार सर्व सल्ले आपल्यासाठीच असतात असे नाही. त्यातील ज्याचा अधिकार आहे, अशा वैद्यांना जरूर विचारावे.
वेगान न धारयेत
तहान नसता पाणी घेत ।
वृक्कासी व्यर्थ ताण देत
हेची प्रमेहासी आमंत्रण ।।8।।
पाणी गरजेनुसारच प्यावे.
तहान नसताना पाणी पिऊ नये.
सक्काळी सकाळी पाणी नको. रात्री झोपताना मुळीच नको. दात असताना ज्युस नको. अति खाण्याची हौस नको.
दूर रहावे चार हातं
फवारणी आणि खतं ।
पिकवाव्या स्वकष्टातं
फळे आणि भाज्या ।।9।।
रासायनिक फवारणी केलेली फळे आणि पालेभाज्या खाणे म्हणजे पोटावर अत्याचार करणे होय.
बांधून ठेविली कोंबडी
खाल्ली तिची तंगडी ।
पडली रोगाची उडी
वरच्या वरी ।।11।।
खुराड्यात माजवलेल्या पशुपक्ष्यांचे मांस खाऊ नये, याऐवजी स्वतःचे अन्न स्वतः शोधून खाणाऱ्या प्राण्याची निवड करावी.
सूरव्यास साक्षी ठेवून
जे करिती भोजन ।
सुखे होई परिवर्तन
खाल्ल्या अन्नाचे ।।12।।
जे प्राणी सुर्यास्तानंतर खातात, त्यांचे मांस खाऊ नये. किंवा सूर्य नसताना जे खाल्ले जाते, त्याचे रूपांतर क्लेदात होते.
क्लेद राक्षस जाणावा
अन्नासी सूर्य दाखवावा ।
क्लेदासी ठार मारवावा
सूर्या करवी ।।13।।
धान्य किमान एक वर्ष जुने करून वापरावे, त्यासाठी कडकडीत उन्हात ते आधी वाळवावे. नाहीतर भाजून वापरावे.
मत्स्य कूर्म अथवा खेकडा
जलाधिपति प्रमेहासी वाकडा ।
असे अन्न त्वरीत सोडा
जे क्लेदासी कारण ।।14 ।।
ज्या अन्नात पाणी किंवा जलांश जास्ती आहे ते अन्न टाळावे, जे पाणथळ जागी रहातात किंवा पाण्यातच जगतात, त्यांच्या अंगी मुळातच पाणी जास्त असल्याने असे प्राणी क्लेद वाढवतात.
मधुर ते ते सर्व सोड
म्हणजे फक्त नव्हे गोड ।
पचायला होती जड
या नाव मधुर ।। 15।।
गोड पदार्थ म्हणजे फक्त गुळ आणि साखरच नव्हे तर पचायला जे जड ते सर्व मधुमेहाचे कारण आहेत.
गव्हाचा होतो गाजावाजा
मधुर रसाचा आहे राजा ।
प्रमेहाची मिळेल सजा
चटणी भाकरीत आहे मजा ।।16।।
समुद्र किनारी गहू नको. कुकरचा चिकट भात नको. चटणी भाकरी सोलकढीशिवाय जेवण नको. गरजेपेक्षा जास्त नको.
सेवा केल्यावीण खाणे
म्हणजे नरकात जाणे ।
कशाला मग दूध पिणे
ताक तूप असताना ।।17।।
श्रमाचे काम न करता भरपेट जेवणे, गाईची प्रत्यक्ष सेवा न करता पैसे देऊन विकतचे दूध दही खाणे, त्यापासून बनलेल्या चाॅकलेट, मिठाया यांच्यावर ताव मारणे हे प्रमेहाला बोलावणे आहे. जसे, दुध आणि दही हे पदार्थ वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावेत. वैद्यांना माहिती नसल्यास हा श्लोक वाचून दाखवावा. आणि अर्थ सांगावा. पण दुध आणि दही यांचा मोह वेळीच सोडावा.
अग्नीचा विसर पाडोन
कधीही केले अन्नसेवन ।
होणार नक्की अपचन
ऐसे न करावे ।। 18।।
भुक नसताना जेवणे, घड्याळ सांगते म्हणून जेवणे, सूर्यास्तानंतर जेवणे, ज्या अन्नाने आपल्याला त्रास होतो, हे माहिती असून जेवणे, पहिले खाल्लेले पचले नसताना परत जेवणे, आग्रहाचे जेवणे इ. प्रमेहाचे कारण आहे.
यंत्रावर विसंबून
मन भावना मारून ।
इंद्रियांना गुंडाळून
आणि त्याला विसरून
रोगी होईल जीवन ।।19 ।।
याकरीता,
अखंड असावे सावधान
खातापिता ठेवावे भान ।
आयुष्य जगावे छान
औषधाविना कायमचे ।।20।।
इति अल्पमति प्रमेहसंप्राप्ती समाप्ती
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.02.2017
Leave a Reply