सोनपावलांनी येणार्या दिवाळीतील प्रत्येक दिवसाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस थाटामाटात साजरा केला जातो. आजकाल केवळ हिदू लोकच नव्हे तर इतर धर्माचे लोकही लक्ष्मीपूजन करतात. हा सण सर्वांना आनंद आणि समृद्धी देणारा ठरतो. दिवाळीशी माझ्याही काही चांगल्या-वाईट आठवणी जोडल्या गेलेल्या आहेत.
आपल्याकडे फार प्राचीन काळापासून दिवाळी धूमधडाक्यात साजरी केली जाते. दिवाळी हा धार्मिक आणि अंतर्मनाला सारख्याच प्रमाणात प्रफुल्लित करणारा आगळावेगळा सण. वर्षभरातील चिंतेची, अडीअडचणींची मरगळ दूर करून थोडेफार का होईना, पण, सर्वांना समाधान मिळावे, सणाचा आनंद उपभोगता यावा हे या सणाचे निमित्त असते. दिवाळी हा या सर्व गोष्टींचा संगम आहे. दिवाळी आपल्या सर्व सणांची सम्राज्ञी. दिवाळीची परंपरा पौराणिक काळाशी नाते सांगणारी असली तरी जवळपास हजारो वर्षांपासून आपल्याकडे दिवाळीचा सण साजरा केला जातो.
भगवान श्रीकृष्णाच्या थोर कार्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रारंभी हा सण साजरा केला जाऊ लागला. पुढे कालांतराने या सणाचे स्वरूप एक कौटुंबिक आनंद सोहळा असे झाले. वसूबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अशा स्वरूपात दिवाळीचा सण साजरा होतो. आसमंतातील अंधार दूर करणारा, अज्ञात अशा मृत्यूचे भय निवारण करणारा, थोर इच्छा आकंक्षा बाळगणारा, आनंदाची उधळण करणारा सण सर्वांसाठी आल्हाददायक ठरतो.
सोनपावलांनी येणारी दिवाळी प्रारब्ध आणि पुरूषार्थ यांच्या साहचर्याची द्वाही फिरवत येते. पहिल्या दिवसापासूनच वातावरणात उत्साह आणि जल्लोष भरलेला असतो. मुळात दिवाळी हा सणच सर्वांना आनंदी आणि उत्साही राहता यावे यासाठी साजरा केला जातो. या सणाला धार्मिक महत्त्वाएवढेच शास्त्रीय महत्त्वही आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशीदिवशी धनाची पूजा केली जाते. आर्यांची वस्ती ज्या काळी उत्तरेकडे होती त्या काळी सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र असा प्रकार होता. सहा महिन्यांच्या रात्रीचा कंटाळवाणा काळ संपल्यानंतर येणार्या आनंदोत्सवाप्रीत्यर्थ हा सण साजरा केला जाऊ लागला असा समज प्रचलित आहे. प्रभू रामचंद्र चौदा वर्षांचा वनवास संपून लक्ष्मण आणि सीतेबरोबर अयोध्येमध्ये परतले तेव्हा नगरीतील लोकांनी घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि दिवाळी साजरी केली अशीही आख्यायिका आहे.
धनत्रयोदशीदिवशी जी व्यक्ती दिवा लावेल आणि व्रताचरण करेल त्याला अपमृत्यू येणार नाही असा प्रत्यक्ष यमाने आशीर्वाद दिला होता असा समज आहे. एकदा यमाने दुतांना ‘माणसाचे प्राण हरण करताना तुम्हाला दु:ख होते का’ असे विचारले. तेव्हा दुतांनी होकारार्थी उत्तर देऊन यावर काहीतरी उपाय योजण्याबद्दल सांगितले. तेव्हा यमाने दिव्याचे महत्त्व सांगितले. त्यामुळेच धनत्रयोदशीपासून घरोघरी दिवे, पणत्या लावायला सुरूवात होते. धनत्रयोदशीमागे आणखी एक इतिहास आहे. आयुर्वेदाचे संशोधक धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीदिवशी झाला. त्यांनी जीवन सुखी आणि निरोगी व्हावे यासाठीचा कानमंत्र आयुर्वेदातून दिला. त्यांचे स्मरण यादिवशी केले जाते. धन्वंतरी हे समुद्रातून निघालेल्या 14 रत्नांपैकी एक होते अशीही श्रद्धा आहे.
धनत्रयोदशीनंतरचा दिवस म्हणजे नरकचतुर्दशी. नरकचतुर्दशीला चंद्रोदयानंतर आणि सूर्योदयापूर्वी अंगाला सुगंधी तेल आणि उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. दिवाळीच्या काळात थंडीला सुरूवात होते. या काळात त्वचा शुष्क झालेली असते. त्यामुळे तेल लावून गरम पाण्याने केलेले अभ्यंगस्नान आल्हाददायक वाटते. नरकचतुर्दशीदिवशी पहाटे उठून चंद्राचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं. आंघोळ झाल्यावर सहकुटुंब फराळाचे पदार्थ खाण्याची प्रथा आहे. कोकणात मात्र यादिवशी वेगवेगळ्या प्रकारचे पोहे केले जातात. त्यामध्ये गूळपोहे, बटाटे पोहे, दूधपोहे, दहीपोहे, तुपात फुलवलेले पोहे यांचा समावेश असतो. घरोघरी एकमेकांच्या घरी पोहे खायला येण्याचे आमंत्रण दिले जाते. म्हणून नरकचतुर्दशीला कोकणात ‘चावदिवस’ असेही म्हणतात.
लक्ष्मीपूजन हा दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस. घरातील अलक्ष्मीचे म्हणजे दारिद्रयाचे उच्चाटन करून लक्ष्मीचे आवाहन करून शास्त्रोक्त पूजा करणे म्हणजे लक्ष्मीपूजन. प्रत्यक्षात दिवाळी हा हिंदू धर्माचा सण. पण, सर्वधर्मीय लोक लक्ष्मीपूजन साजरा करतात. व्यापारी या दिवशी बोनस होत असल्याने सर्वांच्या घरी खर्या अर्थाने लक्ष्मी येते. पूर्वी गावातील व्यापारी जान्हवे घातलेल्या मुलाला दुकानात बोलावून काही दक्षिणा देत असत. त्यामुळे माझ्या गावातील कनिष्ठ जातीतील काही मुले पंचा गुंडाळून, दोरा अडकवून व्यापार्यांकडे जात असत.
बलिप्रतिपदा हा दिवाळीचा पुढचा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवताला सुरूवात होते. यादिवशी बायको नवर्याला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पती पत्नीला प्रेमाने काहीतरी भेटवस्तू देतो. त्यानंतर भाऊबीजेचा दिवस येतो. यादिवशी बहीण भावाला ओवाळते. यम आपल्या बहिणीकडे यमीकडे यादिवशी जेवायला गेला होता. त्यावेळी तिने त्याला सुगंधी तेल, उटणे लावून आंघोळ घातली आणि ओवाळले. तशीच प्रथा आजही सुरू आहे. यादिवशी यम अनुपस्थित असल्याने ज्यांना मृत्यू येतो त्यांना थेट स्वर्गात प्रवेश मिळतो अशी श्रद्धा आहे.
दिवाळीशी माझी एक आठवण जोडलेली आहे. 1962 मध्ये मी ‘मासिक शब्दरंजन’ हा दिवाळी अंक काढला होता. बर्याच नामवंत मंडळींनी त्यामध्ये लेख लिहिले होते. ग.दि.माडगूळकर हे दिवाळी अंकाचे संपादक तर दत्ता सराफ उपसंपादक होते. दिवाळी अंकाची रचना आणि मांडणी खूप छान झाली होती. तो अंक बाजारात आला आणि त्याचदिवशी चीनने भारतावर आक्रमण केले. त्यामुळे अंक खपला नाही. पण, उत्तम दर्जाचे मासिक काढल्याचा आनंद मात्र मला समाधान देणारा ठरला.
— ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
(अद्वैत फीचर्स)
Leave a Reply