बहुतांश अंगांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा स्पर्श
रशियाचे पंतप्रधान पुटीन म्हणतात की जो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) एआय’) प्रगती करेल तोच पुढच्या दशकात जगावर राज्य करेल.कृत्रिम बुद्धिमत्तेची परिमाणे आता बदलत चालली असून, मानवाच्या आयुष्यातील बहुतांश अंगांना तिने स्पर्श केला आहे. हॉटेलमध्ये काय खावे, ऑनलाइन कोणती पुस्तके खरेदी करावीत, बॅंकेचे कर्ज नक्की किती मिळेल, विशिष्ट आजारासाठी कोणती उपचारपद्धती वापरावी अशा सर्वच सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. यामध्ये मानवी आयुष्य सुखकर करण्याची क्षमता असल्याचे गेल्या काही वर्षांत सिद्ध झाले आहे. या गोष्टींची यादी वाढतच जाणार असून, त्यासाठी गुंतागुंतीच्या सॉफ्टवेअर्सचा वापरही वाढणार आहे. त्यामुळेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित “स्टार्ट अप’ कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही होते आहे. त्याच्या जोडीला “अमेझॉन’, “फेसबुक’, “मायक्रोसॉफ्ट’सारख्या बड्या कंपन्यांनी या विषयातील संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे इंटरनेटमुळे झालेल्या क्रांतीपेक्षाही मोठी क्रांती होईल, असा अंदाज बांधला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुगल ट्रान्सलेटची सेवा भाषांतराचे काम करत आहे. गेल्या वर्षीपासून या सेवेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे. पूर्वी या सेवेत एक शब्द किंवा वाक्प्रचार भाषांतरित व्हायचा; मात्र आता संपूर्ण वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन भाषांतर करण्यात येते. त्यामुळे ‘गुगल ट्रान्स्लेट’मध्ये भाषांतराची पातळी ९० टक्के अचूकतेपर्यंत पोहोचली आहे.
याशिवाय व्हॉइस टायपिंग नावाच्या पद्धतीने आपण गुगलच्या मायक्रोफोन मध्ये मराठी मध्ये बोलुन त्याचे रूपांतर हे मराठी टायपिंग मध्ये करू शकतो. यामुळे कामाचा वेग खूपच वाढतो. कारण एक सामान्य व्यक्ती एका मिनिटांमध्ये 20 ते 30 शब्द टाईप करू शकतो मात्र आपण जर डिक्टेट केले तर याचा वेग हा तिप्पट होऊ शकतो.या यंत्रणेची खुबी अशी, की जसजसा वापर वाढेल तसतसे तिचे ‘ज्ञान’ वाढते. म्हणजे चुका सुधारतात, योग्य शब्द ती लक्षात ठेवू लागते आणि भाषांतरात अचूकता येते. मुख्य म्हणजे ‘गुगल ट्रान्स्लेट’सारख्या सुविधा वापरून आपल्या ज्ञानाची भर त्यात घालू शकतो.
काय आहे कृत्रिम बुद्धिमत्ता?
कृत्रिम वस्तूने केलेल्या बुद्धिमान वर्तनास ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अथवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सी’ असे म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. मुख्यत: स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांची निर्मिती यातून केली जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता असणार्या प्रणाली, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स (बुद्धिबळ इत्यादी) आणि संगणक प्रणाली यामध्ये वापरल्या जातात.
महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना हाती
भविष्यातील युद्धासाठी अत्याधुनिक साधनांसह भारतीय सेना सज्ज होत असून, त्यासाठी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी संरक्षण योजना हाती घेण्यात आली. एका महत्त्वाकांक्षी योजनेत केंद्र सरकारने सशस्त्र दलात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) समावेश करण्याचे काम सुरु केले आहे. यात मानवरहित टँक, जहाज, विमाने व रोबो हत्यारांचा समावेश असेल. नव्या पिढीच्या युद्धासाठी सज्जतेच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल.
तिन्ही दलानी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर लक्ष केंद्रित केले आहे. भविष्यातील युद्धांसाठी हे आवश्यकच आहे. त्यांनी यासाठी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय टास्क फोर्स योजनेला अंतिम स्वरुप दिले जात आहे. सशस्त्र दल व खासगी क्षेत्रात एक मॉडेल म्हणून ते लागू केले जाईल. कुमार यांनी माहिती दिली की, नव्या पिढीच्या युद्धाची तयारी करताना तांत्रिक बाबी, स्वयंचलित आणि रोबोटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अन्य जागतिक शक्तींप्रमाणेच भारताकडूनही मानवरहित हवाई वाहने, मानवरहित जहाजे, मानवरहित रणगाडे, स्वयंचलित रोबो रायफलचा वापर केला जाईल.
कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजेन्सी अर्थात एआय) प्रणालीचा वापर करून शस्त्रास्त्रे तयार केली जाणार आहेत. आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर करण्यासाठी चीनने प्रचंड मोठी गुंतवणूक करण्यास प्रारंभ केला असून, भारतही आता तसूभरही मागे राहणार नाही. ही योजना लष्कर, हवाई दल आणि नौसेनेसाठीही राबवली जाणार आहे.
बड्या देशांत आधीच सुरुवात
चीन व पाकिस्तानच्या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी एआयचा उपयोग झाल्यास या सीमांवर संरक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांवरील दबाव कमी होऊ शकतो. चीन एआय तंत्रज्ञानासाठी अब्जावधी डॉलर खर्च करत आहे. त्यांची २०३० पर्यंत एक केंद्र स्थापन करण्याची महत्वाकांक्षी योजना आहे. चीनने आपल्या लष्करात ‘एआय’चा वापर सुरू करण्यासाठी संशोधन सुरू केले असून, त्यावर अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली आहे. 2030 पर्यंत चीनला ‘एआय’संबंधीचे जगातील प्रमुख केंद्र बनवण्याची योजना चीनने आखली आहे.अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि यूरोपीय संघ एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत.
‘एआय’च्या वापराचा फायदा
चीन आणि पाकच्या सीमेवर निगराणीसाठी ‘एआय’चा वापर केल्यास तेथील जवानांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. छोट्या छोट्या मोहिमांमधील यशासाठीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो.
अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आदी देश ‘एआय’मधील गुंतवणुकीत कितीतरी पुढे निघून गेले आहेत. मानवविरहित ड्रोनच्या मदतीने अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या गुप्त ठिकाणांचा शोध लावून ती उद्ध्वस्त केली आहेत. मानवविरहित ड्रोनही ‘एआय’च्या मदतीनेच काम करते.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचा (डीआरडीओ) या सगळ्या योजनेत महत्त्वाचा सहभाग असणार आहे. देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाचा पाया चांगलाच मजबूत असून, त्याचाही फायदा या योजनेत होणार आहे. ‘एआय’संबंधी क्षमता वाढवण्यासाठी माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे.
भारताच्या विकासामध्ये एआयची प्रमुख भूमिका
भारताविषयी बोलयचे तर एआय केवळ स्मार्ट डिवायस विकसित करण्यातच प्रमुख भूमिका निभावत आहे, असे नाही तर सरकार व कॉरपोरेट क्षेत्र दोन्हीमध्ये ग्राहकांना चांगली सेवा देण्यात महत्वपूर्ण काम करत आहे. भारतीय रेल्वे सिग्लन फेल होण्याची शक्यता संपविण्यासाठी एआयच्या मदतीने रिमोट कंट्रोल मॉनिटरिंगचा प्रयोग सुरू आहे. यामध्ये एआयच्या माध्यमातून सिग्नल यंत्रणा खराब होण्याचा धोका आधीच संबंधित यंत्रणेला कळवले जाते. भारतातील अनेक पतसंस्थांनी आपल्या कामकाजात एआयचा प्रयोग सुरू केला आहे. एआयच्या मदतीने बँक चॅटबॉटचे निर्माण करत आहेत. जे ग्राहकांशी संवाद साधतात व माहिती संकलित करण्यास सहाय्यक आहेत.
एचडीएफसी बँकेने बंगळुरूची कंपनी सेंसफोर्थ एआय रिसर्चच्या मदतीने मार्च महिन्यात लाँचिंग केल्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वर आधारित रोबोट ‘इव्हा’ चे का निर्माण केले होते. इव्हाने आतापर्यंत ५,३०,००० यूनिक यूजर्सबरोबर १२ लाखाहून अधिकवेळा संवाद केले असून जवळपास २७ लाख चौकशींचे मोठ्या सहजतेने उत्तर दिले आहे.
नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील
या विषयावरील एका अहवालानुसार, जगभरातील साडेसात कोटी ते साडेसदतीस कोटी लोकांना सन २०३०पर्यंत आपल्या कामांत नवी कौशल्ये आत्मसात करावी लागतील.डिजिटायझेशन, ऑटोमेशन, एआयसारख्या क्षेत्रांत मनुष्यबळ लागेल.
हे सगळे बदल होत असताना, नव्या तंत्रज्ञानानुरूप आपल्याला आपल्या कामात काही मूलभूत बदल करावे लागतील. त्यासाठी आपण तयार असले पाहिजे. तसे तयार असू आणि नवी कौशल्ये शिकण्याची तयारी असेल, तरच आपण टिकू शकू, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की ‘एआय’सारख्या तंत्रज्ञानाला स्वत:ची ‘अक्कल’ असली, तरी मूलभूत शहाणपण किंवा कॉमन सेन्स नाही. त्याचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करून घेण्यासाठी त्याला सामाजिक, सांस्कृतिक आणि कायदेशीर चौकटीत बसवणे गरजेचे आहे. ‘एक्स्प्लनेबल एआय’ हे आणखी एक पुढचे पाऊल याच दिशेने पडले आहे. या बदलांना कवेत घेण्यासाठी आपणही तयार राहणे गरजेचे आहे.
भावी पिढीतील युद्धात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. भविष्यात एखादे मोठे युद्ध झाले, तर त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचा वापर अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचदृष्टीने आता भारतीय लष्कराने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे.
-ब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply