घरी आल्यावर पण दी अस्वस्थच होती. रात्री ती थोडंस खावून झोपायला गेली. नीलने आरूला सांगितले की, “आरू, रात्री दाराला कडी घालू नको, दीला जर पुन्हा त्रास झाला तर मी येईन लगेच.”
आरू पण झोपायला दीच्या खोलीत गेली. तीपण दीच्या दिवसभरातील वागण्याचा आणि काल रात्री झालेल्या घटनांचा विचार करत करत झोपी गेली.
पुन्हा मध्यरात्री तिला दीच्या ओरडण्याच्या आवाजाने जाग आली. ती परत परत तेच शब्द बोलत होती. तिच्या चेहेर्यावर भयंकर राग दिसत होता. दांत-ओठ खात ती, “तुला शिक्षा मिळायलाच हवी होती. यात माझी काहीच चूक नाही….माझी काहीच चूक नाही” असं म्हणत होती.
दीचा आवाज ऐकून नील लगेच खोलीत आला. तेवढ्यात दी जागेवर उठून बसली आणि ओक्साबोक्शी रडू लागली. ती सारखं सारखं, “माझी काहीच चूक नाही….माझी काहीच चूक नाही” असं म्हणत हुंदके देवू लागली. आरू तिच्या शेजारीच बसली होती. तिने दीला आपल्याजवळ घेतले..ती तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत राहिली.
जरा वेळाने दीचे हुंदके देणे थांबले. ती शांत झाली. नीलने दीला पाणी प्यायला दिले. दीचे नीलकडे लक्ष जाताच ती त्याला म्हणाली, “नील, तू इथं काय करतोस?”
नील म्हणला, “लता तुला बरं वाटतंय का आता? तुला काही वाईट स्वप्न पडलं होतं का? किती घाबरली होतीस तू? तुझा आवाज ऐकून मी बघायला आलो काय झालं म्हणून?”
“मला काय झालंय? मी ठीक आहे.”
“नाही लता, तू ठीक नाहीयेस. तू परवा दिवशीपण अशीच झोपेतून घाबरून उठली होतीस. तुला कशाचा त्रास होतोय का? कशाची भिती वाटतीय का? काय असेल ते सांग आम्हाला…. मनावर कशाचं दडपण आलं असेल तर आमच्याशी बोललीस तर बरं वाटेल तुला……आम्ही काहीतरी मदत करू शकू. नाही का ग आरू?”
“होना दी, काय झालंय ते मोकळेपणाने सांग ना आम्हाला? तू नाही सांगितलंस तर कसं कळणार? आम्हाला काळजी वाटतेयं ग तुझी.”
“मला काहीही झालेलं नाहीये, आणि कसली भिती वगैरे वाटत नाहीये मला. कदाचित, एखादं भितीदायक स्वप्नं पडलं असावं. पण काय, ते मला अजिबातच आठवत नाहीये. माझी काळजी करू नका, तुम्ही झोपा आता.”
“मग तू ‘माझी काही चूक नाही’ असं का म्हणत होतीस सारखं?”
“खरंच मी असं म्हणत होते? पण मला कसं काहीच आठवत नाहीये”
नील म्हणला, “बरं असू दे. नसेल तुला आठवत तर राहू दे. तुला बरं वाटत असेल तर झोप आता. आपण उद्या सकाळी बोलू.”
नील त्याच्या खोलीत निघून गेला. दीला नीट झोपवून आरू पण तिचा हात हातात धरून तिच्या शेजारी झोपली.
सकाळी उठल्यावर काल रात्रीच्या प्रसंगावर कोणीच काही बोलले नाही. दी स्वतःहुन काही बोलते का याची वाट पाहून चहा नाष्टा झाल्यावर आरू आणि नील सकाळी शेतावर फिरून आले. दुपारची जेवणं झाल्यावर थोडी विश्रांती घेवून ते संध्याकाळी परत बाहेर फिरायला जायचा विचार करत होते. सगळे हॉलमध्ये चहासाठी जमले होते. दी केळकरांनी दिलेली कागदपत्रे वाचत होती. हॉलमध्ये शांतता होती. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हते.
बराच वेळ असा शांततेत गेल्यावर नील लताला म्हणाला, “लता तुला अजून वेळ लागणार आहे का कागदपत्रं तपासायला?
“का रे? काही काम होतं का?”
“नाही…. तुझं काम झालं असेल तर आपण जरा घाटावर फिरून आलो असतो…
“नाही रे…मला ही कागदपत्रं पहायला बराच वेळ लागेल असं वाटतंय. पण तू आणि आरू या ना घाटावरून फिरून, माझं लवकर आवरलंच तर मी नंतर जॉईन होईन तुम्हाला.”
“ठीक आहे. मग आम्ही दोघे पुढे जातो……” असं म्हणून नील आणि आरू दोघेही घाटावर फिरायला बाहेर पडले.
थोड्याच वेळात ते दोघे घाटावर पोहोचले. घाटावर जरासा फेरफटका मारून मग ते एका बाजूला, पायऱ्यांवरून पाण्यात पाय सोडून बसले.
सगळीकडे संध्याकाळची किरणे पसरली होती. घाटावरून लोकांची परतण्याची लगबग चालली होती. जवळच्या देवळांतून सायंआरतीचे आवाज येत होते. एकंदर खूप सुंदर आणि प्रसन्न वातावरण निर्माण झालं होतं. आरू या वातावरणाशी तद्रूप झाली होती. एक शांत सुंदर भाव तिच्या चेहेर्यावर पसरला होता. नील तिच्या या लोभस रूपाकडे एकटक पहात बसला होता. जवळच्या देवळातील घंटानादाने आरूची तंद्री भंग पावली. तिचे नीलकडे लक्ष गेले. तो तिच्याकडेच पहात होता.
“ए नील, असा काय पाहतोस माझ्याकडे?”
“अरे याऽऽर, आत्ता मी सोबत कॅमेरा आणायला पाहिजे होता. काय सुंदर पोझ होती तुझी. तंद्री लावून बसलेली. इतकी गोड दिसत होतीस नं तु, तुझ्या दीनं तर तुझं खूप सुरेख पोर्टेट काढलं असतं.”
“कौतुक बास झालं. बोल, काय बोलायचं होतं तुला माझ्याशी, दी बद्दल?”
“परवा रात्री घडलेली घटना, दीचं दिवसभर अस्वस्थ राहणं, आपल्याला गढीवर जाण्यापासून रोकण्याचा प्रयत्न करणं, आणि गढीवर गेल्यापासून ते परत येईपर्यंत गंभीर होणं, अस्वस्थ होणं, निघण्याची घाई करणं, काल रात्री परत झोपेत “माझी काही चूक नाही” असं ओरडणं, हे सगळं मला खूप विचित्र वाटतंय. म्हणजे, मुंबईत असताना आपल्याबरोबरचं दीचं वागणं आणि इथं गावात आल्यापासूनचं वागणं यात खूपच फरक जाणवतोय मला.”
“हो रे, मी पण याच गोष्टींचा विचार करत होते. मागच्यावेळी आम्ही इथून गेल्यापासून दी खूप गंभीर आणि एकलकोंडी झाली हे मी तुला सांगितलं होतं. पण अजूनही मला त्यामागचं कारण समजलेलं नाही.”
“मला वाटतंय, तुम्ही इथं गावी आलात त्या आधीच्या काही घटनांचा याच्याशी संबंध असावा, तू प्लीज मला याआधी लताच्या आयुष्यात काय काय घडलं, याची जरा सविस्तर माहिती देशील का? May be, त्यामुळे आत्ताच्या घटनांबाबत आपल्याला काहीतरी ट्रेस लागू शकेल.”
“माझ्यापण आता सगळ्या गोष्टी इतक्या लक्षात नाहीत पण जसं आठवतंय तसं सांगते. पण कुठून सुरूवात करू?”
“आई बाबा गेले त्यानंतर काय काय झाले ते आठवेल तसं सांग मला.”
आई बाबा होते तेव्हा आमची खूपच हसती खेळती फॅमिली होती. बाबांचा व्यवसाय असला तरीही प्रत्येक विकएन्डला आम्ही खूप मजा करायचो. आमचं एकमेकांत खूप छान बाँडिग होतं. मी नुकतीच 10 वीच्या अभ्यासातून सुटून कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. दीला तिच्या आवडत्या कलाक्षेत्रात जे. जे. ला शिकायला मिळत होतं. आईचं शाळेचं रूटीन होतं. पण आम्ही आनंदी होतो. मलातर मी कॉलेजला जायला लागल्यावर ‘काय करू नि काय नको’ असं झालं होतं. खूप सारे नवे मित्र मैत्रिणी मला मिळाले होते. मला अभ्यासाला माझे जे आवडते विषय पाहिजे होते ते मिळाले होते. कॉलेजच्या कल्चरल अॅक्टिव्हीटीज, कॉम्पिटीशन्स मध्ये मी भाग घेत होते. एकंदर आनंदीआनंद होता सगळा.
बाबांना आमच्या गावाचा, तिथल्या वाड्याचा खूप अभिमान होता. जहागीरदारी गेली असली तरी जहागिरदारांसारखं रहाणं त्यांना आवडत होतं. आमच्या वाड्यावर त्यांचा खूप जीव होता. बाबांचे आईवडील जुन्या पद्धतीने वागणारे, बोलणारे होते. त्यांचे पेहेरावही जुन्या पद्धतीचे होते. त्यांची जिवनशैलीही खानदानी होती. त्यावेळी गावांत शिक्षणाच्या फारशा सुविधा नव्हत्या. बाबा आभ्यासात खूप हुशार होते म्हणून त्यांच्या आईवडिलांनी बाबांना शिक्षणासाठी इथं मुंबईत पाठवलं. गाव सोडून शहरात येणं बाबांना आजिबातच आवडलं नव्हतं. पण हळुहळू त्यांनी शहराशी जुळवून घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी इथंच कन्स्ट्रक्शनचा बिझनेस चालू केला. पण वाड्याच्या आठवणी त्यांच्या मनात कायमच्याच कोरलेल्या होता. आम्ही राहतो तो बंगला बांधताना मग बाबांनी जमेल तेवढी अंतर्गत रचना करताना वाड्याचा फील येईल याची काळजी घेतली. त्यामुळे निदान बोलताना तरी हॉलला दिवणखाना, बेडरूमला शयनकक्ष, इतर खोल्यांना दालनं, कुकला खानसामा अशी जुनी नावं कायम ठेवून ते वाड्यात राहण्याचा आनंद घेत असत.
माझी आई शिक्षिका होती. तिला नोकरी करण्याची काहीच गरज नव्हती. बाबांचा बिझनेस खूप चांगला चालत होता. शिवाय गावाकडचे उत्पन्न होतेच. पण आईला मुलांना शिकवणे, त्यांच्यासाठी काहीतरी करत राहणे खूप आवडत असे. ती दरवर्षी माझ्या आणि दीच्या वाढदिवसाला शाळेला आणि मुलांना उपयोगी पडेल असे काहीतरी गिफ्ट देत असे. एकदा शाळेला २० संगणक तिने मुलांसाठी भेट दिले होते. शाळेच्या पटांगणात खेळणी नव्हती, ती सगळी खेळणी म्हणजे, झोपाळे, घसरगुंड्या, व्यायामाची साधने तिने दिली होती. आणि आईचा वाढदिवस असे तेव्हा सर्व मुलांना स्पेशल गाडी करून स्वतःच्या खर्चाने ट्रीपला घेऊन जात असे. मुलांचे आनंदी चेहेरे पाहून तिला समाधान मिळत असे.
एकदा बाबांना त्यांच्या बिझनेस रिलेटेड एका मिटींगसाठी साऊथला 8-10 दिवस जायचं होतं. बाबा म्हणाले आईला पण सोबत घेवून जातो. तेवढाच तिलाही चेंज मिळेल. पण आम्ही दोघी कशा राहणार हा प्रश्न होता. तसे घरात काम करण्यासाठी मदतनीस होते, स्वयंपाक बनवण्यासाठी एक खानसामा आणि मदतीला एक मावशी होत्या. गाडी चालवायला ड्रायव्हर होता, बंगल्यावर सेक्युरिटी साठी दोन वॉचमन होते. म्हणजे तसा सोबतीचा प्रॉब्लेम नव्हता.
पण दीनं आई बाबांना सांगितलं, ‘मी आता मोठी झालेय, मी आरूची काळजी घेईन, तुम्ही बिनधास्त जा.’ मग दोघेही टूरला गेले. तिथून रोज संध्याकाळी ते फोन करून आम्हाला दिवसभरातील गमती जमती सांगत असत. आमच्यासाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी शॉपिंग केल्या होत्या.
ते परत यायची आम्ही वाट पहात होतो आणि अचानक त्यांच्या गाडीला अपघात झाल्याची बातमी आली. त्यांना हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केलंय असं आम्हाला आधी सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात दोघांच्याही डेड बॉडीज घरी आल्या. आमच्या दोघींसाठी हे खूपच शॉकिंग होतं. आमचा विश्वासच बसत नव्हता की हे आमच्या आईबाबांच्या बाबतीत खरोखर घडलंय.
(क्रमशः)
— © संध्या प्रकाश बापट
Leave a Reply