अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. राम नेमाडे यांनी लिहिलेला हा लेख
जीवनाचा मार्ग सरळ नसतोच कधी. त्यात वेडीवाकडी वळणे, खाचखळगे असतातच. फुलांचे ताटवे फुललेले पाहावयाचेत ना मग त्यातून वाट काढण्याचीही तयारी ठेवावी लागते. प्रत्येक मोठा माणूस शून्यातूनच मोठा झालेला असतो. शून्याचा आकार लहान मोठा असू शकतो पण मूल्य त्याचे तेवढेच.
मोठेपण मिळते खरे पण त्यालाही मर्यादा असतातच. कधी ते अपेक्षेप्रमाणे मिळते, कधी ते अकल्पितही असते. माझ्यासारख्या अठराविश्वे दारिद्र्यात जन्मलेल्या व वाढलेल्या माणसाने प्रतिकूल परिस्थितीत घेतलेली झेप क्षणभर सुखावणारी असली तरी ती राणीमुंगीने वीण काढावी अशीच असते. ज्या क्षेत्रात आपण नावारूपाला येतो, तेही पुढे चाकोरीबद्धच ठरते. नाही का! रोज तेच ते!
मी शिक्षक झालो, प्राध्यापक झालो, आकाशवाणीतून व्यक्त झालो, दूरदर्शनवरही प्रगटलो. लोक म्हणतात नाव केलं असा मी त्यातला पहिला आहे का? कष्ट भोगले, हालअपेष्टा सहन केल्या, वादाच्या भोवऱ्यातही अडकलो पण ही कथा जवळ जवळ सर्वच ध्येयवादी माणसांची आहे. जे मी केले ते माझ्याहातून घडायचंच होते त्यात माझ्या कर्तृत्त्वापेक्षा प्रवाहपतीत्वाचाही भाग असेल. व्यवसाय आवडीचा होता. त्यात मी रमलोही पण संचिताचे संकेत काही वेगळेच होते.
माझं बालपण गरिबीत गेले हे मी सुरुवातीला सांगितलंच आहे. मी प्राथमिक शाळेत असतांना घरच्यांनी माझ्यावर एक जबाबदारी सोपवलेली असे. सकाळी शाळेत जाण्याआधी गोठ्यातील गाई गुरे गोठाणावर नेऊन उभी करायची. गावातली सगळी गुरेवासरे एकत्र जमली की गुराखी त्यांना जंगलवाटेने चरायला घेऊन जाई. गुराखी येईपर्यंत मी एका पत्र्याच्या गोडाऊनच्या भिंतीवर बोदवडच्या टुरिंग टॉकीजमध्ये सुरू असलेल्या सिनेमाची जाहिरात कोळसा, विटेचा तुकडा वापरून सुंदर अक्षरात चितारत असे. सिनेमा कोणत्याही प्रॉडक्शनचा असला तरी मी मात्र ‘आर एस एन’ प्रॉडक्शन प्रस्तुत असे मोठ्या अक्षरात लिहीत असे. रामा सोनाजी नेमाडे या माझ्या नावाची ही अद्याक्षरे होती. याचाच अर्थ असा की त्या बालवयात आपण भविष्यात सामाजिक, ऐतिहासिक आशयाचे सिनेमे काढू असे स्वप्न मी पाहात असे. सिनेमा बघायला पैसे होते कुठे? कसे बसे चार आणे गोळा करून एखाददुसरा सिनेमा पाहण्याची संधी मिळे. मग सिनेमा आवडला तर रोज जाऊन सिनेमाच्या कनातीजवळ उभं राहायचं. तिथून चित्र दिसत नसले तरी संवाद ऐकू येत, आधी सिनेमा पाहिलेला असल्याने संवादाबरोबर डोळ्यापुढे चित्रे उभी राहात. ‘देवता’ नावाचा सिनेमा मला खूप आवडला होता. सतत एक आठवडा मी ते संवाद ऐकले आणि गंमत म्हणजे सर्व पात्रांचे संवाद तोंड पाठ झाले. मग मी मराठी शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून मुलांना मनोरंजनासाठी ‘देवता’ सिनेमातील काही संवाद साभिनय म्हणून दाखविण्याची परवानगी मिळवली. माझे ते कार्यक्रम खूप गाजले. आठ दहा आण्यांची कमाईपण होऊ लागली. मग त्या पैशातून सुरु असलेल्या सिनेमाची गाणी असलेली छोटी पुस्तके मी मध्यंतरात गेटमनची परवानगी घेऊन विकू लागलो. पुस्तकाची किंमत एक आणा असायची. हौशी लोक विकत घ्यायचे. त्यातून काही पैसे सुटत.
मी त्याकाळी महादेवाच्या देवळात गावातील समवयस्क मुलांना घेऊन नाटक-नृत्याचा सराव करायचो. संवाद मीच लिहिलेले. गाणीही मीच लिहायचो. नृत्याचा सरावही केला होता. गावातील दिसायला सुंदर मुलांना मीच नृत्य शिकवत असे. पूर्वी नाटकात मुली काम करीत नसत. मुलांनाच स्त्रीपात्र करावे लागायचे. तमाशाचेही तसेच होते. तमाशात नाचे पोरचं असायचे. अर्थात हे रात्री कंदिलाच्या अथवा चांदण्याच्या प्रकाशात कार्यक्रम चालायचे. मात्र या कार्यक्रमांचा जन्म महादेवाच्या मंदिरात झाला. आणि शेवटही तिथेच झाला. जनता जनार्दनाच्या दरबारात त्यांची रूजवात झाली नाही. पुढे पोटाची खळगी भरण्यासाठी अल्पवयात कामाला लागलो. पुढे शिक्षणक्षेत्रात नावा रूपाला आलो. माझ्यातील कवी. नाटककार, सिनेमा प्रोड्युसर या सर्वांना अफूची गोळी देऊन गुंगीतच ठेवले. मधूनमधून त्यांना शुद्ध येते. पुन्हा नवा डोस देऊन झोपवून टाकतो.
आता आयुष्य मावळतीच्या उतरणीवर घसरगुंडीवर बसलं आहे. नेत्रही पैलतिरी लागले आहे. उरी मात्र अजूनही ह्या कलाविष्कारांची ज्योत धगधगते आहे. देव अजब गारुडी आहे. तो सर्व काही त्याच्या मर्जीनुसार करतो. तरीही नामानिराळा. म्हणून वाटते यालाही द्यावा गुंगारा आणि आयुष्याच्या या वळणावरही मनात राहून गेलेले ते सर्व काही करावे पण त्यासाठी कुणीतरी ‘देवता’ भेटायला हवा.
या नाटक, सिनेमाचे स्वप्न पाहता पाहता जीवनाचे नाटक झाले. हिरोतर होता आले नाही पण मनातल्या मनात विदूषक होऊन बसलो.
-डॉ. राम नेमाडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)
Leave a Reply