ग्वाल्हेर घराण्याच्या नामवंत गायिका वसुंधरा कोमकली यांची कन्या आणि शिष्या असे दुहेरी नाते असलेल्या आजच्या आघाडीच्या गायिका कलापिनी कोमकली यांनी आपल्या आई बद्दल व्यक्त केलेल्या या भावना..
आई आणि गुरू ही दोन्ही नाती माझ्यासाठी वसुंधरा कोमकली या व्यक्तिमत्त्वामध्ये सामावली गेली होती. जसे एका आईसाठी तिचे बाळ हे सर्वेसर्वा असते, तशीच त्या बाळासाठीही आई हीच सर्वेसर्वा असते. माझे वडील पं. कुमार गंधर्व हे आकाशाएवढे मोठे असले, तरी त्यांना आणि आम्हा मुलांना बांधून ठेवणारी वसुंधरा ही भूमी असते. माझ्यासारखे पोर आकाशात जेव्हा चिमणी होऊन उडण्याचा प्रयत्न करते किंवा घार होऊन विहंग करण्याची मनीषा बाळगते, त्या आकाशाची वैचारिकदृष्टय़ा लांबी-रुंदी जाणण्याचा प्रयत्न करते, तेव्हा शेवटी भूमीवरच येऊन विसावते. वसुंधरा कोमकली ही माझी आई सदैव माझ्यासाठी वसुंधरा या नावाप्रमाणेच भूमी राहिली आहे. त्यामुळे तिचे महत्त्व शब्दातीत आहे. जशी ती माझी जन्मदात्री आई तशी माझ्या सांगीतिक वाटचालीमध्ये मार्गदर्शन करणारी गुरूही. त्यामुळेच तिच्याशी माझे नाते हे महत्त्वाचे आणि वेगळी उंची गाठलेले होते.
संगीत क्षेत्रात मी जी काही आहे किंवा माझी ओळख आहे ती केवळ आईमुळेच आहे. माझे स्वत:चे उभे राहणे हे केवळ वसुंधरा कोमकली यांच्यामुळेच आहे. अगदी व्यक्तिगत पातळीवर सांगायचे, तर कुमारजी गेल्यानंतर वसुंधराताई ज्या खंबीरपणे उभ्या राहिल्या त्यामुळेच मी उभी राहू शकले आणि कलाकार म्हणून घडू शकले हे वास्तव आहे. वसुंधराताईने कोलकाता येथे पतियाळा घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेतले. ती मुंबईला प्रो. बी. आर. देवधर यांच्याकडे ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शिक्षण घेण्यासाठी आली. तेथे तिचा पं. कुमार गंधर्व यांच्याशी परिचय झाला. देवधरसरांच्या तालमीमुळे ती उत्तम गायिका झाली. पण, बाबांच्या संगीताने ती भारावली गेली. कुमारजींशी विवाह झाल्यानंतर १९६२ मध्ये देवास येथे घरी पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर कुमारजींशी सर्वस्वी एकरूप झाली. नव्हे स्वत:ला विसरून ती कुमारजींशी समरस झाली. आधीचे संगीत शिक्षण बाजूला ठेवत तिच्या गायकीमध्ये बाबांच्या शैलीचा रंग चढला. कुमारजींचा सांगीतिक विचार आणि त्यांची शिकवण तिने आत्मसात केली. ते आपल्या गायकीतून मांडण्याचे तिचे कसब वाखाणण्याजोगे होते. पं. कुमार गंधर्व या व्यक्तीवर मनापासून प्रेम केले आणि नंतर त्यांची धर्मपत्नी झाली असली, तरी वसुंधरा ही त्यांची शिष्याच राहिली. सदैव शिकत राहण्याचा हा गुण तिने जीवनाच्या अखेपर्यंत जपला. ही तिची विद्यार्थी असण्याची दशा आहे त्याचे मला सर्वात कौतुक वाटते आणि आश्चर्यही वाटते. आताच्या काळामध्ये थोडे काही येत असेल, तर कलाकार स्वत:ला मोठे समजू लागतात. त्या पाश्र्वभूमीवर आईच्या विद्यार्थी असण्याची नवलाई मलादेखील जोपासावी असे वाटते.
गुरू म्हणून कुमारजी अतिशय कडक होते. त्यांच्याकडून शिकत असतानाही त्यांच्या गायकीप्रमाणेच अवघड वाटायचे आणि तसे ते अवघड असायचेही. पण, आईची शिकवण्याची पद्धत ही थोडी निराळी होती. एखादी तान शिकविताना ती अशा पद्धतीने घोटून घ्यायची की ती समजायला सुगम वाटायची. अर्थात ती तशी सुगम नाही हे नंतर मला गात असताना कळायचे. पण, तालीम घेताना आई ही तान सुगम आहे, असा भास निर्माण करायची. अर्थात आईने शिकविलेले मी किती आत्मसात करू शकले हे मला सांगता येणार नाही. पण, तिची गायन शिकविण्याची हातोटी कदापिही विसरता येणार नाही.
आई म्हणून वसुंधराताईने किती धीर दिला असे सांगायचे म्हटले, तरी नेमकेपणाने सांगता येणार नाही. एक परिपूर्ण गायक कलाकार म्हणून तिची इच्छाशक्ती दांडगी होती. मी आणि भुवनेश असे आम्हाला घडवून घेण्यासाठी ही इच्छाशक्ती तिला केवळ उपयोगी पडली असे नाही तर तिने ही इच्छाशक्ती आमच्यामध्येही संप्रेषित केली. प्रसंग आनंदाचा असो, दु:खाचा किंवा कसोटी पाहणारा, कोणत्याही प्रसंगाला खंबीरपणे कसे सामोरे जायचे हे तिने शिकविले. ‘गीतवर्षां’, ‘त्रिवेणी’, ‘मला उमगलेले बालगंधर्व’, ‘तांबे गीतरजनी’ ‘गीतहेमंत’, ‘ठुमरी, टप्पा, तराणा’ असे स्वतंत्र निर्मिती असलेले हे कुमारजींचे कार्यक्रम वसुंधराताईंशिवाय होऊच शकले नसते. कुमारजींच्या व्यक्तिगत जीवनात ती अर्धागिनी तर होतीच पण त्यांच्या सांगीतिक जीवनामध्येही ती अविभाज्य अंग झाली. एरवी संगीतामध्ये जुगलबंदी असते. पण, कुमारजी यांच्यासमवेत तिच्या संयुक्त गायनाला तोडच नव्हती. दोन प्रतिभावान कलाकारांमध्ये असे सुरेल आणि अप्रतिम सामंजस्य आढळणं अवघड आहे. हे सामंजस्य कुमारजी असेपर्यंत होतेच. पण, नंतर हा गुण तिने आमच्यामध्येही संक्रमित केला.
कुमारजी काय किंवा वसुंधराताई काय, ही पिढीच अशी घडलेली होती की ती सहजासहजी शिष्याची पाठ थोपटणारी नव्हती. तिने कधी तोंडदेखले कौतुक केल्याचे मला आठवत नाही. पण, कधी नाउमेदही केले नाही. एखाद्या मैफलीचे ध्वनिमुद्रण मी ऐकविल्यानंतर स्वर चांगला लागला, आवाज उत्तम आहे, रागमांडणी व्यवस्थित झाली याविषयी ती आई म्हणून थोडेसे कौतुक करायची. पण, त्याच क्षणी तिच्यामधील गुरू जागा व्हायचा. गायनामध्ये काय घडले नाही किंवा कसा स्वर लावला असता तर आणखी उत्तम झाले असले हे कधीही नमूद करायला तिने कमी केले नाही. मी कितीही चांगला प्रयत्न केला, तरी गुरू म्हणून तिची शाबासकी मिळवू शकले नाही. जेवढे म्हणून पिरगळता येतील तेवढे कान पिरगळावेत अशीच बहुधा त्या पिढीची धारणा असावी. जेणेकरून शिष्याच्या हातून काही चांगले घडू शकेल. वसुंधराताईंच्या या शिकवणीमुळेच मी गायिका म्हणून घडू शकले. स्वरांच्या आभाळात उडण्यासाठी सज्ज झाले आहे. पण, विहंग करून झाल्यानंतर स्थिरावण्यासाठीची आणि मनापासून सामावून घेणारी माझी भूमी म्हणजे माझी आई वसुंधरा कोमकली आपल्यामध्ये नाही हे सत्य स्वीकारणे जेवढे अवघड, तेवढेच ते पचविणेही अवघड.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकसत्ता
Leave a Reply