गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे.
अहोवा म्हणजे काय?
वर नमूद केल्याप्रमाणे अहोवा चा अर्थ स्पष्टच आहे. एखाद्या अनियोजित दुर्घटनेमध्ये कुणालाही इजा न होता, संपत्तीचे नुकसान होऊन किंवा न होता, अपघात होता-होता वाचतो. थोडी परिस्थिती आणखी बिघडती तर अपघात नक्कीच होऊ शकला असता एवढी त्या घटनेची क्षमता असते. अहोवा ची नेहमीची व्यवहारातील उदाहरणे म्हणजे v उंची वरील एखादी वस्तु काढताना ती खाली पडते. त्या वस्तूला वा पडलेल्या जागी कसलेच नुकसान होत नाही, काढणार्या किंवा आजूबाजूच्या कोणालाही कसलीच इजा होत नाही. v सफाईचे काम करताना ओलसर हात लागून कुठे तरी अचानक वीजेचा झटका बसतो. क्षणभर झिणझिण्या येऊन जातात, या पलिकडे काही होत नाही. v चालताना घसरून पडणे हेही नेहमीचेच. बरेच वेळा घसरणाऱ्याची विशेष दुखापत न होता सुटका होते.या साऱ्याच वरवर पाहता क्षुल्लक घटना. पण या प्रत्येकीत मोठ्या दुर्घटनेची नांदी (शहाण्यासाठी सूतोवाच) आहे. म्हणूनच सुरक्षिततेच्या महाजालामध्ये अहोवाचे खूप वरचे आणि अति महत्वाचे स्थान आहे आणि ते सकारणच आहे. असे असूनही जगातील बऱ्याच देशांमध्ये याला जेवढे महत्व, लक्ष मिळायला हवे तितके मिळत नाही.
अपघात आकडेवारी सांगते की प्रत्येक तीनशे अहोवा पाठी एकोणतीस छोटे अपघात आणि एक मोठा अपघात होतो. म्हणजे असे की, ३०० वेळा अहोवा कडे दुर्लक्ष केले तर २९ छोटे आणि एक मोठ्या अपघाताला आपण आमंत्रण देत असतो. याचा अर्थ असा की पहिल्याच अहोवाची योग्य दखल घेऊन त्याचा लगेचच योग्य प्रतिबंध केला म्हणजे मोठा अनर्थ टाळता येतो. हे सारे प्रतिबंधात्मक उपाय अहोवाच्या प्रकारानुसार आणि परिस्थितीनुरूप बदलतात.
एक खूप महत्त्वाचे म्हणजे कोणताही मोठा अपघात म्हणजे,
v प्रचंड खर्च, नुकसानी
v वेळेचा अपरिमित अपव्यय
v वेदना / व्यथांचा महापूर; याशिवाय
v नीति-धैर्य स्खलन वगैरे.
यातील व्यथा, वेदना, नीति-धैर्याचे खचणे याची मोजदादही होऊ शकत नाही.
अहोवा प्रतिबंध
हे सारे वाचविण्याचा एकच मार्ग म्हणजे अहोवाला योग्य ते महत्व देणे. याचाच अर्थ, असा एखादा प्रसंग घडला तर त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आवश्यक त्या साऱ्या गोष्टी अंमलात आणणे आणि तेही त्वरित, अगदी युद्ध पातळीवर. म्हणजे नेमके काय करायचे ?
१. अहोवा मागील मूळ कारणाचा शोध घ्यायचा.
२. ते मूळ कारण सापडल्या नंतर त्यावरील उपाय शोधायचा
३. तो उपाय अंमलात आणायचा. कागदावर ही कार्यवाही एवढी साधी वाटली तरी प्रत्यक्षात हे काम फारच जिकिरीचे, वेळ (सत्कारणी लागणारा)-खाऊ आहे हे मानायला हवे. यातील प्रत्येक पायरी पार पाडण्याचे शास्त्रोक्त मार्ग आहेत. जसे अहोवाचे मूळ कारण शोधण्यासाठी – ईशीकावा चित्र-पद्धत, 5-why analysis- पंच-कारण विश्लेषण पद्धत, RCA, CAPA वगैरे व्यावसायिक शास्त्रोक्त पद्धतींचा सर्रास वापर केला जातो. मूळ कारण शोधताना त्या कामातील खरे, संभाव्य धोके शोधण्यासाठी HIRA पद्धतींचा बहुधा उपयोग केला जातो. म्हणजे त्या कामातील धोक्यांवर आधीच सर्वंकष विचार करून त्याचा योग्य त्या उपायांनी चोख बंदोबस्त (शून्य धोका) करणे.
अहोवाची मानसिकता
कधी कधी असा विचार डोकावतो की ही एवढी मोठी कामाची यादी दिल्यावर कोण याच्या वाट्याला जाईल. अहोवाची तीव्रताही लक्ष द्यावी इतकी गंभीर नसते. याशिवाय भविष्यात होऊ शकणाऱ्या दुर्घटनेशी पूर्वी केलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा थेट संबंध जोडता येत नाही हीच नेमकी कारणे आहेत ज्यामुळे अहोवाला दुर्लक्षित केले जाते. थोडक्यात काहीतरी खूप मोठे अस्मानी अघटित होण्याची आपण वाट पाहतो. हीच मानसिकता या पाठी आहे असे मी मानतो. याला काय म्हणावे ? कोणत्याही मोठ्या नुकसानाचा, त्रासाचा आणि भावी ऱ्हासाचा या अशाच छोट्या प्रतिबंधात्मक उपायांनी अंत करता येतो हेच त्रिवार सत्य आहे, जे वारंवार सिद्धही झाले आहे. अनेक कारखान्यांमध्ये तर अहोवा झाल्याचे कित्येकदा व्यवस्थापनाला रीपोर्ट करणेही टाळले जाते. मग त्यासाठीच सर्वांना उत्तेजन द्यावे लागते –
म्हणजे मग त्यावर उपाय योजले जातात आणि भविष्यातील हानी टाळली जाऊ शकते. एक नक्की की, या भूतलावरील यच्चयावत अपघात, मानवजन्य घोर संकटे प्रत्यक्षात घडण्याच्या खूप आधी पासून कुठे तरी या अहोवा च्या रूपात आपल्याला वाकुल्या दाखवित असतात. गरज असते ती ते वेळेत ओळखून त्याचा (म्हणजे अहोवाचा) प्रतिबंध करण्याची. हाच तर अभिप्रेत अर्थ आहे – A stich in time, saves nine चा.
— राजेश कुलकर्णी
Leave a Reply