या वर्षीच्या ‘उद्याचा मराठवाडा’ या प्रतिष्ठीत दिवाळी अंकात कणकवलीचे विद्यमान आमदार श्री. नितेश राणे यांच्यावर सप्टेंबर २०१७ महिन्याच्या मध्यावर लिहिलेला माझा हा लेख.
या अंकात महाराष्ट्रातील आजच्या नेतृत्वाची नविन पिढी, उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात कितपत यशस्वी होईल याचा जिल्हावार आढावा घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नितेश राणेंवर लिहिण्यासाठी मला विनंती करण्यात आली होती.
हा लेख वाचताना मी किंवा अंकातील कोणतेही इतर लेखक, कोणत्याही राजकीय पक्षाचे सक्रिय किंवा निष्क्रिय कार्यकर्ते नाहीत, हे ध्यानात ठेवावे. मी ही श्री. नितेश राणेचा किंवा काॅंग्रेसचा किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा समर्थक नाही. मी राजकारणावर लिहायचंही टाळतो. सिंधुदुर्गातील माझ्या परिचयाच्या आणि तौलनिक विचार करणाऱ्या काही जाणकारांशी चर्चा करुन मी श्री. नितेश राणेवरील हा लेख लिहिलेला आहे.
या अकात सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, प्रणोती शिंदे, राजीव सातव, रक्षा खडसे, अमित देशमुख, विश्वजित कदम व इतर नव्या दमाच्या राजकीय व्यक्तीमत्वांचाही आढावा घेण्यात आला आहे. हा संपूर्ण अंक केवळ वाचनीयच नव्हे, तर संग्रहणीय आहे.
अंक – ‘उद्याचा मराठवाडा’
संपादक – श्री. राम शेवडीकर
अतिथी संपादक – श्री. प्रविण बर्दापूरकर
आमदार नितेश राणे –
मी कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रहिवासी. म्हणजे दृढ अर्थाने नव्हे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी हा डोंगरी तालुका माझं गांव, त्या अर्थाने मी रहिवासी. पण नॉन रेसिडेंट सिंधुदुर्गवासी. माझा कायमचा मुक्काम, बहुतेक इतर कोकण्यांप्रमाणेच, माय मुंबयत. इतर ठिकाणच माहित नाही, पण आम्हा कोकणी माणसाचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, तो जगभरात कुठेही राहिला, तरी त्याचं लक्ष आपल्या गांवाकडे असतंच असतं. गांवी घडणाऱ्या बारीक-सारीक घडामोडीतडे त्याचं अगदी बारकाईने लक्ष असतं. वर्तमानपत्र, येणारा जाणार यांच्याकडे त्याची आपल्या गावची आणि जिल्ह्याची चवकशी सातत्याने सुरु असते. आणि मी ही सिंधुदुर्गातलाच असल्यानं, मी ही या सवयीला अपवाद नाही.
आम्हा कोकणी माणसांचं आणखी दोन वैशिष्ट्य आहेत. एक म्हणजे मुंबईत ग्रामोद्धारक मंडळ काढणं, ते चालवणं, तत्वावर मतभेद होऊन ते सोडून आपल्या विचारांच्या माणसाचं पुन्हा एखाद नविन मंडळ बनवणं आणि पुन्हा हेच चक्र चालू. आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पंचायत समिती ते अमेरिका-उत्तर कोरिया किंवा भारत-चीन याचं राजकारण कस चुकतंय किंवा बरोबर आहे यावर हक्काने आणि हिरिरीने बोलणं. कोकणी माणूस मुळातच तत्ववादी असल्याने यात माघार कोण घेणार हा प्रश्नच येत नाही आणि अर्थातच कुणीच माघार घेत नाही..!
पुढे जाण्यापूर्वी मी एक विनंती करू इच्छितो, की मी या लेखात पुढे कधी जेंव्हा कोकण बोलतो, तेंव्हा मला सिंधुदुर्ग जिल्हा असं अपेक्षित आहे, हे कृपया लक्षात घ्यावं. राजकारणतलं सर्व कळतं असा आम्हा कोकण्यांचा समज असतो आणि बऱ्याच अंशी तो खराही असतो. मी तसा राजकारणातला किंवा राजकारणाची आवड असलेला मुळीच नाही. त्यातही मी तिथे कायांचा राहण्यास नसल्याने. माझा तेथील डे टू डे घटनांशी संबंध येत नाही परंतु गांवातील घडामोडींकडे लक्ष असताना, राजकारणाला टाळता येत नाही आणि ज्या बातम्या हाती किंवा कानी येतील त्य्वरून माझा असा एक अंदाज लावण्याचा मी प्रयत्न करत असतो. माझ्या नजरेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सध्याचे राजकीय वारे आणि त्यातून उदयाला येत असलेलं बरं-वाईट नेतृत्व, याचा एका त्रयस्थ, अ-राजकीय परंतु कोकणच्या भल्या बुऱ्यावर आस्थेने लक्ष असलेली एक व्यक्ती, या नात्याने मी या लेखात आढावा घेणार आहे. अर्थात असा आढावा घेताना मी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुरुवातीपासूनच्या राजकारणाचा अगदी थोडक्यात आणि धावता आढावा घेणार आहे नाहीतर साध्याच राजकारण कसं आणि कोणत्या दिशेने चाललं आहे याचा नीटसा अंदाज आपल्याला येणार नाही. आणखी एक, मी राजकारणातला जाणकार किंवा राजकारणावरचा अधिकारी भाष्यकार नाही, त्यामुळे गत काळातील काही व्यक्ती, घटना आणि त्यांचा कालावधी यांचा उल्लेख सुटला असणं शक्य आहे. माझा प्रयत्न आजच्या सिंधुदुर्गातील राजकारण कस आहे हे दाखवणं आहे.
कोकणी माणूस मुळातच हुशार आणि विचारी. या त्याच्या हुशारीला आणि विचारीपणाला कोकणाबाहेरची जनता चिकित्सक वैगेरे म्हणते. हुशारी, विचारी आणि चिकित्सकतेत काकणभर जास्तच असलेला आमचा सिंधुगुर्ग जिल्हा हा निसर्ग समृद्धीत महाराष्ट्रात क्रमांक एकचा, तर आर्थिक समृद्धीत सर्वात खालच्या नंबरांवर असलेल्या जिल्ह्यांपैकी एक. आर्थिक विकासात मागे पडण्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे, सुरुवातीपासून राष्ट्रीय स्तरावर कोकणचं प्रतिनिधीत्व केलेल्या हुशार आणि दिर्घ दृष्टीच्या नेत्यांनी, हल्लीच्या नेत्यांप्रमाणे फक्त आपल्या मतदारसंघाचा विचार न करता, संपूर्ण देशाचा विचार प्रथम केला. यात अमोघ वक्तृत्व आणि उत्कृष्ट संसदपटू आणि आंतराराष्ट्रीय कीर्तीचा समाजवादी नेता अशी ख्याती प्राप्त केलेले बॅ. नाथ पै, कोकण रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचं प्रारंभिक कार्य केलेले श्री. मधु दंडवतें, सलग तिन वेळा राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलेले श्री. सुरेश प्रभू अश्या तिनही व्यक्ती येतात. या तिघांनीही कालानुरूप देशाच्या सरकारात महत्वाच्या भुमिका बजावल्या, मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. श्री. मधू दंडवतेंना कोकण रेल्वेचं शिल्पकार म्हटलं तरी आणि रेल्वेचं नांव कोकण असलं तरी प्रत्यक्षात कोकणाला तसा तिचा फायदा फारसा झालेला नाही. सुरेश प्रभुंनीही सरकारात महत्वाच्या भुमिका बजावल्या आहे, अजूनही बजावतायत पण कोकण विकासाच्या दृष्टीने त्यांचा हवा तसा फायदा अजून तरी झालेला दिसत नाही.
माझ्या चटकन लक्षात आलेल्या आणि राष्ट्रीय स्तरावर कोकणाचे प्रतिनिधीत्व केलेल्या ह्या तिन मातब्बर व्यक्ती. हे सर्व वेगवेगळ्या व प्रसंगी परस्पर विरोधी विचारांचे असुनही, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल, कामावरील निष्ठेविषयी आणि प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे राजकीय विरोधकदेखील आदरानेच बोलताना आढळतील. देशहिताला सिंधुदुर्गातील पूर्वीच्या नेत्यांनी नेहेमीच प्राधान्य दिलं. त्यांच्या या अखिल भारतीयत्वाचा कोकणच्या आर्थिक विकासावर ऱ्हस्व परिणाम झाला हे नाकारता येणार नाही. साध्या राहाणीवर विश्वास असलेली कोकणी जनताही, आपल्या नेत्यांच्या उच्च विचारसरणीच्या कौतुकात दंग राहून ‘आमचो मानूस केदो मोठो’ असंच म्हणत राहीली. अर्थात आपल्या मगासपणाची खंत कोकणी जनतेला कधीच नव्हती.
ही अशी, आहे त्यात समाधानी राहणारी पिढी पुढे जुनी झाली आणि सम १९९० च्या आसपास कुठेतरी नवीन तरुण पिढी उदयाला आली. शिक्षणामुळे किंवा टिव्हीच्या माध्यमातून जगाच्या खिडक्या उघडल्यामुळे नविन पिढीच्या महत्वाकांक्षेला धुमारे फुटू लागले होते. सामाजवादी विचारसरणीच नेतृत्व मिळमिळीत वाटू लागलं होत. नविन काहीतरी पर्याय हवासा वाटू लागला होता आणि नेमक्या याच वेळी सिंधुदुर्गाच्या राजकीय क्षितिजावर श्री. नारायण तातू राणेंचा उदय झाला आणि नंतरच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा पोतच बदलून गेला. नेमस्त कोकणी राजकारण आक्रमक, प्रसंगी हिंसकही म्हणून ओळखलं जाऊ लागलं. जिल्हा शिवसेनेच्या भगव्या रंगात रंगून गेला. या दरम्यान केलेला शिवसेनेचा चेंबूरचा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा राणेंचा प्रवास अतिशय चित्तथरारक व रक्तरंजीतही घटनांनी भरलेला आहे. फरसं लौकीक शिक्षण गाठीशी नसताना श्री. राणेंचं हे यश मला कौतुकास्पद वाटतं. सन २००५ सालात श्री. नारायण राणेंनी शिवसेना सोडली आणि भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर सिंधुदुर्गावर सत्ता चालू लागली, ती कोणत्याही पक्षाची नव्हे, तर नारायण तातू राणेची. राणेंची काॅग्रेस मर्यादीत राहीली, ती फक्त निवडणून चिन्हापुरती, अन्यथा नारायण राणे हाच पक्ष आणि कार्यकर्ते म्हणजे राणे समर्थक. महाराष्ट्रातील प्रशासनावर पकड असलेल्या दोन नेत्यांत दुसरे श्री. नारायण तातू राणे हे नांव येतं. पहिले अर्थातच श्री. शरद गोविंदराव पवार. हे माझ्यासारख्या लांबून राजकारण पाहाणाऱ्या माणसाचं मत.
सन २००५ मधे श्री. नारायण तातू राणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा, यांचं अतूट नातं तयार झालं, ते आता कमी झालं असलं तरी अद्याप टिकून आहे. २००९ सालच्या लोकसभा निवडणूकीत श्री. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग-रत्नागिरीच्या आपले ज्येष्ठ चिरंजीव श्री. निलेश राणे यांना श्री. सुरेश प्रभुंच्या विरोधीत काॅग्रेसच्या चिन्हावर निवडून आणलं. त्यानंतर लगेचच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीत स्वत: श्री नारायण राणेंना मालवण-कुडाळ या त्यांच्या होम पिचवर निसटता विजय मिळाला आणि येथून पुढे नारायण राणेंचा सिंधुदुर्गीतला करिश्मा कमी होऊ लागला. खासदार झालेले निलेश राणेही फारसा प्रभाव राजकारणात किंवा मतदार संघातही पाडू शकले नाहीत. याच निवडणूकीत कणकवली मतदारसंघात त्याकाळचे कट्टर राणे समर्थक श्री. रविन्द्र फाटक भाजपाच्या श्री. प्रमोद जठारांकडून अवघ्या ३४ मतांनी पराभूत झाले आणि हा ‘नारायण’ हळू हळू अस्ताला जाण्याची चिन्ह दिसू लागली.
सन २०१४ नुसार सिंधुदुर्गीची आजची स्थिती खासदार सेनेचा, पालकमंत्री सेनेचा, तिन पैकी दोन आमदार शिवसेनेचे. याच निवडणूकीत स्वत: नारायण राणे मालवण-कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईकांकडून पराभूत झाले. कणकवली मतदारसंघातील श्री. नारायण राणेंचे चिरंजीव श्री. नितेश राणे हे एकमेंव आमदार काॅंग्रेसचे. कमी झाला असला तरी जिल्ह्यावरील नारायण राणेचा प्रभाव नाहिसा झालेला नाही. जिल्ह्यातील इतर सत्तास्थानं, जसे जिल्हा बॅंक, जिल्हापरिषद, खरेदी-विक्री संघ आजही नारायण राणेंच्या ताब्यात आहे. या निवडणुकीत श्री. नारायण राणेंचे सुपुत्र श्री. नितेश राणेंचा सिंधुदुर्गात राजकीय उदय झाला.
नारायण राणेंचे सुपुत्र श्री. नितेश नारायण राणे सध्या कणकवली मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करतायत. सन २०१४ साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निनडणूकीत भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन आमदार श्री. प्रमोद जठार यांचा श्री. नितेश राणेंनी जवळपास २५ हजार मतांनी पराभव केला आणि काॅंग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले. देशभरात पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदींची लाट असताना आणि भाजपनेही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा करुन केन्द्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि दस्तुरखुद्द पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या जाहीर सभा या मतदार संघात लावली असतानाही, राजकारणात प्रथमच प्रवेश केलेले श्री. नितेश राणे चांगल्या मतांच्या फरकाने विजयी झाले. त्यांच्या या यशाच्या मागे त्यांच्या कर्तुत्वापेक्षा वडील श्री. नारायण राणेंची पुण्याई आणि कर्तुत्व जास्त होती असं मला वाटतं. श्री. नारायण राणेंना मानणारा एक मोठा वर्ग आजही जिल्ह्यात असल्याचा फायदा श्री. नितेश राणेंना झाला हे निश्चित.
दि. २३ जून १९८२ रोजी जन्म पावलेले श्री. नितेश राणे हे महाराष्ट्रातील नविन उदयाला येत असलेल्या लक्षवेधी नेतृत्वापैकी एक. त्यांचं शिक्षण एम. बी. ए. पर्यंत झाल्याची माहिती मिळते. वडील श्री. नारायण राणेंची आक्रमकता आणि अरेला कारे म्हणण्याची पद्धत त्यांच्यात पुरेपूर उतरली आहे, अस गेल्या तिन चार वर्षांतील घटनाक्रम पाहाता म्हणता येत. मराठा मोर्चाला पाठिंबा असो किंवा पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा काढणाऱ्यास रोख रकमेच जाहिर बक्षीस देणं असो किंवा श्री. बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात भुमिका घेणं असो, इत्यादी गोष्टी त्यांनी राजकीय फायदा-तोट्याचा विचार न करता केल्या. त्यांची भुमिका किती बरोबर किंवा किती चूक हा या लेखाचा विषय नाही, मात्र त्यामुळे ते सतत चर्चेत राहीले आणि काहींचे आवडतेही झाले हे मात्र खरं. त्यांचा पुढील राजकारणाचा बाज कासा असेल याची चुणूक यातून मिळाली.
ते आमदार होण्यापूर्वी राजकारणात सक्रिय नसले, तरी त्यांनी २०१० साली स्थापन केलेल्या ‘स्वाभिमान’ या संघटनेच्या माध्यामातून सामाजिक क्षेत्रात चांगलेच कार्यरत होते. आरोग्य समस्या ,बेरोजगारी, शिक्षण समस्या, महिला अत्याचार, नागरिकांचे मुलभूत प्रश्न ई. समस्यांवर आवाज उठवण्याचे काम स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून मुख्यत्वे मुंबई व महाराष्ट्रात केलं जात असलं, तरी स्वाभिमान आणि तिचे संस्थापक सतत चर्चेत राहीले, ते स्वाभिमान संघटनेच्या कार्यपद्धतीमुळे. दबंगगीरी हा या संघटनेचा पाया. दादागिरीचं आकर्षण तरुणांना असतंच, त्यामुळे श्री. नितेश राणेंच्या सभोवती तरूण कार्यकर्त्यांचं जाळंच निर्माण झालं नसतं तरच नवल. स्वाभिमानचं उल्लेखनीय म्हणावं असं एक कार्य म्हणजे स्वाभिमानच्या माध्यमातून सातत्याने आयोजित करण्यात येणारे रोजगार मेळावे. स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना रोजगार प्रदान करण्यात आले आहेत. त्यापैकी एका मेळाव्याची नोंद गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्डस मध्ये झाल्याची माहितीही मिळते.
याच सुमारास इ.स. २०१० मध्ये चिंटू शेख याने, नितेश राणेंनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला होता, याप्रकरणी पोलीस चौकशी होऊन नंतर राणेंना क्लीन चीट देण्यात आली होती. हे प्रकरण बराच काळ गाजत होतं. नंतर पुढे इ.स. २०१३ मध्ये चिंटू शेखने नितेश राणेंविरोधात विक्रोळी मेट्रोपॉलिटन कोर्टात दाखल केलेली याचिका बिनशर्त मागे घेतली. या प्रकरणामुळे श्री. नितेश राणेंना नकारात्मक का होईना, परंतु प्रसिद्धी मिळाली.
तिन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकांच्या दरम्यान श्री. नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करत मराठी लोक मांसाहारी असल्याने त्यांना फ्लॅट विकायचा नाही या जैन/गुजराती बांधकाम व्यावसायिकांविरोधात त्यांनी जाहीर भूमिका घेतली. या सर्व वादग्रसत्तेमुळे प्रत्यक्ष राजकारणात कार्यरत असलेले त्यांचे वडील श्री. नारायण राणेंना त्रास होत असला तरी श्री. नितेश राणेंचं नांव एव्हाना सर्वांपर्यॅत पोहेचलं होतं. बापसे बेटा सवाई असं सिंधुगुर्गात म्हटलं जाऊ लागलं होतं तसच श्री. नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातील जिवाभावाच्या साथीदारांना दुखावल्यामुळे बापाला पोरं अडचणीत आणणार असंही वाटू लागलं हेतं. अशात २०१४ सालच्या विधानसभा निवडणूकांमध्ये श्री. नारायण राणे श्री. नितेश राणेंसाठी तिकीट मिळवण्यात यशस्वी ठरले. या निवडणूकीत मोदी लाटेचा आणि खुद्द सिंधुदुर्गातील त्यांच्या स्वत:बद्दल बदललेल्या जनमताचा अंदाज श्री. नारायण राणेंना आलेला होता. त्यांची स्वत:ची मालवण -कुडाळ मतदारसंघातील सीट धोक्यात असल्याचा अंदाज नारायण राणेंना आला हेता. तरी मुलाचं करीयर मार्गी लागावं म्हणून सर्वच राणे कुटुंबीय, त्यांचे हिचचिंतक व मित्रमंडळींनी श्री. नितेश राणे निवडून यावेत म्हणून जीवाचं रान केलेलं मी स्वत: अनुभवलं आहे. नारायण राणेंचं नांव, पुण्याई आणि स्वाभिमान संघटनेच्या तरूण कार्यकर्त्यांचं जाळं, तसंच तत्कालीन भाजप आमदार श्री. प्रमोद जठार यांना त्यांच्या कार्यकाळात मतदारांच्या अपेक्षा पुऱ्या करण्यात आलेलं अपयश व त्यामुळे असलेली मतदारांची नाराजी इ. या साऱ्याचा उपयोग श्री. नितेश राणेंना झाला आणि या निवडणूकीत ते महाराष्ट्राच्या विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले.
नितेश राणेंना आमदार होऊन आता तिन वर्ष होत आलीत. तसे ते स्वाभिमान संघटनेच्या माध्यमातून २०१० सालापासून सामाजिक जिवनात कार्यरत आहेत. असं असलं तरी सनदशीर मार्गाने प्रश्न सुटू शकतात यावर त्यांचा विश्वास अंम्मळ कमीच असल्याचं जाणवतं. कदाचित तरूण रक्त, विविध सत्तास्थानं भुषवलेल्या आणि वडील असलेल्या नारायण राणेंसारख्या आक्रमक नेत्याचं पाठीशी असणं, स्वाभिमान सारख्या तरुणांच्या संघटनेचं जाळं यामुळे असं घडलं असावं. तरी आमदार झाल्यापासून त्यांच्या बेदरकार वागण्यात थोडासा फरक नक्की पडलाय. आता तर सिंदुदुर्गात राणे कुटुंबीय त्यांच्या हजारो समर्थाकासाहित भारतीय जनता पक्षात सामिल होण्याच्या मार्गावर असल्याच्या अनेक खात्रीलायक अफवा गेले काही दिवस उडत आहेत. श्री. नारायण राणे आणि त्यांच्या दोन्ही, विशेषतः श्री. नितेश राणे यांची कार्यपद्धती, कोन्ग्रेस श्रेष्ठी श्रीमती सोनिया गांधी, श्री. राहुल गांधी आणि श्री. अहमद पटेल यांच्यावर कॉंग्रेस पक्षत राहूनही केलेली जाहीर टीका आदी बाबी भाजपच्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरील नेतृत्वाच्या लक्षात असल्याने, श्री. राणे पिता पुत्रांचा भाजप प्रवेश रखडल्याच्याही बातम्या आहेत. भाजप हा विद्वानांचा पक्ष असल्याचे म्हटले जाते आणि विलक्षण थंड डोक्याने पक्षांतर्गत आणि बाहेरील विरोधकांना त्यांची जागा जागा दाखवून देण्याच्या भाजपच्या नेतृत्वाला राणेंची आक्रमक आणि आक्रस्ताळी कार्यपद्धती कितपत रुचेल हा प्रश्नच आहे. आणि याचमुळे त्यांचा भाजप प्रवेश रखडला आहे असही समजतं.
श्री. नारायण राणेंची पद्धती कशीही असली तरी त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी स्व-कर्तुत्वावर केला आहे. सर्व पक्षात त्यांचे मित्र आहेत. मात्र श्री. नितेश राणेंना तस करून चालणार नाही. त्यांना प्रथम स्वतःला सिद्ध करून दाखवाव लागेल. त्यांना आपल्या आक्रमक स्वभावाला मुरड घालावी लागेल. ७०-८०च्य दशकातला अमिताभ बच्चन व्यवस्थेविरुद्ध लढणारा ‘अँग्री यंग मॅन’ म्हणून लोकप्रिय झाला होता. पुढे काळाची पावल ओळखून अमिताभनेही आपल्या भूमिकांमध्ये बदल केला आणि म्हणून तो यशस्वी ठरला. श्री. नितेश राणेंना अमिताभच हे कसब अंगी बनवावं लागेल याची कल्पना असावी आणि कदाचित म्हणून त्यांनी त्यांचा कणकवली मतदार संघं आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्हा अतिशय योजनाबद्ध पद्धतीने बांधत आणल्याची माहिती, सिंधुदुर्गातील सर्वपक्षिय लोकांचा कानोसा घातला असता मिळते. अनेक लोकोपयोगी योजना राबवण्याचं त्यांच्या मनात आहे. त्यांच्या आक्रमक स्वभावाचाही सिंधुदुर्गातील जनतेत आकर्षण आहे. श्री. नितेश राणेंमध्ये अंगभूत पोटेन्शियल आहे. राणे समर्थकांचा त्यांना पाठिंबाही आहे. थोडं शांतपणे आणि थंड डोक्याने त्यांनी राजकारण केल, तर मात्र नितेश राणेंचा राजकारणात सुटलेला वारू पुढची काहीवर्ष तरी अडवणं कुणाला शक्य होणार नाही. श्री. नितेश राणे हे, थोडं पथ्य पाळल्यास, सिंधुदुर्गाच्या राजकारणातील ‘लंबे रेस का घोडा’ आहेत हे नक्की..!
— नितीन साळुंखे
9321811091
दि. १९ सप्टेंबर २०१७.
Leave a Reply