मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील अभय गुजर यांचा हा पूर्वप्रकाशित लेख
अभय गुजर गगनचुंबी इमारतींतील ‘अग्नी सुरक्षा’ ही नेहमीच चिंतेची बाब असते. नुकत्याच लागलेल्या ‘लोटस बिझनेस पार्क’मधील आगीच्या तांडवात ही बाब प्रकर्षाने ऐरणीवर आली आहे. अग्निशमन यंत्रणांच्या नियमांच्या अंमलबजावणीतील पळवाटा शोधण्याच्या वृत्तीमुळे अशा इमारतींत वावरणाऱ्या माणसांना धोका निर्माण झाला आहे. याच अनुषंगाने या ‘आधुनिक लाक्षागृहां’चा घेतलेला हा जळजळीत लेखाजोखा…
‘मुंबई नगरी बडी बांका’ असा एक सार्वत्रिक समज आहे. पण दिवसेंदिवस मुंबईतील वास्तव्य जिकिरीचे होत आहे हेही खरेच आहे. मुंबईसारख्या महानगरात जमिनीची उपलब्धता कमी आणि तिथे स्थायिक असलेली जनता प्रचंड, यांमुळेच असलेल्या जागेवर बहुमजली इमारती बांधणे अनिवार्य झाले आहे. जो प्रश्न निवाऱ्याचा, तोच कामकाजाचाही. रस्ता वाहतुकीचा प्रश्नसुद्धा गंभीर झाला आहे. त्यामुळेच कार्यालयासाठी अशाच बहुमजली इमारती असणे गरजेचे ठरले आहे. याच कारणाने पूर्वी तळमजला अधिक दोन ते चार मजले असलेल्या इमारती जाऊन त्यांची जागा आता बहुमजली आणि काही तर खरेच गगनचुंबी इमारतींनी घेतल्या आहेत. या बदलामुळे एकूण सर्व व्यवस्थेवर ताण पडतो आहे. याचबरोबर, सर्व प्रकारची सुरक्षितता राखणे जिकिरीचे झाले आहे. अशा
बहुमजली इमारतींमध्ये आग लागली तर बघायलाच नको. अशा आगी लागून वित्तहानी, जीवितहानी होण्याचे प्रसंग आता ठरावीक दिवसांनी, नेमाने होत आहेत. अशाच एका व्यावसायिक कार्यालये असलेल्या इमारतीला नुकत्याच लागलेल्या आगीच्या निमित्ताने एकूणच सुरक्षितता, खास करून अग्नी-सुरक्षितता हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आताचा प्रसंग आहे ‘लोटस बिझनेस पार्क’ या इमारतीमधला-एकविसाव्या आणि बाविसाव्या मजल्यावर शुक्रवार दि. 18 जुलै, 2014 रोजी लागलेल्या आगीचा. सकाळी सव्वानऊच्या सुमारास लागलेली ही आग कार्यालये सुरू होण्यापूर्वीची होती म्हणून जीवितहानीच्या आघाडीवर नुकसान कमी झाले, तरी ती प्रचंड वित्तहानी करून गेलीच. जनतेची स्मरणशक्ती ताज्या घटनांकडे वळते. त्यामुळे आपल्यापैकी बरेच जण ही दुर्घटना विसरून आपल्या कामात मग्न असतील; पण या निमित्ताने ‘मूळ कारणांचा’ थोडा तांत्रिक परामर्श घेणे वावगे ठरणार नाही, असे वाटते.
विद्युत सुरक्षा:
सर्वप्रथम आगीचे मूळ आपण पाहू या. नेहमीप्रमाणे ‘शॉर्टसर्किट’ने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. खरे पाहता, आग लागलेला सर्वच भाग – दोन मजले – पूर्ण भस्मसात झाल्यामुळे या कारणाचा सबळ पुरावा मिळणे कठीण आहे. बहुतेक वेळा ते शक्य होत नाही. तरीही जगभरात अग्निविम्याचे जे दावे केले जातात, त्यांमधील आकडेवारीवरून असे म्हणता येते, की एकूण आगीच्या 30 टक्के ते 40 टक्के आगी या विद्युत्प्रणालीतील दोषामुळे लागतात. तरीसुद्धा, ‘विद्युत सुरक्षा तपासणी’ (ऑडिट) कडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले जाते, हे कटू सत्य आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांची नेहमी उपेक्षाच होते आणि त्यामुळे आगी लागतच राहतात. जेवढी विजेवर चालणाऱ्या उपकरणांची संख्या
वाढली, तेवढा विद्युतपुरवठा यंत्रणेवर ताण वाढला. हा ताण सहन करणारी सुरक्षित प्रणाली बसवण्याकडे आपला कल असायला हवा; पण सध्या तरी तो तसा नाही, म्हणूनच आपण होरपळतो आहोत.
प्रा. ट्रेव्हर क्लेट्स या जगप्रसिद्ध सुरक्षा विशेषज्ञाने ‘भविष्यात घडणारे अपघात यावर एक गमतीशीर सिद्धान्त मांडला आहे. त्यानुसार काही विशिष्ट अपघात नियमितपणे घडत आले आहेत, सध्या घडत आहेत आणि भविष्यातही घडत राहणार आहेत. कारण काय, तर त्यांच्या मूळ कारणांचे निराकरण कधी केले जात नाही. आग ‘लागल्यावर’ काय करायचे याबाबत विचार करण्यावर सतत भर दिला जातो. आणि त्या अनुषंगाने भरमसाट पैसाही खर्च केला जातो; पण आगीच्या ‘मूळ’ कारणांचे निदान करण्यास खरोखर तेवढा पैसा व प्रयत्न लागतच नाहीत. उदाहरण म्हणून आपण हृदयाची ‘बायपास’ शस्त्रक्रिया घेतली, तर त्यावर होणारा खर्च भरमसाट आहे; पण मधुमेह आणि रक्तवाहिन्यांतील अडथळे होऊ नयेत म्हणून काय करावे असे मार्गदर्शन करणाऱ्या, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था जवळपास अस्तित्वात नाहीत. प्रा. क्लेट्स यांनी ‘मूलभूत सुरक्षेबद्दल दुसरा सिद्धान्त मांडला आहे. या संकल्पनेनुसार प्रत्येक प्रकल्प-प्रणालीत तिच्या जन्मापासून जर सुरक्षेचा बारीकसारीक विचार करून आपण तो प्रकल्प उभारला, तर प्रत्यक्ष त्याच्या वापरादरम्यान होणाऱ्या दुर्घटनांमध्ये आश्चर्यकारक घट आढळून येते. उदाहरणार्थ: जर बहुमजली इमारतीमध्ये उत्कृष्ट डिझाइन केलेली आणि दर्जेदार भागांपासून बनवलेली (महाग असतील तरी) विद्युत्प्रणाली बसवली, तर तिच्या वापरादरम्यान तिथे होणाऱ्या अपघातांमध्ये लक्षणीय घट होणारच. पण याकडे प्रकल्प उभारणीच्या वेळी फारसे लक्ष दिले जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. गरोदर असलेल्या स्त्रीच्या गर्भातील बालकाची योग्य वाढ होण्यासाठी जी काळजी घेतली जाते, तसेच जन्माला आल्यापासून त्याच्या आहाराबरोबरच विविध लसी टोचून त्याचे जन्मभराकरिता वेगवेगळ्या आजारांपासून रक्षण केले जाते, त्याच्याशी या विद्युत्प्रणालीची तुलना करायला हवी.
नवीन इमारतींमध्ये काचांचा प्रमाणाबाहेर वापर:
सध्या व्यावसायिक वापराकरिता असलेल्या बहुमजली इमारतींमध्ये ‘काचांच्या भिंती’ उभारण्याचे पेव फुटले आहे. या बाबतीत असलेला अग्निशमन दलाचा नियम असा आहे, की काचांच्या भिंती असतील, तर त्यामधील ‘कमीतकमी’ पंधरा टक्के खिडक्या उघडता येणाऱ्या असायला हव्यात. आग लागल्यानंतर निर्माण झालेली उष्णता आणि धूर बाहेर निघून जायला उघड्या खिडक्यांमुळे मदत होते. बांधकामादरम्यान या नियमाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे झाली तरी प्रत्यक्ष वापरादरम्यान या खिडक्या ‘सील’ केल्या जातात. त्या पुन्हा उघडता येत नाहीत. अशी नियम धाब्यावर बसवण्याची तन्हा आहे. यामुळे आपण धोका पत्करतो आहोत हे त्यांच्या ध्यानीच नसते. नियमामागे काहीतरी कारण असणार याची शहानिशा न करता सार्वत्रिकरीत्या अशा उघडणाऱ्या खिडक्या ‘सील’ केल्या जातात असा अनुभव आहे. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करणे योग्य नव्हे. तेथील हवामान, तापमान यांची आपल्या देशातील हवामान, तापमान यांच्याशी तुलना करून मगच काही कृती योग्य/ अयोग्य ठरवायला हवी. आपल्याकडील एकूण तापमान लक्षात घेता ह्या काचांचा प्रमाणाबाहेरील वापर अनावश्यकच ठरतो.
याचबरोबर परदेशात ‘पंधरा टक्के खिडक्या या उघडणाऱ्या हव्यात’ या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाते. या नियमाची नंतरही सतत जाण ठेवली जाते. तसेच, इमारतीमधील अंतर्गत अग्निशमन यंत्रणा सतत कार्यक्षम ठेवलेली असते. याकरिता गरज पडेल तर बाहेरील तज्ज्ञांची मदत घेतली जाते. याचे आपण अनुकरण करतो का? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच आहे. कारण, लोटस बिझनेस पार्क किंवा तत्सम अन्य इमारतीमधील आग दुर्घटनांचे मूळ कारण म्हणजे ‘अंतर्गत अग्निशमन यंत्रणा’ अजिबात कार्यरत नव्हती. पण याबाबत कोणी फारसे बोलताना आढळत नाही हेही तितकेच खरे आहे. असे का व्हावे? यावर विचार करून योग्य कृती हवी. अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या!’
कोंडलेल्या धुराचे निराकरण:
बहुमजली इमारतीचे प्रमाण जसजसे वाढत गेले, तसतसे नवनवीन नियम येऊ लागले. अशा इमारतीसाठी अग्नी सुरक्षेचा आणखी एक मूलभूत नियम असे सांगतो, की मजल्यांतील अंतर्गत जिन्याला जोडणारा भाग आगीच्या वेळी स्वयंचलित अग्निरोधक दरवाज्यांच्या मदतीने आगीच्या वेळी बंद करण्याची प्रक्रिया कार्यक्षमतेने पार पडली पाहिजे. यामुळे जिन्याला आग व धूर यांपासून थोडा वेळ का होईना संरक्षण मिळावे, जेणे करून अडकलेल्या माणसांची सुटका करायला आणि मदत सामग्रीची हालचाल जलद करायला वेळ मिळतो. ही यंत्रणा बहुताश भारतीय बहुमजली इमारतींमध्ये ‘कार्यरतच’ नसते! सध्याच्या आगीच्या प्रकरणात अग्निशमन दलाचा एक जवान शहीद झाला आणि अन्य 20 जखमी झाले, त्याला आग आणि धूर यांपासून पुरेशा संरक्षणाचा अभाव हेच कारण आहे.
एअर डक्ट्समधील अग्निसुरक्षा:
बहुमजली इमारतीमध्ये अंतर्गत वातानुकूलन आणि वायुवीजन यासाठी सर्वत्र डक्ट्समधून हवा खेळवली जाते. ही हवा आग पसरण्यासाठी हातभार लावू शकते. या डक्ट्समध्ये अग्निसुरक्षेसाठी स्वयंचलित अग्निरोधक पडदे (फायर डॅम्पर्स) बसवले जातात. हे डॅम्पर्स ‘उष्णता व धूर’ यांचा लगेचच मागोवा घेणाऱ्या ‘हीट व स्मोक डिटेक्टर्स’ प्रणालीशी जोडले जाऊन कार्यरत होतात. त्यामुळे आग, उष्णता व धूर यांच्या वेगाने होऊ शकणाऱ्या फैलावाला वेसण घातली जाते. लोटस बिझनेस पार्कमधील एकविसाव्या – बाविसाव्या मजल्यांवरील आग अचानक तेराव्या मजल्यावर पोहोचली आणि त्यामुळे गोंधळात भर पडली. हे स्वयंचलित फायर डॅम्पर्स योग्य वेळी कार्यरत झाले नसतील अशी एक शक्यता आहे. याशिवाय, उंचीवर वेगाने वाहणारे वारे (तेपण पावसाळ्यात) आणि हेलिकॉप्टरच्या पंख्यामुळे येणारे वारे, यांमुळे आग फैलावण्यास मदत झाली असणार. पण या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्यच नव्हते.
अग्निशमन यंत्रणेची निगा आणि देखभाल:
इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेकडे अक्षम्य असे दुर्लक्ष केले जाते असे नाइलाजाने म्हणावेसे वाटते. प्रत्येक इमारतीमध्ये तिच्या आकाराप्रमाणे, त्यामधील मजल्यांप्रमाणे, तिथे असलेल्या वस्तीप्रमाणे अग्निशमन यंत्रणा बसवलेली असते. ते अनिवार्य आहे. पण ती एक शोभेची वस्तू बनून राहते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. देखभालीचे तीन प्रकार आहेत ते असे:
1) ‘ब्रेक डाउन मेन्टेनन्स’ ( बिघाडानंतरची देखभाल ),
2) ‘प्रिव्हेन्टिव्ह मेन्टेनन्स’ ( प्रतिबंधात्मक देखभाल ) व 3) ‘प्रेडिक्टिव्ह मेन्टेनन्स’ (भविष्यासाठी आगाऊ देखभाल ).
यांपैकी तिसऱ्या प्रकारच्या देखभालीत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने कुठल्याही यंत्रप्रणालीच्या बाबतीत त्याच्या निकामी होण्याच्या वेळेचा बराचसा अचूक अंदाज बांधता येतो. त्याप्रमाणे देखभालीबाबतचे वेळापत्रक आखता येते. ही पद्धत त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या उच्च तांत्रिक उपकरणांमुळे खूप खर्चिक ठरते. त्यामुळे याचा वापर मर्यादित प्रमाणात होतो.
दुसऱ्या प्रकारची देखभाल ही समजण्यास आणि वापरण्यास सोपी आहे. या प्रकारात प्रत्येक प्रणालीच्या देखभालीबाबतचा कार्यक्रम हा त्याच्या मूळ उत्पादकाने सांगितल्याबरहुकूम राबविणे आणि त्या वेळी येणारा दुरुस्तीचा, भाग बदलण्याचा खर्च, हात आखडता न घेता करणे आवश्यक आहे. हे काम अंतर्गत व्यवस्थेमधून नियमितपणे करणे शक्य
थर्मोग्राफी
थर्मोग्राफी या आधुनिक तंत्राचा वापर प्रगत देशात सर्रास होतो आहे. या तंत्रामध्ये एका आधुनिक इन्फ्रारेड कॅमेऱ्याने विद्युत उपकरणाच्या विविध भागांचे तापमान दाखवणारे छायाचित्र घेतले जाते. छायाचित्रातल्या लाल रंगाचे प्रमाण मर्यादेबाहेर असेल तर त्याचा अर्थ हा भाग जास्त आणि विनाकारण गरम होत आहे, हे लक्षात येते. विद्युत प्रणालीमध्ये निर्माण झालेल्या दोषामुळे हे झालेले असते. सदर दोष दूर केल्यावर ‘शॉर्टसर्किट’च्या कारणामुळे लागणाऱ्या आगीची शक्यता जवळजवळ नाहीशी होते. या तंत्राने तपासणी करून देणाऱ्या एजन्सीज भारतात उपलब्ध आहेत. औद्योगिक आस्थापनांप्रमाणेच बहुमजली इमारतींनी याचा उपयोग करायला हवा.
नसेल, तर ‘वार्षिक देखभाल करार करून एखाद्या योग्य व तंत्रकुशल कंपनीला देणे सयुक्तिक ठरते. या कराराचे नियमितपणे दरवर्षी नूतनीकरणही करायला हवे. यावर केलेला खर्च कितीही असला, तरी ‘धोक्यापासून सुरक्षितता’ ही महत्त्वाची आहे, हे नजरेआड करून चालणार नाही. पाश्चात्त्य देशांत ही पद्धत सर्रास अवलंबली जाते. आपल्या देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या आणि सुरक्षेबाबत सजग भारतीय कंपन्या (मोजक्या) या पद्धतीचा अवलंब करतात. यासाठी सक्षम असा एक पर्यवेक्षक नेमणेपण तितकेच गरजेचे आहे. त्याच्या पगारावरील खर्च म्हणजे सर्वांच्या सुरक्षिततेसाठीच खर्च, असा त्याचा अर्थ घ्यायला हवा. गुजरातीमधील एक म्हण येथे आठवते: ‘जेनू काम तेनू थाय, बिजा करे सो गोता खाय.’
वर उल्लेखलेल्या प्रकारांपैकी फक्त पहिल्या प्रकारची देखभाल आपल्याकडे केली जाते. उपकरण मोडले, बंद पडले, की मग त्याची दुरुस्ती करायची. प्रतिबंधात्मक देखभालीला नावे ठेवणारे लोक बहुसंख्येने आपल्याकडे आहेत. मोठ्या प्रमाणातील या लोकांमुळेच प्रतिबंधक देखभालीला दुय्यम स्थान मिळते आणि सर्वांनाच नुकसान सोसावे लागते. याची आपल्याला सवय झाली आहे किंवा या गोष्टी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. पण त्याची कुणाला खंत वाटत नाही, हीच खरी अडचण आहे. देखभालीबद्दलची अशी चालढकल आपल्या जिवावर बेतू शकते याकडे सर्रास दुर्लक्ष होते, ही दुर्दैवाची बाब आहे. आपल्या जीवनाची आपण किंमत ठेवत नाही असे म्हणावेसे वाटते, म्हणून अशा दुर्घटना घडतात. त्यावर चर्चा होते. मग कालांतराने त्या विसरल्या जातात. पुन्हा अशी दुर्घटना झाली, की चर्चा सुरू होते. कृती मात्र शून्य ! या घटनांपासून आपण काही धडा घेत नाही, शिकत नाही, तोपर्यंत हे असेच चालणार.
भाजलेल्या व्यक्तींचे उपचार करणाऱ्या ‘बर्न वॉर्ड्स’ चा तुटवडा:
आगीत भाजलेल्या व्यक्तीवर विशिष्ट, वेगळ्या प्रकारचे उपचार करावे लागतात. असे उपचार करणारे वॉर्ड वास्तविक प्रत्येक सार्वजनिक इस्पितळात असायला हवेत; पण ते नाहीत ही सद्य:स्थिती आहे. महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डात अशी सोय करायला हवी, तरच ताबडतोब योग्य उपचार उपलब्ध होतील. सध्याच्या परिस्थितीत, सगळ्या सार्वजनिक रुग्णालयांत ही व्यवस्था उभारायला हवी. मग टप्प्याटप्प्याने ते प्रमाण महापालिकेतील प्रत्येक वॉर्डला एक याप्रमाणे वाढवायला हवे. नाहीतर, अंधेरीतील आगीत जखमींना ऐरोली येथील रुग्णालयात पाठवले, या बातम्या येतच राहणार. त्यामुळे नुकसान होणार ते अपघातग्रस्तांचे. क्वचित हे सामान्यांच्या जिवावरही बेतू शकते, याचे भान ठेवायला हवे. देशाच्या आर्थिक राजधानीत ही परिस्थिती; तर इतर महानगरांत, जिल्ह्यांच्या ठिकाणी काय परिस्थिती असेल याची कल्पना करवत नाही. या दृष्टीने सुधारणा करणारी पावले उचलायला हवीत हेच खरे. या बर्न वॉर्डप्रमाणे ज्या-ज्या वॉर्डात बहुमजली इमारती आहेत, तिथे सर्वदूर मोठ्या उंचीच्या शिड्या ठेवणे गरजेचे आहे. रस्ता वाहतुकीचा अडथळा पार करून लांब अंतरावरून शिड्या पोहोचणे दुरापास्त आहे. याचा परामर्श पालिका/ शासकीय यंत्रणांनी घ्यायला हवा.
याविषयी लिहिण्यासारखे भरपूर आहे; पण तूर्तास एवढेच पुरे. या वेळी वर्तमानपत्रांनी आपली भूमिका – जनजागरणाची – चांगली पार पाडली. तसेच, योग्य मुद्दे उपस्थित करून कुठेकुठे त्रुटी आहेत, ‘चलता है’ ही वृत्ती घातक आहे, सरकारी यंत्रणेतील शिथिलता, आवश्यक उपकरणे, साधने यांची कमतरता सर्वांसमोर मांडण्याचे योग्य काम त्यांनी पार पाडले. यामुळे या दुर्घटनेपासून सर्वांनीच धडा घ्यायला हवा हे अधोरेखित झाले.
आधुनिक लाक्षागृहे?
महाभारतातील कौरव-पांडव द्वंद्वात एकदा कौरवांनी पांडवांना लाक्षागृहात पाठवून त्या लाक्षागृहाला आग लावून दिल्याचे आपण वाचले असेल. कौरवांचा हा बेत पांडवांना, त्यांच्या हितचिंतकांनी वेळीच दिलेल्या पूर्वसूचनांमुळे अगोदरच कळला. त्यामुळे पांडव आग लागण्यापूर्वी गुप्तपणे तिथून निघून गेले व त्यामुळे पुढील अनर्थ टळला. परंतु, आता काचांनी मढवलेल्या दिखाऊ, पण अग्निसुरक्षेच्या बाबतीत असलेले नियम धाब्यावर बसवणाच्या इमारती म्हणजे ‘आधुनिक लाक्षागृहे आहेत, असे म्हणावेसे वाटते. पण या लाक्षागृहांतून निसटायला, पळायला मार्ग मात्र नाही. आहेत ते जिने आणि पॅसेज रिकामे ठेवण्याऐवजी तिथेही सामान रचलेले असते.
लोटस बिझनेस पार्कसारखे किती अपघात झाल्यावर आपले डोळे उघडणार आहेत, माहीत नाही ! या अपघाताने होणारी आपली जीवितहानी आणि वित्तहानी थांबवणे आपल्याच हाती आहे. अग्निशमन यंत्रणेची योग्य देखभाल करणे, त्याचा वापर करून नेमाने चाचणी करणे, विद्युत सुरक्षेबाबत चांगली सतर्कता बाळगणे हे गरजेचे आहे. कारण आपली सुरक्षा ही आपल्याच हाती असते. मात्र त्यासाठी ‘केल्याने होत आहे रे! आधी केलेचि पाहिजे !’ |
-अभय गुजर
रिस्क मॅनेजमेंट कन्सल्टन्ट
abhay.gujar@bajajallianz.co.in
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख
Leave a Reply