मध्यरात्री साधारण दीडच्या सुमारास आरूला कसल्याशा आवाजाने जाग आली. क्षणभर तिला कळेचना की आपण कुठे झोपलो आहोत. जरा जागी झाल्यावर तिच्या लक्षात आले की, आपण वाड्यावर आलो आहोत. ती उठून बसली आणि कानोसा घेऊ लागली……… थोडावेळ शांतता पसरली आणि पुन्हा तिला तो आवाज ऐकू आला….. तिची दी झोपेमध्ये थरथरत बडबडत होती…. तिच्या चेहेऱ्यावर राग, द्वेष, कमालीचा संताप दिसत होता……. दांत ओठ खात ती त्वेषाने पण थांबत थांबत बोलत होती…… “नीच माणसा…….तू माझ्या प्रेमाचा अपमान केलास ……. तुला काय वाटले ? तू असा वागशील आणि मी तुला अशीच सोडून देईन? ….. हा sss हाsss हा sss …….नाही ……. कधीच नाही ……. तू केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तुला भोगावीच लागेल…….जर तू माझा होऊ शकत नसशील तर दुसऱ्या कुणाचाही होण्याचा अधिकार तुला नाही ……. हो आता शिक्षा भोगायला तयार …….” काही सेकंद शांतता पसरली आणि दी जोरात किंचाळली…. आता ती पुन्हा भेसूर हसत होती…..हा sss हाsss हा sss …..“तुला शिक्षा मिळणारच …..” असं ती वारंवार मोठ्याने बोलत होती.
दीचं हे विचित्र रूप पाहून आरू आतून भयंकर घाबरली….. तिला सुचेना की आता काय करावे….. आधी ती भीतीने पलंगावरून उतरून लांब उभी राहिली….. दी अजून काही बोलते का ते ऐकण्याचा ती प्रयत्न करू लागली…..दीला झोपेतून जागे करावे, तर आरूला तिच्या जवळ जायची भीती वाटत होती…. कारण दीचे असे भयंकर रूप ती प्रथमच पाहत होती…… दी स्वतःच जागी होईल तर बरं असा ती विचार करत होती…. एवढ्यात त्यांच्या रूमच्या दारावर थाप पडली…. आरू अजूनच घाबरली…. खरंतर ती इतक्यांदा या वाड्यावर येऊन राहिलेली होती, पण या वाड्याची तिला कधीच भीती वाटली नव्हती किंवा असा भीतीदायक अनुभवपण कधीच आला नव्हता….. पण आत्ताच्या एकंदर प्रकारामुळे ती मनातून भयंकर घाबरली असल्याने आधी दीला जागे करावे की आधी दार उघडावे हेच तिला सुचेना…दारावर पुन्हा जोरजोरात थापा पडू लागल्या….शेवटी नाईलाजाने भीतभीतच ती दारापाशी गेली आणि तिने दार उघडले…. दारात नील उभा होता….
त्याला पाहताच ती एकदम त्याच्या मिठीत शिरली….. भीतीने ती थरथर कांपत होती… नीलने तिला हलकेच थोपटले…. तो थोडावेळ तिला थोपटत राहिला…. ती थोडी शांत झाल्यावर त्याने हळूच तिला मिठीतुन बाजूला केले आणि विचारले, “आरू, तुला काही झाले का? कशाला घाबरलीस तू? मला तुमच्या खोलीतून रागाने बोलल्याचे आणि ओरडल्याचे आवाज आले…. म्हणून मी पाहायला आलो…. काय झाले मला सांगशील का?”
आरूने घाबरतच दीकडे बोट दाखवले…. दी अजूनही पलंगावर थरथरत पडलेली होती….. आणि तोंडातून परत परत “नीच माणसा….. भोग आपल्या कर्माची फळं” असं बडबडत पलंगावर हात आपटत होती….. तिचा चेहेरा रागाने लाल झाला होता…. नीलने आरूला पलंगाच्या बाजूला थांबवले आणि पटकन टेबलावर ठेवलेला पाण्याचा जार घेववून त्यातील थोडे पाणी त्याने सप्पकन दीच्या तोंडावर मारले…. पाण्याचा सपकारा तोंडावर पडताच दी एकदम उठून बसली…… ती अजूनही रागाने थरथरत होती…..
आरू धावत दीच्या जवळ गेली…. तिने दीला पटकन आपल्या जवळ घेतले आणि ती तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली…… “दीsss … दीsss अगं काय झाले तुला?…… कशानं घाबरलीस तू?……बरं वाटत नाहीये का तुला?……का एखादं भितीदायक स्वप्न पडलं?…… बोल ना काहीतरी ……बरं नको सांगुस……पण तू आधी शांत हो बघु…… दीsss, अगं ऐक ना…..मी आहे ना तुझ्याजवळ?……. घाबरू नकोस…… शांत हो….. शांत हो……”
दीने आरूला गच्च पकडून ठेवले होते. ती अजूनही थरथरत होती. थंडीचे दिवस असूनही दीला दरदरून घाम आला होता.
तेवढ्यात नीलने भांड्यातून पाणी ओतून ते आरुकडे दिले…. आरूने दीला थोडंथोडं पाणी पाजले …… हळूहळु दी शांत झाली.
नील म्हणाला, “आरू…..तू थांब तिच्याच जवळ…..मी इथे खुर्चीतच बसतो तुमच्या सोबत….. तिला आत्ता तू काहीच प्रश्न विचारू नकोस….. ती आत्ता कसलीच उत्तर देण्याच्या मनःस्थितीत नाहीये…. तिला आता शांत होवू दे… तुम्ही दोघी झोपा आता…. आपण उद्या बोलू काय ते….”
नीलने खोलीचे दार बंद करून घेतले आणि तो खुर्चीतच झोपला. तो आरुकडे कौतुकाने बघत होता. इतर वेळी अल्लड असलेलं हे कोकरू, थोड्या वेळापूर्वी अचानक घडलेल्या त्या प्रसंगाने केवढं भेदरून गेलं होतं, आणि आत्ता, या क्षणी एकदम मोठं होऊन, दीची आई बनून, तिची काळजी घेत होतं.
आरूनं दीला परत थोडे पाणी प्यायला दिले आणि तिला पलंगावर व्यवस्थित झोपवले. तिला नीट पांघरून घातले…. आणि ती दीला डोक्यावर हलके हलके थोपटत राहिली….. हळुहळू दी शांतपणे झोपी गेली. दीला झोप लागल्याची खात्री पटल्यावर हळुच आरू पलंगावरून उठली. खुर्चीवर झोपलेल्या नीलच्या अंगावर तिने शाल पांघरली. नील तिच्याकडे पाहताच होता… आरू हलकेच त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, “नील, थँक यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग. तू आत्ता माझ्या सोबत नसतास तर मी काय केले असते कोणास ठावूक? मी खरंच खूप घाबरून गेले होते.”
“थँक्स काय त्यात? तुमची काळजी वाटली म्हणूनच तर मी धावत आलो. पण तूही आज खूप जबाबदारीने वागलीस. ब्रेव्ह गर्ल. जा, आता शांतपणे झोप जा. काही लागलं तर मी आहे सोबत. Good Night.”
नील आणि आरू, दोघंही एकाच गोष्टीचा विचार करत झोपी गेले की, दीला नक्की काय झालं होतं म्हणून ती अशी बडबडत होती?
सकाळी सगळे थोडे उशिराच उठले….कालच्या प्रवासाने दमले असतील म्हणून हौसाबाईंनी त्यांना लवकर उठवले नाही…..थोडा वेळाने तयार होऊन सगळे डायनींग टेबलवर चहासाठी जमले…..
नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?”
दोघेही एकदम चपापले. आरू सावरून म्हणाली, “कांही नाही गं दी…. सहजच…..दीss, तुला रात्री शांत झोप लागली होती ना? …. म्हणजे आता बरं वाटतंय ना तुला?”
दी परत हसली, “अगं, झोप न लागायला काय झालं? मला तर मस्त झोप लागली होती. आणि माझ्या तब्बेतीला काय झालंय? गांवी आल्यावर तर मी खूषच असते. त्यातून यावेळी आपल्या सोबत नील आला आहे ना, त्यामुळे तर मला खूपच उत्साह आलाय. आज आपल्याला वेगवेगळ्या लोकेशन्स वर जायचंय नं नवीन पेन्टिंग काढायला? मग? जावूया आपण… पण काय गं…. काल तुला लागली नाही का नीट झोप?”
“हो, मलापण चांगली झोप लागली…. पण तुझा चेहेरा जरा ओढल्यासारखा दिसतोय म्हणून मी विचारलं…. ”
“नाही गं….. तसं काही नाही….मी एकदम फ्रेश मूड मध्ये आहे…..तुमचा चहा नाष्टा झाला की लगेच बाहेर पडू आपण…. मी तोपर्यंत माझे पैंटिंग्जचे साहित्य घेऊन येते.”
“ओके दी…. आपण निघु थोड्या वेळात….. ”
दी तयार होण्यासाठी आणि पेन्टींगचे साहित्य आणण्यासाठी वर निघून गेली.
नील म्हणाला, “आरू, हिला खरंच काल रात्रीचं काही आठवत नाहीये, की ती आपल्याला आठवत नसल्याचं दाखवतीय ते मला काळत नाहीये. पण हा विषय काढून तिला त्रास होणार असेल तर आपण या विषयावर परत नको बोलूया. दुसरी गोष्ट म्हणजे, आपण बाहेर फिरायला गेल्यावर मधेच जरा वेळ मिळाला तर मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे.”
“कशाबद्दल?”
“तुझ्या दीच्या संदर्भात, कालच्या रात्रीच्या प्रसंगापासून मला तिची वेगळीच काळजी वाटायला लागलीय. आपण तिला विचारलं तर ती काही सांगेल, असं मला तरी वाटत नाही. पण मला तिच्या गत आयुष्याबद्दल तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे, पण हे सगळे आपण तिच्या समोर नाही बोलायचंय.”
“ठीक आहे. नंतर वेळ मिळाला कि बोलू आपण. चल, तू पण आवर तुझं. मी पण माझं आवरून येतो. मग निघू आपण.”
थोड्याच वेळात सोबत थोडं खाण्यापिण्याचं साहित्य घेऊन आणि दीच्या चित्रं काढण्याच्या साहित्यासह नीलच्या गाडीतून तिघेही बाहेर पडले.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply