सुप्रसिद्ध मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला.
चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाट्यअभिनेत्री लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला.
विजय तेंडुलकर लिखित ‘सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी ‘चंपा’ आणि निळू फुले यांनी ‘सखाराम’ या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे ‘विवाह संस्था’ संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात लालन सारंग यांनी आपल्या लिखाणात म्हटलंय, ”सखाराम सुरू झालं आणि तेरा प्रयोगांतच नाटक अश्लील आहे, अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं. त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो. सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. पुन्हा तीन महिन्यांतच पुण्यातल्या ‘लिंग निर्मूलन समितीनं’ तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून ‘घाशीराम कोतवाल’ व ‘सखाराम बाइंडर’ ही नाटके होऊ द्यायची नाहीत, असा फतवा काढला. पुन्हा एकदा लढा देऊन त्यातूनही आम्ही बाहेर पडलो..
या सगळ्यांतून जाताना मी व सारंग कळत-नकळत धीट होत गेलो.” त्या म्हणतात, ”स्वत:चं सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला होता.” सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर “बाइंडरचे दिवस” नावाचे पुस्तक लिहिले.
कमलाकर सारंग यांचे २५ सप्टेंबर १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply