दुसऱ्या दिवशी सकाळी, चहा नाष्टा झाल्यावर सगळ्यांनी गढीवर जायचे ठरले. वाटेत मॅनेजर केळकर आणि गढीतील विहीर बुजवायचे काम करणारा कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यासोबत गढीवर येणार होता. ठरल्याप्रमाणे वाड्यावरून निघताना दीने केळकरांना फोन करून मंदिराच्या पायथ्याशी थांबण्यास सांगितले. थोड्याच वेळात ते पायथ्याशी पोहोचले. केळकर दुसरी गाडी घेवून आले होतेच. मग सगळेजण बरोबर गढीच्या दिशेने निघाले. आरूला आणि नीलला कधी एकदा गढीपाशी जातो असे झाले होते. थोड्याच वेळात ते सगळे गढीच्या मुख्य दरवाजापाशी येऊन पोहोचले. लांबून पाहून गढी किती मोठ्ठी असेल याचा काहीच अंदाज आला नव्हता. पण मुख्य दार आणि बाजूची तटबंदी पाहिल्यावर गढीची भव्यता नजरेत मावत नव्हती. भिंतीच्या टोकाला दोन्ही बाजूला मोट्ठे भक्कम ३५ ते ४० फूट उंचीचे बुरूज होते. गढीची दर्शनी भिंत आणि बुरूज यांचे २० फुटा पर्यंतचे बांधकाम दगडी होते आणि त्यावर उरलेले बांधकाम विटातील केलेले दिसत होते. गढीच्या तटबंदीवर आणि बुरुजावरील सज्जात बंदुकी ठेवायला केलेल्या जंग्या दिसत होत्या. काही ठिकाणी कोनाडे दिसत होते. तटबंदीच्या कपारींमधून लहान मोठी झुडुपे डोकावत होती.
नीलने आपला कॅमेरा काढून पटापट वेगवेगळ्या अँगलने गढीच्या दर्शनी भागाचे फोटो काढले. गढीचा दरवाजा खूप मोठ्ठा, मजबूत आणि शिसवी लाकडाचा होता. त्यावर सुंदर नक्षीकाम केले होते. दरवाजावर ठिकठिकाणी पितळेच्या टोकदार चकत्या लावलेल्या दिसत होत्या. त्यांना मोठाले टोकदार खिळे होते.
नीलने विचारले, “लता, या दरवाज्यावर ह्या टोकदार खिळे असलेल्या पितळी चकत्या का लावल्या आहेत?”
केळकर काका म्हणाले, “बरं का मुलांनो, युद्धाचा प्रसंगी हा मुख्य दरवाजा आतून बंद करून घेतलेला असे. त्याला आतूनही खूप मोटमोठ्ठे अडसर लावलेले असतात. वर सज्जावर असणाऱ्या जंग्यांमधून बंदुकी आणि बाणांच्या साहाय्याने शत्रूला गढी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. पण जर दुर्दैवाने शत्रू दरवाजापर्यंत पोहोचलाच तर कितीही माणसांची ताकद लावली तर तो उघडणे शक्य होत नसे. अशा वेळी हत्तींना दरवाज्यावर धडक मारण्यासाठी घेऊन येत असत. हत्तीच्या ताकदीपुढे लाकडाचे दरवाजे टिकणे अवघड असे. म्हणून दारांवर अशा पितळेच्या टोकदार चकत्या बसवलेल्या असत. त्या टोकदार चकत्यांमुळे हत्ती दारावर धडाका मारू शकत नाहीत आणि दार सुरक्षित राहते.”
बोलत बोलत ते मुख्य दरवाजाला एक छोटा दिंडी दरवाजाही होता, त्यापाशी आले. त्याला कुलूप लावलेले दिसत होते.
आरू म्हणाली, “काका, हा छोटा दरवाजा कशासाठी आहे?”
काका म्हणाले, “अगं, याला ‘दिंडी दरवाजा’ म्हणतात. पूर्वी मोठमोठे सण समारंभ, बाजार भरण्याचा दिवस, उत्सवाचे दिवस किंवा स्वारीसाठी सैन्य घेऊन बाहेर जायचे असेल, अशा वेळीच हे दोन्ही दरवाजे उघडलेले असत. ईतरवेळी जा ये करण्यासाठी या ‘दिंडी दरवाजाचा’ वापर केला जात असे. या दरवाजाच्या आत आणि बाहेर पहारेकरी असत. ते गढीत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नीट चौकशी करून मगच त्यांना आंत सोडत असत.”
मॅनेजर साहेबांनी त्यांच्याकडील किल्लीने ते कुलूप उघडले आणि सगळ्यांनी गढीत प्रवेश केला.
आत गेल्यावर त्यांनी चारी दिशांना फिरून पाहिले तर खूप ऐसपैस जागा पसरली होती. दर्शनी भागात होती त्याप्रमाणेच चारी बाजूंनी उंच तटबंदी आणि चारी कोपर्यात बुरूज दिसत होते. प्रत्येक बुरूजावर जाण्यासाठी आतून दगडी पायऱ्या असलेले जिने होते. आत दगडमाती मध्ये बांधलेली अनेक बैठी कौलारू घरे व दुमजली इमारती दिसत होत्या. बहुतेक घरांची बरीच पडझड झालेली दिसत होती. काही ठिकाणी घरांची फक्त जोतीच शिल्लक दिसत होती. सगळीकडे गवत माजले होते आणि ते वाळून गेले होते. अधूनमधून काही छोटी मोठी हिरवीगार झाडे तेवढी उठून दिसत होती. या सगळ्या गोष्टी पाहून, ह्या गढीत जेव्हा माणसे राहात होती तेव्हा ती किती वैभवसंपन्न असेल याची कल्पना येत होती.
बाकी पडक्या घरांमधून फिरत फिरत, वाट काढत सगळे एका मोठ्या महालासमोर येऊन उभे राहिले. हा महाल गढीच्या अगदी मागील तटबंदीच्या जवळ बांधलेला होता. या महालाचीही पडझड झालेली दिसत होती. पूर्वी हा किती सुंदर दिसत असेल याची आरू मनातल्या मनात कल्पना करत उभी होती. केळकर साहेबांनी माहिती द्यायला सुरूवात केली.
“आपण उभे आहोत त्यासमोर महालाचे मुख्य दार आहे. तिथून आत गेल्यावर अनेक दालनं आहेत. आणि त्यानंतर विहिरीकडे जाण्याचा मार्ग आहे. हा महाल एकूण तीन मजले जमिनीच्या वर आहे आणि तीन मजले जमिनीच्या खाली. खालील भागात जाण्यासाठी फक्त एकाच बाजूने पायऱ्या केलेल्या आहेत. विहिरीची डागडुजी करणे, शेवाळ किंवा झुडुपे उगवली तर ती कापणे, विहिरीची साफसफाई करून घेणे या कामासाठी या पायऱ्यांचा उपयोग केला जाता असे. पण कालांतराने या पायऱ्या बुजून गेल्या.
सगळीजणं विहीरीच्या कठड्यांपाशी थांबून विहीरीत डोकावून पहात होते. पण विहीरीच्या आतील बाजूनेही अनेक लहानमोठी झुडपे उगवली होती, ती एकमेकांत गुंफली गेली होती. काठाच्या बाजूने वाळलेले गवतही दिसत होते. पण विहीरीतील पाणी दृष्टीस पडत नव्हते इतके ते खोल गेले होते. त्यामुळे विहिरीत झुडुपांच्या आडून फक्त खोल गेलेला काळोखच दिसत होता. नंतर मग महालातील आतील बाजूस असलेल्या जिन्यावरून सगळे एक एक मजला चढत महालाच्या छतावर पोहोचले. महाल जरी बाहेरून पडझड झालेला दिसत असला तरी आतील दालने चांगल्या अवस्थेत होती. काही ठिकाणचे कठडे, खिडक्या, दारे यांची मात्र दुरावस्था झालेली दिसत होती. पूर्वी प्रत्येक मजल्यावरून एक एक रहाट विहिरीतील पाणी काढण्यासाठी बांधलेला होता, त्याचेपण अवशेषच दिसत होते.
शेवटी सगळे महालाच्या छतावर येवून पोहोचले. छतावरून पूर्ण गढीचा परिसर पाहता येत होता, तसेच एकाच वेळी चारी बुरूजांवर काय चालले आहे हे पाहता येत होते. महालाच्या बाजूला असलेल्या तटबंदी पलीकडून नदी वाहताना दिसत होती. या नदीमुळेच महालातील विहिरीला बारा महिने पाण्याचे झरे वाहत असत आणि विहीर भरलेली रहात असे.
या महालाच्या छतावरून मागील बाजूस असलेल्या एका बुरूजापर्यंत जाण्यासाठी एक पूल बांधण्यात आलेला होता. आरू आणि नील तो पाहून आश्चर्यचकित झाले. कारण खालून महालाकडे पाहताना हा पूल सहज दृष्टीस पडत नव्हता. पुलाच्या दोन्ही बाजूंना, महालाच्या बाजूने आणि बुरुजाच्या तटबंदीला पूल जिथे जोडला जात होता, अशा दोन्ही ठिकाणी सुंदर कमानी बांधलेल्या होत्या. संपूर्ण पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे बांधले होते. ते अजूनही शाबूत होते. महालाच्या छतावरील सर्व बाजूंनी कठडे बांधलेले होते. त्यांची पडझड झालेली होती. कमानीवरून अनेक प्रकारचे वेळ पसरले होते. त्यामुळे महालाच्या छतावर किंवा तटबंदीवर कोण उभे असेल तर पटकन दिसत नव्हते.
पूर्वजांच्या कल्पकतेची आणि हुशारीची चुणूक पाहून सगळेच भारावून गेले होते. छतावरून विहीर कशी दिसते हे आरूला पहायचे होते. पण विहरीच्या बाजूला असलेले महालाच्या छतावरील कठडे बऱ्याच ठिकाणी हे कोसळलेले होते. एकदोन ठिकाणी कठड्यांच्या जीर्ण भिंती शाबूत होत्या पण त्या केव्हा कोसळतील याचा काही नेम नव्हता.
आरू पहात होती की, ते या महालात आल्यापासून आणि छतावर पोहोचल्यापासून तिची दी खूप अस्वस्थ झाली होती. केळकर आणि कॉन्ट्रॅक्टर तिला विहीर बुजवण्याचे काम कशा पद्धतीनं करण्याचा प्लान केला आहे हे समजावून सांगत होते पण त्याकडे दीचे लक्ष नव्हते. थोडक्यात प्लॅन ऐकून, ती ‘परत जायला निघूया’ म्हणाली.
अजून एक गोष्ट आरूच्या लक्षात आली की, या महालात आल्यापासून नील कशाच्या तरी शोधात असल्यासारखं प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होता. मधून मधून काही फोटो काढत होता. थांबून थांबून काही ना काही विचारात गर्क होत होता आणि मग पुढं जात होता.
खरंतर आरू आणि नीलला हा परिसर खूपच आवडला होता. तिथून निघून जावे असे त्यांना अजिबात वाटत नव्हते. पण दी त्यांना सारखे ‘चला, चला’ करत होती. त्यांना जसा तिथे वेळ लागत होता तसा तिचा अस्थस्थपणा सारखा वाढत होता. शेवटी नीलच आरूला म्हणला की, “आपण आता खरंच निघूया.”
जाताना महालाच्या पायर्या उतरुन जाण्याऐवजी बुरूजाला जोडलेल्या छोट्या पूलावरून ते बुरूजावर पोहोचले. बुरूजाला असलेल्या लहान लहान कोनाड्यातून बाहेरचा परिसर फार सुंदर दिसत होता. तिथेही नीलने खूप सारे फोटो काढले.
ते परत जायला निघाले. केळकर म्हणाले, “बरं का मुलांनो, आपण आता ज्या तटबंदीच्या भिंतीजवळून चाललो आहोतना, हा रस्ता संपूर्ण तटबंदीवर फिरून परत इथेच येवून मिळतो. कोणत्याही बुरूजावरून तुम्ही या महालात पोहोचू शकता. इतरवेळी प्रवेशद्वारापासून ते महालापर्यंतचे अंतर बरेच आहे. मधली घरे, झाडे झुडपे ओलांडून इथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. पण या रस्ताने तुम्ही लवकर महालाच्या छतावर पोहोचता.”
नील म्हणला, “अरे व्वा, किती छान आयडिया वापरलीय ना? मला खरं तर इथे रोज यायला आवडले असते. गढी जुनी झाली असली तरी अजूनही फोटोजेनिक आहे…. आत्ता माझ्या कॅमेऱ्याची बॅटरी लो झालीय. सगळे फोटो घेऊन होणार नाहीत बहुतेक. आपण परत येऊ फोटो काढायला आणि लता, इथे बसून आपण खूप सुंदर सुंदर चित्रेही काढू शकू, नाही का?”
नीलच्या प्रश्नाकडे दीचे लक्षच नव्हते ती तिच्याच विचारात गढून गेली होती. एक काळजीचा भला मोठ्ठा ढग तिचा चेहेरा व्यापून राहिला होता.
आरूने विचारले, “दी तुला बरं वाटत नाहीये का? की तुला दगदग झालीय इथे येण्यामुळे? मग तुझा चेहेरा असा काळजीत का दिसतोय?”
“काही नाही ग. असंच. बर तुमचं सगळं बघून झालं असेल तर आपण निघूया? केळकर साहेबांनापण त्यांची बाकीची कामं आवरायला हवीत. नाही का हो?’
केळकर म्हणाले, ‘हो ना, अजून बरीच कामे पेंडींग आहेत. आणि विहीर बुजवण्याचे काम पुढच्या आठवड्यात सुरू करता येईल असे हे कॉन्ट्रॅक्टर साहेब म्हणत होते.’
“का हो, इतका उशीर का? तुम्ही उद्यापासून नाही सुरू करू शकणार का?” दी ने कॉन्ट्रॅक्टरना विचारले.
”नाही ताईसाहेब, सॉरी, कारण माझी सगळी टिम आत्ता एका बांधकामावर कामाला लावलेली आहे. ते काम संपायला एकच आठवडा बाकी आहे. त्यानंतर विहीरीचं काम सलग करता येऊ शकेल.”
“ठीक आहे. करा मग पुढच्या आठवड्यात.”
“केळकर साहेब, चला आपण सगळेच निघूया आता.”
सगळीजणं तिथून बाहेर पडली.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply