११) शारीरिक थकवा (Weakness) – शरीराला अनेक कारणांमुळे थकवा येतो. रक्तात इलेक्ट्रोलाईट्सची कमतरता, रक्तातील लोहाचे (हिमोग्लोबिनचे) प्रमाण खालावणे, अत्यधिक श्रम, उन्हात फिरणे, प्रदीर्घ आजार अशी शेकडो कारणे मिळतील. कारण शोधून मग त्यावर उपाय करणे नक्कीच योग्य असते. तरीही ज्याने लगेच तरतरी वाटेल आणि शरीराला पोषणही मिळेल असे काय आहे हे आपल्याला समजून घ्यायला नक्कीच आवडेल. अशावेळी लक्षात ठेवा २ चमचे पंचखाद्य चूर्ण आणि समभाग लाह्यांचे पीठ दुधातून घ्यावे.
पंचखाद्य: ३/४ कप भाजून किसलेले सुके खोबरे, २ चमचे खसखस, १५० ग्रॅम खडीसाखर, ४/५ वेलचींची पूड, ६ ते ७ खारका आणि ८/१० बदाम यांचे चूर्ण करावे. साळीच्या (भाताच्या) लाहया साधारण समभाग एकत्र करून ठेवावे. फ्रीजमध्ये ठेववावे लागते अन्यथा काही दिवसात वास येऊ शकतो.
१२) वारंवार सर्दी (Chronic cold) – जन्म झाल्या क्षणापासून आयुष्यातल्या शेवटच्या श्वासापर्यंत सतत वातावरणाच्या संपर्कात राहणारा आणि कधीही विश्रांती न घेणारा शरीराचा भाग म्हणजे आपले नाक. झोपेत इतर सर्वकाही शांत होते पण नाक मात्र चालूच राहते. त्यामुळे वातावरणात काहीही बदल झाले किंवा शरीरात काही असमतोल निर्माण झाला की पहिली गोष्ट म्हणजे नाक वाहू लागते. थंड वातावरणात आणि हवामानात चढउतार झाले की बऱ्याच लोकांना सर्दी होते. यावर एक सोपा इलाज म्हणजे दिवसातून ४ ते ५ वेळा शेणाच्या गोवऱ्यांची राख नाक, कपाळ आणि घशावर बाम लावल्याप्रमाणे हलक्या हाताने चोळावी. शेणाची राख न मिळाल्यास लकडाची किंवा अगदी उदबत्तीची राखही चालेल. उदबत्ती लावून एका प्लेटमध्ये राख जमा करता येते. अशी राख जमवून एखाद्या डब्यात भरून ठेवावी आणि गरज वाटेल तेव्हा वापरावी. शेणाची राख उत्तम. अधिक लाभदायक होण्यासाठी यात थोडी सुंठ आणि कोरड्या लसणाचे चूर्ण मिश्र केल्यास उत्तम. हिमालयात तपश्चर्या करणारे साधू अंगाला भस्म लावून बसतात. सर्द म्हणजे थंड आणि त्यातून होणारा आजार म्हणून त्याला सर्दी म्हणतात. नेहमी सर्दी होणाऱ्या लोकांनी जास्त पाणी पिणे टाळावे. पाणी गरम असले तरी त्याचा परिणाम थंडच असतो. विस्तवावर गरम पाणी टाकले तर आग विझते, भडकून उठत नाही. सर्दीमुळे नाक चोंदणे हे लक्षण बरेचदा होते. त्यासाठी अर्धा चमचा ओवा किंचित ठेचून एका रुमालात गुंडाळून नाकाने हुंगावा म्हणजे नाक मोकळे होते.
१३) शय्याव्रण (Bed sores) – सतत शरीराच्या एकाच भागावर दाब पडल्यामुळे त्या ठिकाणचा रक्तप्रवाह थांबतो, त्वचेच्या पेशी मृत होतात, तो भाग लाल होतो, वेदना होतात आणि काळजी न घेतल्यास त्वचेला व्रण होऊन जंतुसंसर्ग होण्याची शक्यता निर्माण होते. असे झाल्यावर हे व्रण अधिकच चिघळत राहतात आणि बरे होणे फार कठीण होऊन बसते. बरेच दिवस अंथरुणात खिळून असलेल्या हालचाल न झाल्यामुळे रुग्णांना असे शय्याव्रण होतात.
उपाय – खोबरेल तेलात भीमसेनी कपूर एकत्र करून लावावा. बहुतेक शय्याव्रण याने बरे होतात.
१४) आवाजाचा त्रास (Noise intolerance): उतारवयात बरेचदा आवाज सहन होत नाहीत असे लक्षण दिसू लागते. शरीरातील रसधातू क्षीण झाल्याचे हे लक्षण आहे. ‘रसे रौक्षं श्रम: शोषो ग्लानि: शब्दासहिष्णुता’ रसधातू क्षीण झाल्याची ही लक्षणे आहेत. म्हणजे शरीराला रूक्षता येते, थकवा जाणवतो, तोंड कोरडे पडते, ग्लानी म्हणजे चक्कर येते आणि आवाज सहन होत नाही. या लक्षणापासून सुटका होण्यासाठी लिंबू पाणी, किंचित गूळ किंवा साखर घालून प्यावे. नियमितपणे अंगाला तिळाच्या तेलाने अभ्यंग करावे.
१५) दातांची निगा (Dental care): सर्वप्रथम दात खराब होण्याची कारणे समजून घेऊया. जगात माणसाशिवाय अन्य कोणतेही प्राणी गरमागरम चहा / कॉफी किंवा थंडगार कोल्डड्रिंक्स, आइसक्रीम सेवन करत नाहीत. अशा अती गरम किंवा कमालीच्या थंड पदार्थांच्या संपर्कात दांत आणि हिरड्या आल्यावर त्यांची परिस्थिती काय बरं होईल? शाळेत तिसरी – चौथीत असताना विज्ञान विषयात एक प्रश्न विचारला जात असे. कंदिलाच्या काचेवर पाण्याचा थेंब पडला तर काचेला तडा का जातो? मग हेच विज्ञान उघड्या डोळ्यांनी आपण दैनंदिन जीवनात लक्षात ठेवायला नको का? ब्रिटिशांनी राज्य करून आपल्या साऱ्या सवईच बदलून टाकल्या आहेत. दांत घासण्यासाठी आजकाल दंतमंजन कुणाच्या घरात दिसलं तर अगदी आश्चर्यच वाटतं. ब्रश आणि पेस्ट हेच सगळीकडे दिसतात. जाहिरातीच्या युगात आपलं शास्त्र मागे पडलं. आपलं ते चांगलं आणि दुसऱ्यांच ते वाईट असा उद्देश यात मुळीच नाही. स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून काय योग्य आणि काय चुकीचे हे आपणच विचार करून ठरवा. त्यासाठी एक प्रयोग करून पहा. स्वयंपाकाच्या भांड्याना एका ब्रश – पेस्टने घासून पाण्याने धुवा आणि ती भांडी कीती स्वच्छ होतात ते पहा. नंतर स्कॉच ब्राइट सारख्या घर्षण होणाऱ्या स्क्रबचा वापर करून पहा. अर्थात दातांच्या स्वच्छतेसाठी असे घर्षण होणे गरजेचे आहे. म्हणून कोळशाच्या भुकटी बरोबर किंवा गेरूच्या पावडर बरोबर काथ, वडाची साल, कडुलिंब, बकुळ, बाभळीची साल आशा वनस्पतींच्या चूर्णाचे मिश्रण केलेले दंतमंजन वापरुन दांत स्वच्छ करावेत. कितीही झालं तरी आपल्या मुखभागाच्या कानाकोपऱ्यात ब्रशपेक्षा आपले बोटच व्यवस्थित पोचू शकते. दातांच्या फटींमध्ये जमलेले किटण फ्लॉसचा वापर करून स्वच्छ करावे. फ्लॉस म्हणजे एकप्रकारचा नायलॉनचा दोरा. दातांच्या फटीतून सहज फिरवता येतो आणि फटीतील किटण निघून जाते. पन्नाशी नंतर तरी दंतमंजन वापरायला सुरुवात केली पाहिजे. एकदा बत्तीशी गेल्यावर काही उपयोग नाही.
१६) मोतिबिंदू (Cataract): या विकारात डोळ्यांच्या भिंगामध्ये गढूळपणा येऊन दृष्टी कामजोर होते. हा आजार नेमका कशामुळे होतो ते अद्याप वैद्यकशास्त्राला न उलगडलेले कोडे आहे. मधुमेह असणाऱ्यांना मोतिबिंदू तुलनेने लवकर होतो असे निदर्शनास आले आहे. आनुवंशिक असल्याचेही बरेच संदर्भ मिळतात. धूम्रपान, मद्यपान, प्रखर उन्हात भटकणे, वेल्डिंगची कामे, संगणकाचा अति वापर असे अनेक तर्क समोर येत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर हा रोग कफाचा आहे. ‘चक्षुस्तेजोमयं तस्य विशेषात् श्लेष्मतो भयम् ॥’ असा श्लोक आयुर्वेदीय ग्रंथात आहे. म्हणजे डोळे हे तेजाचे अधिष्ठान आहे आणि त्यांना काफापासून भीती/ धोका आहे. प्रत्यक्षात बऱ्याच रुग्णांमध्ये निरीक्षण केल्यावर असे लक्षात येते की दूध, दही, ताक किंवा गोडाचे प्रमाण ज्यांच्या आहारात अधिक असते (अर्थात कफ वाढवणारा आहार) त्यांना मोतिबिंदूचा त्रास लवकर होतो. मोतिबिंदूचे ऑपरेशन करून घेणे हा एकमेव उपाय आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे शस्त्रकर्म खूपच सोपे झाले आहे. सकाळी ऑपरेशन केल्यावर पेशंटला संध्याकाळी घरी जाता येते, जखम नाही की रक्तस्राव नाही. आठ दहा दिवसात दृष्टी पूर्ववत होते.
१७) तोंड कोरडे पडणे (Dryness of mouth): तोंडात अन्न घेतल्याबरोबर लगेचच लाळ येऊन पचनाची पहिली प्रक्रिया सुरू होते. वार्धक्यात कधीकधी लालाग्रंथींमधून पुरेशा प्रमाणात लाळ निर्माण होत नाही. याची अनेक कारणे असू शकतात. काही औषधांचे दुष्परिणाम, विशिष्ट आजारांचे लक्षण, केमो किंवा रेडिएशनचे दुष्परिणाम, लालाग्रंथींच्या नलिकांमध्ये खडा होणे, उलट्या होणे, तळलेले पदार्थ अधिक सेवन करणे, रक्तस्राव होणे, सिगारेट व तंबाखू सेवन करणे अशी मुख्य कारणे आहेत. योग्य निदान केल्याशिवाय चिकित्सा करणे योग्य नाही. काही रुग्णांमध्ये आलेला अनुभव म्हणजे जिभेवर चिमूटभर मीठ दर तासाभराने टाकत राहणे. याने लाळ तोंडात येण्याचे प्रमाण सुधारते. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल त्यांनी हा प्रयोग करू नये किंवा रक्तदाब तपासून मगच हा उपाय करावा.
-डॉ. संतोष जळूकर
वैयक्तिक सल्ल्याकरिता फोन +91 7208777773
Leave a Reply