नवीन लेखन...

आई ती आईच – भाग एक

हौस म्हणून फार्मवर मी कोंबड्या पाळल्या होत्या तेव्हाची गोष्ट.
एका कोंबडीची अंडी तिनेच उबवली आणि त्यातून आठ गोंडस पिल्ले झाली. पिल्लांची चोच लहान म्हणून वरी चे धान्य घातले की ते खाण्यासाठी त्यांचे ते तुरू तूरू लडबडत धावत येणे आणि आईने ‘कोक को’ करत इशारा केला की परत आईकडे धावणे हे पहात राहणे फार गंमतीचे.
दुपारी दोनचा सुमार असेल.अचानक त्या कोंबडीचा जोरात कलकलाट कानावर आला. तिचे सततचे ओरडणे ऐकून मी पडवीत धावलो. पाहतो तर ती फार्म कंपाऊंडच्या भिंतीवर चढून, त्याला लागून असलेल्या कडूलिंबाच्या फांदीवर उडी मारण्याच्या तयारीत दिसली. पिल्ले कुठेच दिसत नव्हती. मला काहीच बोध होईना.एखादी धामण वगैरे येऊन तिने एका फटक्यात सगळी गट्टम केली की काय? या विचाराने मी एक मोठी काठी घेऊन जमीन धुंडाळू लागलो. माझी गोंधळलेली अवस्था, फार्ममागेच असलेल्या आदिवासी वाडीतील एका घरासमोर बसलेली म्हातारी कातकरी बाई पहात असावी.माझे लक्ष वेधण्यासाठी तिने एक छोटा दगड माझ्या दिशेने कंपाऊंड वरून भिरकावला. तिच्याकडे पाहताच, सुरकुत्यातून मिश्कीलपणे बोळके दाखवत, तिने डोळ्यानेच कडूलिंबाच्या झाडाच्या शेंड्याकडे पाहण्यासाठी खूण केली. उलगडा झाला.
तिथे टोकावर खुनशी डोळ्यांचा, करड्या रंगाचा,विजेच्या वेगाने जमिनीवरील भक्ष्य उचलणारा शिक्रा पक्षी (Sparrow Hawk) बसला होता. त्याची एकटक नजर सतत मोठ्याने कलकलाट करणाऱ्या आणि एक एक फांदी सर करत त्वेषाने त्याच्याच कडे निघालेल्या कोंबडीच्या हालचालींवर होती. कोंबडी वरपर्यंत पोहोचली. शिक्राने भिऊन आकाशात झेप घेतली. झाडाच्या शेंड्यावर असलेल्या कोंबडीची लाखोली ऐकून की काय, एक दोन घिरट्या घालून शिक्रा दिसेनासा झाला. कोंबडी एका झेपेत पंख फडफडवत जमिनीवर उतरली. समोर पिल्ले दिसत नसल्यामुळे त्याबाबत मी अजूनही कोड्यात होतो.
खाली उतरताच कोंबडी फार्मच्या दुसऱ्या टोकाकडे धावली. तिथे असलेल्या गवती (पाती) चहाच्या गच्च झुडुपातील बिळवजा फटी समोर जाऊन तिने हळू “कुक कुक्” केले. आणि भेदरलेली ती आठही पिल्ले एक एक करून बाहेर आली. म्हणजे शिक्राची चाहूल लागताच त्या माऊलीने आपल्या पिल्लांना गच्च झुडुपात सुरक्षित जागी ठेवले आणि मगच ती शत्रूच्या मागे गेली होती तर!
सर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असून,सर्व प्रथम आपले पंख पसरले. सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली. आईने त्यांना पंखात घेतले. जमिनीवर खाली बसून आपली उब देऊन “मी आहे बाळांनो, मी आहे” असा विश्वास दिला. दोन चार मिनिटे तशीच राहून नंतर उठली आणि पिल्लांचा चिवचिवाट आपल्याभोवती वागवत चरायला निघाली.
आई ती आईच…
— अजित देशमुख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..